1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर
नाशिक : प्रतिनिधी
मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वार्यामुळे नाशिक विभागातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य शासनाने विभागासाठी 145 कोटी 87 लाख 70 हजारांंच्या मदतीस मंजुरी दिली आहे. नाशिक विभागातील एक लाख 46 हजार 577 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले. 83 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले.
महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार द्राक्षबागा, कांदापीक, फळबागा, भाजीपाला तसेच गहू व इतर हंगामी पिकांना मोठा फटका बसला होता. विशेषतः काढणीस आलेल्या द्राक्षे व कांदा पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक भागांत गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान होऊन उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, तसेच बाजारमूल्यही घटले.
नाशिक जिल्ह्यातील 65 हजार 756 शेतकरी बाधित झाले. धुळे जिल्ह्यात 14 हजार 275, जळगाव 37 हजार 991, अहिल्यानगर 27 हजार 602 तर नंदुरबार जिल्ह्यात 953 शेतकरी प्रभावित झाले. शासन निर्णय दि. 18 मे 2026 नुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने मंजूर निधी थेट शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकार्यांकडून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून निधी वितरणाला गती देण्यात येत आहे. कृषी विभागाने भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पीकविमा, हवामान आधारित शेतीपद्धती व संरक्षित शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
इतर विभागांतील स्थिती
पुणे विभागातील 11 हजार 626 शेतकरी बाधित झाले. या विभागातील 5 हजार 616.93 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दहा कोटी 52 लाख 32 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील सात हजार 322 शेतकर्यांचे तीन हजार 749.22 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या विभागासाठी सहा कोटी 82 लाख 22 हजारांंची मदत मंजूर करण्यात आली आहे. नागपूर विभागातील एक हजार 96 शेतकर्यांना एक कोटी 64 हजारांंची मदत जाहीर झाली. 588 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
कोकण विभागात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील 413 शेतकरी बाधित झाले. 99.18 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या विभागासाठी 24.13 लाखांंची मदत मंजूर करण्यात आली. अमरावती विभागात 561 शेतकरी प्रभावित झाले असून, 213.14 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या विभागासाठी 36.43 लाखांंचा निधी मंजूर केला आहे.
Nashik division hit hardest by severe weather