109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर बनत चालली असून, प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 109 गावे आणि 238 वाड्यांना सध्या 118 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरच्या दररोज 256 फेर्या होत असून, सुमारे दोन लाख 574 नागरिकांना दिलासा मिळत आहे.
जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, येवला तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. येथे 36 गावे आणि 47 वाड्यांसाठी 33 टँकरच्या 55 फेर्या सुरू आहेत. मालेगाव तालुक्यात 16 गावे व 48 वाड्यांना 16 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. इगतपुरी, सिन्नर, नांदगाव, देवळा, चांदवड, सुरगाणा व पेठ तालुक्यांतही टंचाईची तीव्रता वाढली आहे.
बहुतांश भागांत 24 हजार लिटर क्षमतेच्या टँकरचा वापर करण्यात येत असून, काही ठिकाणी दहा हजार व 12 हजार लिटर क्षमतेचे टँकरही कार्यरत आहेत. प्रशासनाने गावांसाठी पाच आणि टँकरसाठी 47 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आवश्यकतेनुसार आणखी टँकर वाढविण्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, बागलाण, नाशिक, कळवण आणि निफाड तालुक्यांत सध्या टँकरची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आगामी काळात पावसाला उशीर झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी सुरू होते 143 टँकर
गेल्या वर्षी मे महिन्यात 143 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा 118 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, यंदा टँकरची संख्या कमी असली, तरी उन्हाची दाहकता अधिक असल्याने येत्या काही दिवसांत टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाणी जपून वापरण्याचे आवाहन
उन्हाची दाहकता आणि यंदा पावसाला विलंब होण्याचा अंदाज लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन केले आहे.
Water shortage is severe in the district.