धक्कादायक : तरुणाला हात पाय बांधून धरणात फेकले

नांदगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नाग्या साक्या धरणात एका बावीस वर्षीय युवकाचा मृतदेह गळा व हातपाय दोराने बांधून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमदर्शनी या युवकाचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंगळवारी दुपारी नाग्या – साक्या धरणातील सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असतांना काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही बाब उघडकीस आली..अमोल धोंडीराम व्हडगर (22) रा.नांदूर ( ता.नांदगाव) असे तरुणाचे नाव आहे. नांदूर गावातील केसकर यांच्याकडे असलेल्या वरातीत नाचून येतो असे सांगून मयत अमोल धोंडीराम व्हडगर हा रविवारी सायंकाळी घरातून गेेला होता.मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. अमोलच्या नातेवाईकांनी दोन दिवस शोध घेतला. मंगळवारी सकाळी हरवल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असतांनाच मंगळवारी दुपारी काही कॉलेजचे विद्यार्थी नाग्या-साक्या धरणाकडे फिरायला गेलेले असतांना धरणाच्या सांडव्याजवळ एक मृतदेह तरंगत असतांना त्यांना आढळून आला.त्यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली..पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत हा मृतदेह ताब्यात घेतला.या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरविली असून रात्री उशिरा नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी मनमाड येथील पोलिस उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे आदींनी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *