नाशिकच्या नीतू सिंह यांची अमेरिकेत भरारी
नाशिकच्या मातीतल्या संस्कारातून घडलेल्या नीतू सिंह, जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ उटा सॉल्ट लेक सिटी, अमेरिकेतून उच्च शिक्षण पूर्ण. चिकाटी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर गाठले यशाचे शिखर!
नाशिकच्या नीतू सिंह यांना अमेरिकेत अत्याधुनिक कॅन्सर संशोधनासाठी नुकतीच पीएच.डी. प्राप्त झाली. सामान्य कुटुंंबात जन्मलेल्या आणि अमेरिकेत जाऊन स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करणार्या नीतू सिंह यांचे यश निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या स्वप्नवत प्रवासाचा घेतलेला धांडोळा…
नवीन काहीतरी करण्याची इच्छा आणि स्वप्नांचा पाठलाग करताना अफाट मेहनत करण्याची जिद्द उराशी बाळगत नाशिकच्या तरुणीने अमेरिकेत आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. स्वप्नं नुसती पाहायचीच नसतात, तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत यश मिळवायचे असते, हे नीतू सिंह यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास युवा पिढीसाठी नवीन दिशा देणारा आहे.
आरोग्य क्षेत्राबद्दल असलेली विशेष आवड, संशोधनाची ओढ आणि सतत शिकण्याची वृत्ती या जोरावर त्यांनी भारतापासून अमेरिकेपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आज त्या कॅन्सर निदान आणि उपचार क्षेत्रातील संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान
देत आहेत.
भारतातील शिक्षणापासून ते अमेरिकेतील अत्याधुनिक कॅन्सर संशोधनापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आरोग्य क्षेत्राबद्दल विशेष आवड आणि कुतूहल असलेल्या नीतू सिंह यांनी नाशिकमध्ये बॅचलर ऑफ फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. औषधनिर्मिती आणि संशोधन क्षेत्रातील नवकल्पनांचा अधिक अभ्यास करण्यासाठी त्यांनी नालसार विद्यापीठातून पेटंट लॉमध्ये पदव्युत्तर डिप्लोपा प्राप्त केला. यामुळे विज्ञान, संशोधन आणि बौद्धिक संपदा हक्क याविषयी त्यांना सखोल समज मिळाली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नीतू सिंह या कुटुंबातील परदेशात उच्च शिक्षण घेणार्या पहिल्याच विद्यार्थिनी आहेत. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी फार्मासिस्ट म्हणून काम करत रुग्णांच्या आयुष्यात औषधांचे महत्त्व जवळून अनुभवले. त्याचबरोबर परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. या अनुभवामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि संघर्ष करण्याची ताकद अधिक बळकट झाली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून अमेरिकेतील क्रेटन विद्यापीठात त्यांना पूर्ण शिष्यवृत्तीवर फार्मास्युटिकल सायन्समध्ये मास्टर्स शिक्षणाची संधी मिळाली. हे त्यांच्या संशोधन प्रवासातील महत्त्वाचे पाऊल ठरले. त्यानंतर त्यांनी एका स्टार्टअप कंपनीत असोसिएट सायंटिस्ट म्हणून काम करत औषध विकास, विश्लेषण पद्धती आणि संशोधन क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव मिळवला. यानंतर त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ उटा सॉल्ट लेक सिटी येथे मॉलिक्यूलर फर्मास्युटिक्समध्ये पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू कॅन्सरचे निदान आणि उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी मॉलिक्यूलर इमेजिंग आणि टार्गेटेड थेरपी यांचा समन्वय साधणे, हा होता. पीएच.डीदरम्यान नीतू सिंह यांनी कॅन्सर संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या संशोधनाचे लेख सायन्स अॅॅडव्हान्स, अॅॅडव्हान्स ड्रग डिलिव्हरी रिव्ह्यू आणि युरोपियन जर्नल ऑफ न्यूक्लियर मेडिसीन अॅण्ड मॉलिक्यूलर इमॅजिंग यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले. ओव्हेरियन कॅन्सरसाठी उपचारपद्धतीसंदर्भात त्यांनी पेटंटही मिळविले आहे. नाशिकमधील साध्या शैक्षणिक प्रवासापासून अमेरिकेतील अत्याधुनिक कॅन्सर संशोधनापर्यंत पोहोचलेल्या नीतू सिंह यांची कहाणी ही संघर्ष, मेहनत आणि स्वप्नावर विश्वास ठेवणार्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर करिअर घडविण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे. योग्य मार्गदर्शक, कुटुंबाची भक्कम साथ आणि मेहनतीची जोड लाभली तर अशक्य काहीच नसते, हे
लक्षात येते.
सामान्य कुटुंबातील कन्येची असामान्य कामगिरी
मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले उदयभान सिंह हे 1997 ला नोकरीच्या निमित्ताने नाशिकला आले आणि येथेच स्थिरावले. उदयभान सिंह यांना दोन मुले आणि दोन मुली. परिस्थिती कशी असली तरी त्यांनी मुलांना उच्च शिक्षण देण्यात जराही कसूर केली नाही. मुलांनीही परिस्थितीची जाण ठेवत अभ्यासात निर्भेळ यश संपादन करत यशाचा झेंडा रोवला आहे. त्यांचा एक मुलगा राहुल हा बी.टेक झाला. शेअर मार्केट कोच म्हणून काम करतो. तर दुसरा मुलगा रोहित हा एमबीए झाला असून, तो मुंबईत आयडीबीआय बँकेत आहे. एका मुलीचे लग्न झाले तर दुसरी मुलगी नीतू हिने अमेरिकेत नुकतीच पीएच.डी प्राप्त केली. सर्वसामान्य कुटुंब असलेल्या सिंह यांच्या मुलीने मिळविलेले हे यश कष्ट, जिद्द आणि मेहनतीचे फळ असल्याने कुटुंबात सध्या आनंद ओसंडून वाहत आहे.
The sky is small in front of aspirations!
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…