नाशिक

गर्भवतींपासून राहिले दूर ‘माहेरघर’!

वर्षभरात अवघ्या 20 महिलांनी घेतला लाभ; जूनअखेर सातशे प्रसूती

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील माहेरघर योजनेंंतर्गत एप्रिल ते जून 2026 या तीन महिन्यांत निवडलेल्या ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकूण सातशे प्रसूती झाल्या. मात्र, या कालावधीत फक्त वीस महिलांनी माहेरघर योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.
आदिवासी भागात रस्त्यांची समस्या, खंडित दूरध्वनी, नेटवर्क नाही, तसेच वाहतूक करण्यास अडचण आदी कारणांमुळे राज्य शासनाने 2010-11 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेरघर योजना सुरू केली आहे.
गेल्या वर्षभरात एकूण सातशे प्रसूती झाल्या असून, केवळ 20 महिलांनी माहेरघर योजनेचा लाभ घेतला आहे. माहेरघर योजनेबाबत योग्य जनजागृती तसेच गर्भवती महिलांची (रोजगार बुडेल या भीतीने) प्रसूतीसाठी लवकर प्रसूतिगृहात दाखल होण्याबाबत उदासीनता, आपल्या आरोग्याबाबत कमालीचे दुर्लक्ष आदी कारणांमुळे या योजनेंंतर्गत प्रसूतिगृहात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर
आले आहे.
माहेरघर योजनेंंतर्गत एप्रिलमध्ये 348, मे-168 आणि जूनमध्ये 184 प्रसूतींची नोंद झाली आहे. एकूण सातशे प्रसूती झाल्या. मात्र, लाभार्थींची संख्या एप्रिलमध्ये सहा, मे- सात आणि जूनमध्ये सात अशी एकूण 20 इतकीच
राहिली आहे.
तालुकानिहाय पाहता पेठ तालुक्यातील जोगमोडी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहोळ या दोन केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी नऊ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला. उर्वरित बहुतांश केंद्रांमध्ये लाभार्थींची संख्या शून्य असल्याचे अहवालात नमूद आहे. प्रसूतींच्या संख्येत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचोहोळ (44), सुरगाणा तालुक्यातील पळसन (38), पांगरणे (33) आणि बुबळी (30) या केंद्रांमध्ये सर्वाधिक प्रसूती झाल्या. देवळा-खर्डा (26), सुरगाणा-मानखेड (21), नांदुरी (20), बोरगाव (20) आणि शिरसगाव (20) येथेही प्रसूतींची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ पाड्यांमध्ये वास्तव्यास असते. आदिवासी पाड्यांत अनेक ठिकाणी रस्ते, वाहनाची व्यवस्था नसते. पावसाळ्यात अनेक रस्ते बंद होतात. कच्च्या रस्त्यांची दुरवस्था होते. महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होईल याची शाश्वती नसते. माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्यास ही महत्त्वाची कारणे ठरतात.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणावर प्रसूती होत असतानाही माहेरघर योजनेचा लाभ घेणार्‍या महिलांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेबाबत जनजागृती वाढविण्याची गरज आहे.

आदिवासी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालयात माहेरघर योजना सुरू करण्यात आली आहे. अति जोखमीची, गुंतागुंत टाळण्यासाठी गर्भवतींंनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पंधरा दिवस आधी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल व्हावे.
– डॉ. हर्षल नेहते, माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

 

‘Maherghar’ remains out of reach for pregnant women!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago