निफाडच्या विद्यार्थ्यांची इस्रोपर्यंत ‘घे भरारी’!

अंतराळाच्या विश्वाला गवसणी घालण्याचा अनोखा उपक्रम

निफाड : विशेष प्रतिनिधी
ग्रामीण व तालुक्याच्या ठिकाणी शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकाशाची मर्यादा नसते, गरज असते ती केवळ योग्य दिशा आणि संधी देण्याची! याच विचारातून निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून ‘घे भरारी’ हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत निफाडमधील 15 गुणवंत विद्यार्थ्यांची थेट इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड केली होती.
पुणे विमानतळ ते कोचीन विमानतळ असा विमान प्रवास करत या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील एका अविस्मरणीय प्रवासाची अनुभूती घेतली. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा पहिलाच विमान प्रवास होता. या सहलीचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या जगाची प्रत्यक्ष ओळख करून देणे हा होता.
या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात विद्यार्थ्यांना बी. जी. गव्हाणे आणि निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे संस्थापक प्रा. उल्हास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रवासाची शिस्त, ज्ञानवृद्धी आणि प्रत्येक ठिकाणची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी त्यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
केरळमधील तिरुवनंतपूरम येथील थुंबा येथील ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीतून घडलेल्या या ऐतिहासिक केंद्राला भेट देणे हा विद्यार्थ्यांसाठी एक थरारक अनुभव होता. इस्रोच्या या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रॉकेट, उपग्रह, अंतराळ संशोधन आणि भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगतीविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाली. इस्रोच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी भारताच्या दक्षिण टोकावरील कन्याकुमारीला भेट दिली.

उद्याचा भारत घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न

‘घे भरारी’ हा केवळ एक शैक्षणिक प्रवास नसून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचा एक प्रामाणिक यज्ञ आहे. निफाडसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहूनही मुले इस्रोपर्यंत पोहोचू शकतात, विमानाचा प्रवास करू शकतात आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगू शकतात, हा दृढ विश्वास या उपक्रमाने निर्माण केला आहे. पालकांचा विश्वास, शिक्षकांची दिशा आणि विद्यार्थ्यांची जिद्द यातूनच उद्याचा प्रगत भारत घडत आहे. आज इस्रो पाहून परतलेली ही 15 मुले उद्याचे वैज्ञानिक, संशोधक आणि देशाचे भविष्य घडवतील, यात शंका नाही.

विज्ञान केवळ पुस्तकातून शिकायचे नसते, तर ते प्रत्यक्ष अनुभवायचे असते, प्रश्न विचारायचे असतात आणि मोठी स्वप्ने पाहायची असतात. ‘घे भरारी’ उपक्रमातून निफाडच्या विद्यार्थ्यांना इस्रोपर्यंत नेण्याचा आमचा हा प्रयत्न त्यांच्या आयुष्यातील मोठ्या स्वप्नांची पायाभरणी ठरावी. हीच मुले उद्याच्या भारताचे भविष्य उज्ज्वल करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
प्रा. उल्हास पाटील, (संस्थापक) प्रा. सविता पाटील (संचालिका)

Niphad students ‘take flight’ all the way to ISRO!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *