नाशिक

धनत्रयोदशीला बाजारात धनवर्षाव

कोट्यवधींची उलाढाल, सराफ बाजारात गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर शहर आणि परिसरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. सकाळपासूनच शहरातील मुख्य पेठा, उपनगरे आणि व्यापारी संकुलांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. सराफ बाजारासोबतच ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या बाजारातही ग्राहकांनी खरेदीसाठी जोरदार गर्दी केल्याने सर्वच क्षेत्रांत दिवसभरात सुमारे पाचशे ते सहाशे कोटींची उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढउतार असूनही मुहूर्ताची खरेदी करण्याकडे नागरिकांचा विशेष ओढा राहिला. सुरक्षित गुंतवणूक आणि परंपरेचा भाग म्हणून 22 व 24 कॅरेट सोन्याचे दागिने, हलक्या वजनाची फॅशनेबल ज्वेलरी, तसेच लक्ष्मी-गणेश प्रतिमा असलेली सोन्या-चांदीची नाणी यांना सर्वाधिक मागणी राहिली.
स्थानिक सराफ असोसिएशनच्या अंदाजानुसार, दिवसभरात सराफ बाजारात पाचशे कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली आहे.
धनत्रयोदशीला शुक्रवारी (दि.6) 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह एक लाख 47 हजार राहिला. 22 कॅरेटचा भाव एक लाख 35 हजार 300 रुपये, तर चांदीचा दर एक लाख 92 हजार जीएसटीसह होता. गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीतील दरात चढउतार कायम राहिल्याने ग्राहकांनी संधीचा फायदा घेत खरेदीला प्राधान्य दिले. सणाचा दागिना गुुंतवणूक आणि हौस असे सर्वच योग जुळून आल्याने ग्राहकांना फायदा झाला. हाच खरेदीचा उत्साह लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेपर्यंत कायम राहील, असा विश्वास व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. शुभमुहूर्तावर ग्राहकांनी सोनेे-चांदीची नाणी, वेढणी, तसेच चांदीचे कॉईन, पूजासाहित्य, करंडा, निरांजन खरेदीसाठी गर्दी केली होती.

वाहनांचा टॉप गिअर; रिअल इस्टेटमध्येही उत्साह
ऑटोमोबाइल क्षेत्रातही यंदाच्या धनत्रयोदशीला मोठी भरभराट पाहायला मिळाली. दसर्‍यानंतर ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी आधीच मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून ठेवली होती. शहरातील विविध शोरूम्समधून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्रमी विक्री झाली. दिवसभरात सुमारे 2,000 हून अधिक दुचाकी, तर पाचशेहून अधिक चारचाकी वाहनांची विक्री नोंदवली गेल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी वस्तूंच्या बाजारातही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याकडेही कल राहिल्याने मोबाइल मार्केटलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता.

गेल्या महिनाभराच्या तुलनेत सोन्याचे भाव थोडे कमी झाले आहेत. सध्या जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 1,46,000 ते 1,47,000 रुपयांदरम्यान आहे. चांदीचा दर जीएसटीसह सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात व्यवसायात काहीशी मंदी जाणवत होती. मात्र, दसर्‍यापासून बाजाराला चांगली गती मिळाली आणि धनत्रयोदशीलाही ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आगामी काळातही बाजारात असाच उत्साह आणि गर्दी कायम राहील, अशी आम्हाला खात्री आहे.
– गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक

सणासुदीच्या काळात व्यक्तिगत वाहनांना ग्राहकांकडून खूपच चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बाजारात पर्सनल सेंगमेंटच्या गाड्यांची मागणी इतकी मोठी आहे की, मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून होणारा पुरवठादेखील कमी पडत आहे. शुक्रवारी (दि. 6) आम्ही 65 वाहनांची यशस्वी डिलिव्हरी केली आहे. आमच्यासाठी सर्वार्ंत महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा असेल. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर साधारण शंभर वाहनांची डिलिव्हरी होण्याचा आमचा अंदाज आहे. कारण दिवाळी पाडव्याच्या तुलनेत लक्ष्मीपूजनालाच लोक सर्वाधिक डिलिव्हरी घेणे पसंत करतात. एकंदरीत बाजारपेठेत अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. मात्र, दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांची परिस्थिती नाजूक असल्याने पिकअपसारख्या कमर्शियल वाहनांच्या विक्रीसमोर काही आव्हाने उभी राहिली आहेत. त्यांचा व्यवसायाला यंदा काहीसा अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
– राजेंद्र कुलकर्णी, सेल्स मॅनेजर, जितेंद्र ऑटोमोबाइल्स प्रा.लि.

सध्या रिअल इस्टेट क्षेत्राला ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून, बाजारात पूर्णपणे उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे. यात प्रामुख्याने फ्लॅट्सना मोठी मागणी आहे. त्यातही बहुतांश ग्राहकांची पहिली पसंती टू आणि थ्री बीएचके घरांना मिळत आहे.
– शंतनु देशपांडे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक

 

प्रामुख्याने एफ झेड-एस हायब्रिड या मॉडेलला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत असून, हे सध्या नंबर वन मॉडेल ठरत आहे. इतर गाड्यांसाठीही मोठ्या प्रमाणावर वेटिंग व बुकिंग सुरू आहे. नुकतीच लॉन्च झालेली आर-2 ही दुचाकीदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, तिलाही उत्तम मागणी नोंदवली जात आहे. आता सुमारे 25 ते 30 गाड्यांचे वितरण पूर्ण होईल. जर स्टॉक पुरेसा उपलब्ध असता, तर ही विक्री आणखी मोठ्या आकड्यावर पोहोचली असती. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तासाठी सुमारे पन्नास गाड्यांच्या वितरणाचे नियोजन आहे. प्रीमियम सेगमेंटसह सर्वच गाड्यांना सध्या बाजारात जोरदार मागणी पाहायला मिळत आहे.
– महेश ठक्कर, संचालक, टॉर्क मोटर्स

धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ग्राहकांचा प्रचंड उत्साह आणि भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला. आम्ही शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 55 गाड्यांची यशस्वी डिलिव्हरी पूर्ण केली आहे. धनत्रयोदशीपासून सुरू झालेला हा खरेदीचा उत्साह असाच पुढे कायम राहताना दिसत आहे. लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तासाठीदेखील ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर गाड्यांचे बुकिंग झाले आहे. – कपिल जगताप, सेल्स मॅनेजर, सेवा नेक्सा

सोन्या-चांदीच्या दरांत झालेल्या घसरणीचा ग्राहकांनी उत्तम फायदा घेतला आहे. प्रामुख्याने हलक्या वजनाचे पारंपरिक दागिने, मंगळसूत्र, बांगड्या आणि विशेषतः हिर्‍यांच्या दागिन्यांना मोठी मागणी आहे. दुसरीकडे, चांदीचे भाव कमी झाल्याने लक्ष्मीची नाणी, चांदीच्या विटा आणि बिस्किटांसोबतच हलक्या वजनाच्या चांदीच्या दागिन्यांनाही ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीत सध्या बाजारात अत्यंत सकारात्मक आणि तेजीचे वातावरण आहे. – योगेश्वर दंडे, संचालक, दंडे गोल्ड अँड डायमंड्स

Money rains in the market on Dhanteras

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गावांच्या सुरक्षेची धुरा तरुणांच्या खांद्यावर; 33 गावांत ग्रामरक्षक दलाचा पहारा!

वावी पोलिसांचा अनोखा उपक्रम; 327 तरुण मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत घालतात गस्त सिन्नर…

7 hours ago

सातपूरमधील चाकूहल्ला, आरोपीला पाच वर्षे कारावास

भांडण सोडविण्यास गेलेल्या चुलतभावाचा चाकूच्या वारात झाला होता मृत्यू सिडको : प्रतिनिधी किरकोळ वादातून झालेल्या…

7 hours ago

मुकणे धरणात बुडालेले दोन जण बेपत्ताच

आमदार खोसकरांकडून घटनास्थळी पाहणी घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी…

7 hours ago

सटाणे कर्‍ही गावात एकाच रात्री 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे

मनमाड : प्रतिनिधी मनमाड परिसरासह ग्रामीण भागात दरोडे व चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री…

7 hours ago

सटाण्यात तोतया एफडीआय अधिकार्‍यांचा पर्दाफाश

मिठाई दुकानात तपासणीच्या नावाखाली दिशाभूल करणारे तिघे जेरबंद सटाणा : प्रतिनिधी शासकीय अधिकारी असल्याची बतावणी…

8 hours ago

सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी

सिन्नर : प्रतिनिधी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून,…

8 hours ago