नाशिक

मुळेगावच्या महिलांचा जि.प.वर हंडा मोर्चा

प्रभारी सीईओंची गाडी अडवली; प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नांवर संतप्त महिलांनी गुरुवारी जिल्हा परिषद नाशिक येथे रिकाम्या हंड्यांसह आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले. आंदोलनाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी तातडीने बैठक घेऊन सिंटेक्स टाक्या बसवणे, नियमित पाणीपुरवठा करणे आणि विहिरीतील गाळ काढण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील भीषण पाणीटंचाईच्या प्रश्नावर गुरुवारी भारतीय महिला फेडरेशन व आयटक कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथे रिकामे हंडे घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आले. अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवर अवलंबून राहावे लागत असल्याने संतप्त महिलांनी प्रशासनाला जाब विचारला.
महिलांच्या म्हणण्यानुसार, दररोज दोन ते चार तास पाणी भरण्यासाठी खर्च होत असून, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार वाढले आहेत. तसेच विहिरीत पडून आतापर्यंत चार महिला व मुलींचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत का? आम्हाला स्वच्छ पाणी का मिळत नाही? असा संतप्त सवाल महिलांनी केला. गावातील पाणीटंचाईमुळे मुली विवाहासाठी येण्यास तयार नसल्याची व्यथाही महिलांनी मांडली.
आंदोलनादरम्यान महिलांनी विहिरीतील दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवत प्रशासनासमोर निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना आंदोलनकर्त्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांची गाडी अडवून तातडीने दखल घेण्याची मागणी केली. संगमनेरे यांनी अर्ध्या तासात परत येऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
त्यानंतर संगमनेरे यांच्या अध्यक्षतेखाली बीडीओ त्र्यंबकेश्वर आणि जलजीवन मिशनच्या अभियंत्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीत मुळेगावातील पाइपलाइनचे काम पूर्ण होईपर्यंत राजवाडा व कोळीवाडा भागात तातडीने सिंटेक्स पाण्याच्या टाक्या बसवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच टाक्यांमध्ये दररोज पाणी भरल्यानंतर स्थानिक महिलांच्या सह्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. विहिरीतील गाळ काढण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले.
वालदेवी धरणातून दहेगावमार्गे जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी गावात अद्याप थेंबभरही पाणी पोहोचले नसल्याचा आरोप केला. या आंदोलनात कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड प्राजक्ता कापडणे, कॉम्रेड मनोहर पगारे, लता जाधव, सोनाली जाधव, अनिता जाधव, सुनीता रामसे, मथुरा तिवारी, रमाबाई जाधव, लक्ष्मी पोटिंदे, पूजा पोटिंदे आदी महिला मोठ्या संख्येने
सहभागी झाल्या.

मुळेगावात 5 पाण्याच्या टाक्या

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या निर्देशानुसार गावात त्वरित पाणीपुरवठ्यासाठी पाच पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या आहेत. गावामध्ये शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होईपर्यंत या टाक्यांद्वारे ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पाणीटंचाईमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

Mulegaon women’s pot march to the Z.P.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago