मुंबई :
एमपीएससी संदर्भातील मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. यापुढे तुकाराम मुंढे हे एमपीएससीच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून काम करणार आहेत, अशी घोषणा शिवेंद्रराजेंनी केली. शिवेंद्रराजेंनी सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा हा आ. रोहित पवारांकडे सुपूर्द केला. आंदोलन करणार्या ज्या विद्यार्थांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत ते मागे घेण्याची घोषणा शिवेंद्रराजेंनी केली
आहे.
या संदर्भात आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या 11 दिवसांपासून पुण्यामध्ये आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, ही त्यामधील प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आता हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी राज्याचे मंत्री शिवेंद्रराजेंनी रोहित पवार आणि आंदोलकांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवेंद्रराजे यांनी एस. एम. जोशी पुलावर बसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे त्यांना सांगितले. त्याचबरोबर एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदी धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. शिवेंद्रराजे यांनी सरकारचा मसुदा हा रोहित पवारांच्या हाती सोपवला. पवारांनी हा मसुदा विद्यार्थ्यांना वाचून दाखवला. मात्र त्यामध्ये अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याविषयी काही उल्लेख नव्हता. त्यामुळे विवेक भीमनवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आ. रोहित पवारांनी केली.
Mundhe appointed as Secretary of the MPSC Inquiry Committee.