नाशिक

डोंगराळेतील अत्याचारी नराधम दोषी सिद्ध

फाशी की जन्मठेप? फैसला 7 ऑक्टोबरला होणार

मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील डोंगराळे येथील बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा विजय खैरनार (वय 24) याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निवाडा बुधवारी (दि. 30 सप्टेंबर) विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने मालेगाव येथील सुनावणीत दिला. न्यायालयाने ही बाब आरोपीलाही त्याच्याविरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे कळविले आहे. या प्रकारचे आरोप सिद्ध झाल्यानंतर आजन्म कारावास अथवा फाशीची शिक्षा होऊ शकते. मात्र, सदर आरोपीची घरची परिस्थिती, त्याचा पूर्वेतिहास, तुरुंगातील त्याची वागणूक या बाबी आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून त्याची तपासणी करून 7 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश या प्रकरणातील पॉक्सोचे विशेष सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी दिले. हे अहवाल आल्यानंतर 7 ऑक्टोबरलाच न्यायालयातर्फे आरोपीला शिक्षा सुनावली जाईल.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम हेही या सुनावणीवेळी मालेगावात उपस्थित होते. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आरोप सिद्ध झाल्यानंतर सरकारतर्फे आम्ही आज अर्ज दिला की, न्यायालयात काही बाबी स्पष्ट होणे आवश्यक आहेत. आरोपीची घरची स्थिती काय आहे? त्याचप्रमाणे आरोपीचा पूर्वेतिहास काय आहे? आरोपीला अटक झाल्यानंतर तुरुंगात त्याची कशी वागणूक होती? त्याची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून या सगळ्या बाबींची पूर्तता झाल्यानंतर आरोपीला कोणती शिक्षा मागावी याबद्दल सरकारतर्फे आम्हाला विनंती करता येईल. न्यायालयाने आमची विनंती मान्य करून येत्या 7 ऑक्टोबरला वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे नाशिकचे तुरुंगाधिकारी आणि प्रोबेशन ऑफिसर यांनी ही माहिती संकलित करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश बुधवारी दिले.
अतिशय संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणात बुधवारची सुनावणी निर्णायक होती. संतप्त जनभावना लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षकांच्या उपस्थितीत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हेही या सुनावणीवेळी मालेगाव सत्र न्यायालयात उपस्थित होते. डोंगराळे (ता. मालेगाव) येथे गतवर्षी 16 नोव्हेंबर रोजी तीन वर्षांची चिमुकली बेपत्ता झाली होती. शोध घेतल्यानंतर गावालगतच्या झाडाझुडपांत तिचा गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला होता. तपासात मुलीच्या वडिलांशी झालेल्या कौटुंबिक किंवा जुन्या वादाच्या रागातून गावातील 24 वर्षीय विजय खैरनार याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयित आरोपी विजय खैरनार याला तत्काळ अटक केली होती.
या खटल्यात प्रत्यक्षदर्शी पुरावा उपलब्ध नसतानाही सरकार पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयासमोर मांडली. सरकार पक्षातर्फे 24 साक्षीदार तपासण्यात आले, तर आरोपीच्या बचावासाठी दोन जणांंची साक्ष नोंदविण्यात आली. महत्त्वाच्या बालसाक्षीदारांनी आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेला सोबत नेल्याचे न्यायालयात सांगितले होते.
विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांनी अंतिम युक्तिवादात प्रकरणातील 15 परिस्थितीजन्य पुराव्यांची सांगड न्यायालयासमोर घातली. आरोपीने न्यायालयात सादर केलेल्या लेखी बचावातील कथन आणि उपलब्ध पुरावे यातील विसंगतींकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होत असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.

महाराष्ट्रात संतापाची लाट
या अमानुष कृत्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी अवघ्या 23 दिवसांत 425 पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट) न्यायालयात दाखल केले होते. मालेगाव येथील मंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेत या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करवून घेतली होती.

या प्रकरणात मंत्री दादा भुसे व परिसरातील ग्रामस्थांनी एकी राखल्यामुळेच या खटल्यातील सर्व आरोप परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असल्याचे आम्ही सरकारतर्फे सिद्ध करू शकलो. अशारीतीने बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमांबद्दलदेखील गावकर्‍यांनी जागरूक राहिले पाहिजे आणि याला कुठली शिक्षा द्यावी आणि कुठली शिक्षा योग्य न्यायाने होईल याचा सविस्तर युक्तिवाद आम्ही 7 तारखेला करू. या खटल्यात मला येथील सरकारी वकील एस. के. सोनवणे, अ‍ॅड. स्नेहा शर्मा, अ‍ॅड. हर्षद तिवारी यांनी सहाय्य केले. तसेच मालेगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर निकम यांचीही मदत झाली.– अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

वर्षभरापूर्वी डोंगराळे येथे बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेला जनक्षोभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवत अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना या केसची जबाबदारी द्यावी आणि फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी, अशा प्रकारची मागणी केली होती. अ‍ॅड. निकम यांनी खूप वेळ देऊन या केसचा अतिशय सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून दोषीला मोठी शिक्षा कशी मिळेल या दृष्टिकोनातून बारीकसारीक पुरावे गोळा करून त्यांनी आरोप सिद्ध केलेला आहे. आमची तर मागणी असणार आहे की, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे; परंतु न्यायालय अंतिम निकाल देईल. मालेगाव बार असोसिएशननेही एकजूट दाखवत भूमिका घेतली.
– दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री

Mountaineer convicted of murder

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago