आस्वाद

नाशिककरांचा प्रश्न : विकास की रोजचा संघर्ष?

आज नाशिक शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सामान्य नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी शहरभर रस्ते खोदले गेले, झाडं तोडली गेलीपण या सगळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि दैनंदिन आयुष्याचा किती विचार केला गेला? हा प्रश्न आज प्रत्येक नासिककराच्या मनात आहे लेखन म्हणजे फक्त शब्द मांडणं नसतं कधी कधी लोकांच्या न बोललेल्या वेदनांनाही आवाज देणं असतं. आणि आज मी तेच मांडण्याचा प्रयत्न केला आहे जे स्वतः अनुभवतेय, रोज पाहतेय आणि सामान्य नागरिक सहन करत आहेत ते वास्तव शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न केला कारण शांत राहिलं तर त्रास कमी होत नाही पण आवाज उठवला तर कदाचित कुणीतरी जागं होईल नासिक शहर सध्या विकासकामांच्या नावाखाली अक्षरशः खोदून ठेवण्यात आलं आहे कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रस्ते रुंदीकरण, खोदकाम आणि झाडांची तोड सुरू आहे. पण या सगळ्यात सामान्य नागरिक मात्र रोज त्रास सहन करत आहेत एका बाजूला धुळीचे साम्राज्य, वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची वाढती संख्या तर दुसर्‍या बाजूला वर्षानुवर्षे सावली देणारी झाडंही निर्दयीपणे तोडली जात आहेत.
विकास आवश्यक आहेच पण तो नागरिकांच्या जीवावर का? आज नासिककरांचा प्रश्न फक्त एवढाच आहे, कामं कधी पूर्ण होणार आणि आम्हाला या त्रासातून दिलासा कधी मिळणार? रोज कामावर जाणार्‍या नागरिकांची अवस्था सवार्ंत वाईट झाली आहे सकाळी घरातून वेळेवर निघूनही वाहतुकीच्या कोंडीत तासन् तास अडकून राहावं लागतं. रस्ते खोदलेले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. महत्वाचे म्हणजे अपघात होण्याची भीती सतत मनात असते विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यायी रस्त्यांची योग्य व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी तर खोदकाम केलेले रस्ते अधिक धोकादायक ठरतात. काही ठिकाणी पुरेशी लाईट नाही, सूचनाफलक नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कुंभमेळा हा नाशिकसाठी अभिमानाचा विषय आहेच देशभरातून लाखो भाविक येथे येणार आहेत. त्यासाठी शहराचा विकास होणं आवश्यक आहे. पण विकास करताना नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा विचार होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वर्षानुवर्षे सावली देणारी झाडं तोडली जात आहेत त्या झाडांशी अनेकांच्या भावना जोडलेल्या होत्या.वाढत्या उष्णतेमध्ये आधीच नागरिक त्रस्त आहेत, त्यात हिरवळ कमी होत चालल्यामुळे पर्यावरणाचंही मोठं नुकसान होत आहे. आज सामान्य नागरिकांचा प्रश्न एवढाच आहे की, कामं सुरू आहेत, पण ती पूर्ण कधी होणार? नागरिकांनी अजून किती दिवस धूळ, ट्रॅफिक आणि जीवघेण्या रस्त्यांचा सामना करायचा? प्रशासनाने विकासकामांचा वेग वाढवून, सुरक्षिततेची योग्य काळजी घेऊन आणि नागरिकांना स्पष्ट माहिती देऊन हा त्रास कमी करणं गरजेचं आहे कारण विकास तेव्हाच खरा मानला जातो, जेव्हा तो सामान्य माणसाच्या आयुष्यात दिलासा आणतो संघर्ष नाही. रस्ते खोदताना फक्त माती उकरली जात नाही सामान्य माणसाचं रोजचं जगणंही विस्कटत असतं. लहान मुलं, वृद्ध लोकांना श्वास घेण्याचा त्रास, खोकला वाढतेय. दुकानांसमोर खोदकाम असल्यामुळे ग्राहक कमी झालेत, छोटे व्यवसाय अडचणीत आलेत.खोदलेले रस्ते, अंधार आणि योग्य सूचना नसल्यामुळे रात्री अपघात जास्त होतात.नागरिक वेळेवर कर भरतात, मग मूलभूत सुविधा सुरक्षित का नाहीत?खड्ड्यांमध्ये पाणी साचेल, चिखल होईल आणि अपघात अजून वाढतील.झाडं तोडली पण त्याच्या बदल्यात नवीन झाडं लावण्याचं काय? कोणता रस्ता किती दिवस बंद राहणार, काम कधी पूर्ण होणार याची स्पष्ट माहिती नाही. रुग्णवाहिका आणि इमर्जन्सी सेवा अडकतात. ट्रॅफिकमुळे इमर्जन्सीमध्येही जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिक विकासाच्या विरोधात नाहीत, पण विकासाच्या नावाखाली जर रोजचं जगणंच कठीण होत असेल, तर प्रश्न विचारणं चुकीचं नाही. ही कामं महत्त्वाची असली, तरी नागरिकांसाठी हा काळ रोजच्या संघर्षाचा ठरतोय.

Nashik residents’ question: Development or daily struggle?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

7 hours ago