गुरू-शिष्यांच्या जयंती सोहळ्याने दुमदुमले नाशिक शहर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानत होते. या आठवड्यात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरू-शिष्यांच्या जयंतीने नाशिक शहर दुमदुमून गेले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरासह उपनगरांत जल्लोषात साजरी करण्यात आली. ‘उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे’, माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला’, ‘भीमराज की बेटी’ अशा लोकप्रिय भीमगीतांच्या तालावर तरुण-तरुणींनी ठेका धरला होता. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर झळकणारे निळे झेंडे, डिजिटल बॅनर्स अन् निळ्या-पांढर्‍या वेशभूषेतील भीमसैनिकांमुळे शहरात ‘निळा जनसागर’ लोटल्याचे चित्र दिसून आले. शहरासह नाशिकरोड, देवळाली कॅम्प, भगूर, पंचवटी, सातपूर, सिडको परिसरात सकाळपासूनच आयोजित विविध कार्यक्रमांद्वारे डॉ. आंबेडकरांना वंदन करण्यात आले. ‘बोलो बोलो जय भीम’च्या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजीरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बुद्धवंदनेने या ऐतिहासिक सोहळ्याचा शिस्तबद्ध पद्धतीने समारोप झाला.
नाशिकरोडला 35 चित्ररथ सहभागी :
नाशिकरोड येथे सायंकाळी काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीत 35 चित्ररथांसह डॉ. आंबेडकरांचे हजारो अनुयायी सहभागी झाले होते. नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीने उभारलेली महाबोधी महाविहाराची प्रतिकृती विशेष अभिवादनासाठी आकर्षण ठरली. येथे पुष्पहार अर्पण करून मध्यरात्रीपर्यंत अनुयायी मोठ्या संख्येने येत होते.
महात्मा फुले जयंती मिरवणूक :
नाशिक शहराच्या मध्यवर्ती मुंबई नाका परिसरातील महात्मा फुले स्मारकात उभारण्यात आलेल्या भिडेवाड्याच्या देखाव्याने महात्मा जोतिराव फुले जयंतीचा सोहळा लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे चित्ररथातून सादर करण्यात आलेले जिवंत देखावे, कार्यकर्त्यांनी केलेली फटाक्यांची आतषबाजी, तब्बल 70 हजार फुलांची सजावट, पारंपरिक उत्साहात निघालेली मिरवणूक आणि सामान्य कार्यकर्त्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनी केलेले अभिवादन यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई नाका परिसरातील फुले स्मारकात दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जयंती समितीमार्फत सायंकाळी सात वाजता चित्ररथ आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
विचार-जागर साहित्य मंचच्या
वतीने विविध कार्यक्रम :
नाशिक येथील विचार-जागर साहित्य मंच यांच्या वतीने आयोजित महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरदेखील परिसंवाद, कथाकथन, काव्यसंमेलन, चर्चासत्र, मुलाखत अशा विविध उपक्रम मालिका राबविल्या जात आहेत. त्याचे उद्घाटन हुतात्मा स्मारक येथे प्रसिद्ध लोककवी, गीतकार प्रा. प्रशांत मोरे यांनी केले.
सप्तखंजेरीतून महापुरुषांच्या
कार्याचा जागर :
महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरू-शिष्य संयुक्त जयंतीनिमित्त ज्योती जन्मोत्सव समितीतर्फे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर हा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधनकार अभिजित गायकवाड यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी म. फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजपरिवर्तनासाठी शिक्षण व समतेची गरज अधोरेखित केली. यानंतर प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक व कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधनपर कीर्तन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *