मनपाच्या बँकांमध्ये 2,561 कोटींच्या ठेवी

श्वेतपत्रिकेतून माहिती समोर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या विविध बॅँकांमध्ये सध्या तब्बल 2,561 कोटी 87 लाख 29 हजार 718 रुपयांच्या ठेवी असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने मंगळवारी (दि. 30 जून) झालेल्या महासभेत प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळातील श्वेतपत्रिका सादर केली असता, त्यातून ही माहिती समोर आली. दरम्यान, प्रशासनाने सादर केलेल्या श्वेत्रपत्रिकेवर अभ्यास करून त्यावर विशेष महासभा घेतली जाणार आहे, असे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले.
शहरातील विविध बॅँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनपाच्या ठेवी वजा गुंतवणूक असल्याने मनपाची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे प्रशासनाने श्वेतपत्रिकेतून अधोरेखित केले आहे. चार वर्षांच्या प्रशासकीय कालावधीत विविध विभागांमार्फत करण्यात आलेली विकासकामे, त्यावर झालेला खर्च, निविदा प्रक्रिया, प्रलंबित प्रकल्प, विविध योजना, अशा सर्व बाबींची सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह काही सदस्यांनी केली होती. त्यावर महापौर हिमगौरी आडके यांनी चार वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. सर्व विभागांकडून माहिती संकलित करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. महापौर आडके यांनी श्वेतपत्रिकेचा अभ्यास करून आवश्यक सूचना व मुद्दे पुढील बैठकीत मांडण्याचे आवाहन सदस्यांना केले.
नाशिक महापालिकेच्या 2022 ते 2026 या प्रशासकीय राजवटीतील कामकाजाचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका मंगळवारी (दि. 30 जून) आयुक्तांनी सादर केली. श्वेतपत्रिकेच्या प्रती सर्व नगरसेवकांना वितरित करण्यात आल्या आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर त्याविषयी विशेष महासभा घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे महापौर आडके यांनी सांगितले. महापालिकेच्या बांधील खर्चात गेल्या सहा वर्षांत मोठी वाढ झाली आहे. कर्मचारी वेतन, पेन्शन, कर्ज मुद्दल
परतफेड व कर्ज निवारण निधी, कर्जावरील व्याज, कार्यालयीन खर्च, राखीव बाबी महसुली खर्च, देखभाल व दुरुस्ती खर्च, अशा बाबींचा बांधील खर्चात समावेश होतो. 2021-22 या वर्षात बांधील खर्चावर 965 कोटींचा खर्च झाला. त्यात कर्मचारी वेतनावर 379 कोटी 88 लाख 55 हजारांचा खर्च झाला आहे. 2025-26 मध्ये बांधील खर्चावर 1,677 कोटी खर्च झाला असून, कर्मचारी वेतनावर दुप्पट म्हणजे 623 कोटी 44 लाखांचा खर्च झाला आहे. आता चालू आर्थिक वर्षात 2026-27 मध्ये वेतनावर 623 कोटीच खर्च होणार आहेत. बांधील खर्च मात्र 2,209
कोटी होईल.

सहा वर्षांतील ठेवी अशा (रुपयांत)
2021-22 : 1,144 कोटी
2022-23 : 1,257 कोटी
2023-24 : 1,393 कोटी
2024-25 : 1,521 कोटी
2025-26 : 1,334 कोटी
2026-27 : 2,561 कोटी

Municipal Corporation holds deposits worth ₹2,561 crore in banks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *