न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ
सिडको : प्रतिनिधी
पुणे न्यायालयाला धमकी मिळाल्याच्या घटनेनंतर आता नाशिक न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली आहे. न्यायालयाचा सहावा मजला उडवून देण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपूर्वीही नाशिक न्यायालयाला अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा धमकी मिळाल्याने न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
यापूर्वी धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यानंतर पुन्हा धमकीचा ई-मेल प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी न्यायालय परिसरात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून परिसराची तपासणी करण्यात येत आहे.
ई-मेलमध्ये न्यायालयाच्या सहाव्या मजल्याचा उल्लेख असल्याने या मजल्यासह संपूर्ण परिसराची विशेष तपासणी केली जात आहे.न्यायालयीन कामकाजासाठी येणार्या नागरिकांची तसेच त्यांच्या वाहनांची तपासणी केली जात आहे. प्रवेशद्वारांवरही पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
पुणे न्यायालयानंतर नाशिक न्यायालयालाही वारंवार धमकीचे ई-मेल मिळत असल्याने न्यायालयीन परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे ई-मेल कोठून आणि कोणी पाठविले, याचा तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात पोलीस यंत्रणा सतर्क आहे.
Nashik court receives another threatening e-mail; mentions blowing up the sixth floor with a bomb.