संपादकीय

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

– अश्विनी पांडे

पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी विभागनिहाय आणि वेळबद्ध लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, कामे मागे असलेल्या विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पार्किंगची कामे मार्च 2027पर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये हस्तांतरित करण्याचे, तर प्रमुख महामार्गांची कामे मे 2027अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंहस्थाकडे केवळ 50 दिवसांचा सोहळा म्हणून न पाहता, त्यानिमित्ताने होणारी पायाभूत सुविधा आणि विकासकामे सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना देतील, असे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ‘गांवकरी’शी संवाद साधताना सांगितले.

प्रश्न 1 : सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीची सध्याची स्थिती काय आहे?
उत्तर : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीला नियोजनबद्ध गती देण्यात आली असून, विविध विभाग आणि यंत्रणांच्या माध्यमातून सर्व प्रमुख कामांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. पायाभूत सुविधा, वाहतूक व पार्किंग, साधुग्राम, स्वच्छता, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, शहर सुशोभीकरण, डिजिटल सुविधा तसेच भाविक आणि नागरिकांसाठी आवश्यक सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. सिंहस्थाशी संबंधित विविध विभागांच्या कामांचे झचखड (झीेक्षशलीं चरपरसशाशपीं खपषेीारींळेप डूीींशा)च्या माध्यमातून नियमित निरीक्षण केले जात आहे. प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, भौतिक प्रगती, आर्थिक प्रगती, निविदा व कार्यादेशाची स्थिती तसेच निर्धारित वेळापत्रकानुसार कामाची पूर्तता याचा विभागनिहाय मागोवा घेतला जात आहे. त्यामुळे ज्या कामांमध्ये अपेक्षित प्रगतीपेक्षा तफावत आहे, त्यांची वेळेत दखल घेऊन आवश्यक तेथे सुधारणा आणि गती देण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. संभाव्य भाविकसंख्या, पर्वणीचे दिवस, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून आवश्यक त्या सुविधा आणि यंत्रणांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने त्यांना सुरक्षित, सुलभ आणि चांगला अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करीत आहेत.
ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार असून, अमृतस्नानाच्या प्रमुख तारखा 2 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि तिथी विभागणीमुळे नाशिकमध्ये 11 सप्टेंबर तर त्र्यंबकेश्वरमध्ये 12 सप्टेंबर 2027 अशा आहेत. या कालावधीत अपेक्षित मोठ्या भाविकसंख्येचा विचार करून पायाभूत सुविधा आणि सेवा-सुविधांची क्षमता निश्चित केली जात आहे. सिंहस्थासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित बाबींवरही विभागनिहाय वेळापत्रकानुसार काम सुरू असून, प्रत्येक महत्त्वाच्या घटकाचा नियमित आढावा घेतला जात आहे. त्यामुळे पर्वणीपूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सेवा आणि व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे.
प्रश्न 2 : मंजूर विकासकामांपैकी किती कामे पूर्ण झाली आहेत? उर्वरित कामांचे नियोजन काय?
उत्तर : सिंहस्थासाठी 19 विभागांच्या माध्यमातून 342 कामांचा, 26 हजार 624.87 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा राबविला जात आहे. एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका, एमएसआयडीसी, जिल्हा परिषद, महावितरण-महापारेषण, त्र्यंबकेश्वर व शिर्डी नगरपरिषद, मध्य रेल्वे, पोलिस, वन, जलसंपदा, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, एसटी महामंडळ आदी विभागांचा त्यात समावेश आहे. यापैकी 256 कामांच्या निविदा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली आहे. हे प्रमाण सुमारे 75 टक्के आहे. विविध प्रकल्पांच्या प्रत्यक्ष प्रगतीचा झचखडच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जात आहे. निर्धारित वेळापत्रकाच्या तुलनेत ज्या कामांमध्ये प्रगती वाढविण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आणि वेळबद्ध कृती आराखडा राबविला जात आहे. कामांना अपेक्षित गती मिळावी आणि सर्व प्रकल्प निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावेत, यासाठी वरिष्ठ स्तरावरून सातत्याने देखरेख व आढावा घेतला जात आहे. पार्किंगची नागरी कामे मार्च 2027पर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन आहे. घोटी-त्र्यंबक-जव्हार फाटा तसेच नाशिक-पेठ या महत्त्वाच्या महामार्गांच्या कामांचे लक्ष्य 31 मे 2027पर्यंत ठेवण्यात आले आहे.
प्रश्न 3 : भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा मिळाव्यात यासाठी काय विशेष नियोजन आहे?
उत्तर : सिंहस्थासाठी स्वच्छता आणि भाविकांच्या सुविधांचे नियोजन संभाव्य गर्दीच्या प्रमाणात करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात 7 हजारांहून अधिक कचरापेट्या, 14 हजार 500हून अधिक स्वच्छता कर्मचारी, 56 हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे आणि 2 हजार
…/-2
(पान 1 वरून)
कपडे बदलण्याच्या खोल्या उभारण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांच्या देखरेखीसाठी आयसीटी आधारित यंत्रणा वापरण्यात येणार असून, 8 लाख लाइनर बॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बॅग दिवसातून दोन वेळा बदलण्यात येतील. कचरा संकलनासाठी 130हून अधिक अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत. साधुग्राम हे केवळ तात्पुरते निवासस्थान न राहता एक स्वतंत्र तात्पुरते शहर म्हणून विकसित केले जात आहे. नाशिकमध्ये 6 विभागांमध्ये 1 हजार 600 एकर जागेवर साधुग्राम उभारले जाणार असून, येथे सुमारे 10 लाख साधू व भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 700+ एकर क्षेत्रात तीन विभागांत साधुग्राम उभारले जाणार असून, सुमारे 3 लाख भाविकांची क्षमता असेल.
दोन्ही साधुग्राममध्ये प्रशासन व पोलिस यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार केंद्रे, एकात्मिक नियंत्रण व कमांड केंद्र, डिजिटल हरवले-सापडले केंद्र, पिण्याच्या पाण्याचे एटीएम, बँक व एटीएम, रेशन दुकाने, निवास व्यवस्था, न्यायालय व सर्किट हाउसची व्यवस्था तसेच आखाड्यांसाठी स्वतंत्र पंडाल असतील. घाट दुरुस्ती, दर्शनी भागांचे सुशोभीकरण, दिशादर्शक व सुरक्षाविषयक फलक, विद्युत रोषणाई आणि कलाकृतींच्या माध्यमातून शहराचे सुशोभीकरणही करण्यात येत आहे.
प्रश्न 4 : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
उत्तर : वाहतूक नियोजनासाठी आयआयएम नागपूरच्या माध्यमातून सविस्तर एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात भाविकांची संख्या, मार्गनिहाय वाहतूक सिम्युलेशन, घाटांवरील पादचारी गर्दीचे विश्लेषण आणि एकात्मिक नियंत्रण केंद्राशी जोडलेली लॉजिस्टिक व्यवस्था यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये 18 पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, 1 हजार 100 हेक्टर क्षेत्रात सुमारे 3.11 लाख ईसीएस वाहनक्षमता उपलब्ध होणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 12 ठिकाणी 600 हेक्टर क्षेत्रात सुमारे 1.7 लाख ईसीएस क्षमता उपलब्ध होईल. याशिवाय सुमारे 1 हजार 200 हेक्टर क्षेत्रात अतिरिक्त वाहन होल्डिंग क्षेत्राचे नियोजन आहे. तरीही पार्किंगची संभाव्य कमतरता लक्षात घेऊन अतिरिक्त जागेचा शोध सुरू आहे. गर्दीच्या काळात शेजारील जिल्ह्यांतील जागांचाही वापर करण्याचे नियोजन केले जात आहे.
भाविकांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून एकूण 4 हजार 500 बसचे नियोजन आहे. त्यापैकी 2 हजार 625 बस रस्ते वाहतुकीसाठी, तर 1 हजार 200 बस रेल्वे स्थानकांवरील शटल सेवेसाठी असतील. उर्वरित बस राखीव असतील. या व्यवस्थेतून दररोज सुमारे 26 लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेच्या सहा स्थानकांवरून दररोज सुमारे 159 फेर्‍यांचे नियोजन असून, 48 नियमित आणि 32 विशेष गाड्या प्रत्येक दिशेने चालविण्याचे नियोजन आहे. संपूर्ण 50 दिवसांच्या कालावधीत रेल्वेने जवळपास 2 कोटी प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
नाशिकचा 65.66 किलोमीटरचा रिंग रोड सुमारे 3 हजार 659 कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. 25 गावांमधील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून, हा रिंग रोड भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रश्न 5 : गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि घाट परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय ठोस उपाय आहेत?
उत्तर : गोदावरीचे संरक्षण ही एकत्रित स्वरूपाची प्रक्रिया आहे. 56 हजारांहून अधिक तात्पुरती स्वच्छतागृहे, 14 हजार 500हून अधिक स्वच्छता कर्मचारी, कचरा संकलन आणि लाइनर बॅगची स्वतंत्र व्यवस्था यामुळे नदीकाठावर उघड्यावर शौच आणि कचरा जाण्याचे प्रमाण रोखले जाणार आहे. घाटांवर जमा होणार्‍या निर्माल्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प राबविला जात आहे. फुले आणि पूजासाहित्यापासून अगरबत्ती, सेंद्रिय खत तसेच पर्यावरणपूरक उत्पादने तयार केली जाणार आहेत. कपड्यांच्या कचर्‍यासाठीही स्वतंत्र संकलन केंद्रे उभारण्यात येणार असून, संकलित कपड्यांचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करून पिशव्या, चटया आणि इन्सुलेशनसारखी उत्पादने तयार केली जातील. ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यावर भर आहे. नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेसारख्या उपक्रमांमधून नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि स्वयंसेवकांना सहभागी करून घेतले जात आहे. त्र्यंबकेश्वर साधुग्राम परिसरासाठी स्वतंत्र पावसाळी पाणी निचरा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
जुलै 2026मध्ये गोदावरीला मोठा पूर आल्याच्या पार्श्वभूमीवर होळकर पूल, नंदिनी घाट आदी ठिकाणी नदीपातळी आणि विसर्गाचे रिअल टाइम निरीक्षण केले जात आहे. अतिवृष्टी किंवा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास स्नानाला परवानगी द्यायची की निर्बंध आणायचे, याबाबत आखाड्यांच्या समन्वयाने कार्यपद्धती निश्चित केली जात आहे.
प्रश्न 6 : विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय कसा साधला जात आहे?
उत्तर : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण हे समन्वयक आणि प्रमुख यंत्रणा म्हणून काम करीत आहे. 19 विभाग आणि यंत्रणांच्या 342 कामांचा एकत्रित प्रकल्प आराखडा तयार करून त्याचा नियमित आढावा घेतला जात आहे. जमीन, पार्किंग आणि वाहतूक यांसारख्या विषयांवर पोलिस, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागांच्या संयुक्त पाहण्या घेतल्या जात आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, भारतीय हवामान विभाग, भारतीय रेल्वे, आणि सी-डॅक यांसारख्या संस्थांशी तांत्रिक समन्वय साधला आहे. सहा स्वतंत्र आपत्कालीन नियंत्रण केंद्रांना एकत्रित करून ‘युनिफाइड एरिया कमांड’च्या माध्यमातून एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्राशी जोडले जात आहे. आयआयएम-नागपूर वाहतूक आणि गर्दीचे विश्लेषण, आयआयटी-दिल्ली गर्दीच्या प्रवाहातील अडथळ्यांचा अभ्यास, आयआयएम-मुंबई आर्थिक परिणामांचा अभ्यास, तर एमआयटीच्या सेन्सेबल सिटी लॅबकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गर्दी व्यवस्थापनाचा अभ्यास केला जात आहे. कामांची गुणवत्ता आणि विभागांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पाहणी, त्रुटी नोंद अहवाल आणि त्यावरील पूर्ततेचा नियमित मागोवा घेतला जात आहे.
प्रश्न 7 : सिंहस्थाच्या माध्यमातून स्थानिक नागरिक आणि व्यापार्‍यांना दीर्घकालीन फायदा कसा होणार?
उत्तर : सिंहस्थ हा केवळ 50 दिवसांचा धार्मिक सोहळा नसून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या दीर्घकालीन विकासाची मोठी संधी आहे. आयआयएम मुंबईच्या माध्यमातून मे ते डिसेंबर 2027 या कालावधीत आर्थिक परिणामांचा स्वतंत्र अभ्यास करण्यात येणार आहे. पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, डिजिटल व्यवहार आणि इतर संबंधित क्षेत्रांवर सिंहस्थामुळे होणारा थेट, अप्रत्यक्ष आणि प्रेरित आर्थिक परिणाम या अभ्यासातून मोजला जाणार आहे. ‘अनेक’ उपक्रमांतर्गत जून 2026 ते डिसेंबर 2027 या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील 2 हजार सूक्ष्म उद्योगांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून व्यवसायाची तयारी, बाजारपेठेशी जोडणी, औपचारिक कर्जसुविधा आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून सह्याद्री फार्म्स-टाटा स्ट्राइव्ह यांच्या सहकार्याने 4 हजार 300 स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2027 या कालावधीत हॉस्पिटॅलिटी, टूर गाइड, इलेक्ट्रिशियन, प्रथम प्रतिसादक, आरोग्य सहाय्यक यांसह विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण, कौशल्यवृद्धी, उद्योजकता आणि पूर्वानुभवाची अधिकृत नोंद यावर भर दिला जात आहे.
रिंग रोड, सुधारित रेल्वे स्थानके, राम कल पथ, द्वारका चौकातील सुधारणा, शहर सुशोभीकरण, हेरिटेज वॉक आणि सायकलिंग ट्रेल्स यांसारख्या कायमस्वरूपी सुविधा सिंहस्थानंतरही नागरिकांच्या उपयोगी पडणार आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळविण्याच्या प्रयत्नांनाही यामुळे चालना मिळणार आहे.
प्रश्न 8 : वाढत्या भाविकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे?
उत्तर : आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आले आहे. सिंहस्थासाठी 17 प्रकारचे धोके निश्चित करण्यात आले असून, नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरासाठी आठ आपत्ती गटांमध्ये 30 सविस्तर प्रतिसाद परिस्थिती तयार करण्यात आल्या आहेत.
सुमारे 1 हजार प्रशिक्षित कर्मचार्‍यांचे ‘कुंभ सहाय्यक कार्यबल’ तयार केले जात असून, त्यांचे 50 बहुकौशल्यपूर्ण आपत्ती प्रतिसाद पथकांमध्ये संघटन केले जाणार आहे. याशिवाय 15 हजार आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांसाठी एकात्मिक स्वयंसेवक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येत आहे.
हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामान विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने चार स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणामार्फत पाच भूकंप निरीक्षण केंद्रे उभारण्यात येत आहेत. महापालिका, पोलिस, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह विविध विभागांसाठी क्षमता वृद्धीच्या प्रस्तावांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. यात ड्रोनसह अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे, एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली आणि मोठ्या प्रमाणावरील दुर्घटनांमध्ये उपचारासाठी ‘भीष्मा’ मेडिकल क्युब्सचा समावेश आहे.
ऑगस्ट 2026 मध्ये टेबलटॉप, कार्यात्मक आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय सरावांचे आयोजन केले जाणार असून, पर्वणीपूर्वी पूर्ण क्षमतेची मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. अमृतस्नानाच्या तारखा बदलता येत नसल्याने त्या दिवशी गोदावरीला पूरस्थिती निर्माण होणे हा सर्वाधिक परिणामकारक धोका मानला आहे. त्यामुळे कोपरगाव, पुणतांबा आणि पैठण येथे पर्यायी घाटांचा विचार करण्यात आला असून, गरज भासल्यास भाविकांना सुरक्षितपणे वळविण्यासाठी आवश्यक व्यवस्था आणि कार्यपद्धती तयार केली जात आहे.
प्रश्न 9 : सिंहस्थाला आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्यासाठी कोणते डिजिटल उपक्रम राबविले जात आहेत?
उत्तर : नाशिक सिंहस्थ 2027 हा ‘डिजिटल कुंभ’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. गर्दी व्यवस्थापन व निगराणी, वाहतूक व पायाभूत सुविधा व्यवस्थापन, आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन आणि डिजिटल भाविक सेवा या चार प्रमुख स्तंभांवर डिजिटल यंत्रणा उभारली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘डिजिटल ट्विन’ ही त्यातील महत्त्वाची संकल्पना आहे. एकात्मिक कमांड आणि नियंत्रण केंद्राशी जोडलेल्या जीआयएस आधारित 2डी आणि 3डी नकाशांमुळे सिंहस्थ परिसराची प्रतिकृती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होईल. त्याचा वापर गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती जोखीम, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता तसेच हरवले-सापडले आणि नागरिक सेवांसाठी केला जाणार आहे.
‘कुंभदूत’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल सहाय्यक व्हॉट्सप, आयव्हीआर, संकेतस्थळ आणि मोबाइल पच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आवश्यकतेनुसार नकाशे, प्रवास, हॉटेल, वाहतूक आणि डिजिटल पेमेंटसारख्या सेवांशी त्याची सांगड घातली जाणार आहे. यासोबतच ‘महासिंहस्थ कुंभ एआय स्टॅक’ उभारला जात असून, त्यात विविध एआय एजंट, एआय सॅण्डबॉक्स आणि नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी डेटा व्यवस्थापन, पक्षपात तपासणी आणि तक्रार निवारणाची व्यवस्था असेल. मोबाइल नेटवर्क, खासगी नेटवर्क, महत्त्वपूर्ण सेवांसाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था, व्यवस्थापित वाय-फाय आणि उपग्रह आधारित फायबर बॅकअप अशा पाच स्तरांची दूरसंचार यंत्रणा उभारण्यात येत आहे. पर्वणीच्या दिवशीही संपर्क व्यवस्था खंडित होऊ नये, हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सप्टेंबर 2026मध्ये नाशिकमध्ये राष्ट्रीय टेक समिट आणि हॅकाथॉन आयोजित करण्याचे नियोजन असून, एमआयटी सेन्सेबल सिटी लॅबसोबत दोन वर्षांचा संशोधन प्रकल्पही राबविला जात आहे.
प्रश्न 10 : सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, याबाबत नाशिककरांना काय आश्वासन द्याल?
उत्तर : सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी विभागनिहाय आणि वेळबद्ध लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. पार्किंगची कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये हस्तांतरित करण्याचे लक्ष्य आहे. प्रमुख महामार्गांची कामे मे 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साधुग्राम, स्वच्छता, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनासह प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अंमलबजावणी आराखडा तयार आहे.
सध्या नियमित आढावा, प्रत्यक्ष पाहणी, त्रुटी नोंद अहवालांची पूर्तता आणि विभागनिहाय जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक कठोर करण्यात आली आहे. ज्या विभागांची कामे मागे आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन आवश्यक तेथे तातडीने सुधारणा करण्यात येत आहेत. नाशिककरांना विश्वास देताना एवढेच सांगता येईल की, सिंहस्थ हा केवळ 50 दिवसांचा सोहळा म्हणून पाहिला जात नाही. रिंग रोड, सुधारित रेल्वे स्थानके आणि रस्ते, प्रशिक्षित स्थानिक मनुष्यबळ, पर्यटन आणि वारसा संवर्धनाच्या सुविधा या सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना देणार आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ हा श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक विकासाचा संगम ठरणार आहे. देश-विदेशातून येणार्‍या कोट्यवधी भाविकांचे स्वागत करताना त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि अविस्मरणीय अनुभव देणे, तसेच सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला नवी दिशा मिळणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. प्रशासन, नागरिक आणि सर्व भागीदारांच्या सामूहिक प्रयत्नांतून 2027चा सिंहस्थ नाशिकच्या विकासातील एक नवा मैलाचा दगड ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.

Nashik’s development will receive a boost even after Simhastha: Shekhar Singh

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

14 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

14 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

14 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

14 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

15 hours ago

खाणपट्टेधारक-ठेकेदारांची आज बैठक

उपलब्धतेचा तातडीने आढावा नाशिक : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांना वेग…

15 hours ago