नवी दिल्ली : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील ‘येवला पैठणी’ला आता राष्ट्रीय स्तरावर विशेष बहुमान मिळाला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नुकत्याच पार पडलेल्या 12 व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या विशेष सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. या ऐतिहासिक सन्मानामुळे महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या पूर्वापार चालत आलेल्या हातमाग वस्त्रांची कीर्ती आता देशभरात अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे.
येवला पैठणी ही केवळ एक साडी नसून, ती पिढ्यान्पिढ्या विणकरांनी जतन केलेली एक अत्यंत कौशल्यपूर्ण कला आहे. अत्यंत बारकाईने हातमागावर विणल्या जाणार्या या पैठणीवर मोर, कमळ, आसावली, मुनीया आणि नारळी यांसारखी पारंपरिक नक्षी रेखाटली जाते, जी तिचे वेगळेपण सिद्ध करते. कारागिरांच्या अथक परिश्रमांतून आणि अंगभूत कौशल्यातून साकारल्या जाणार्या या सांस्कृतिक वैभवाला आता टपाल तिकिटाच्या रूपात कायमस्वरूपी ओळख प्राप्त झाली असून, यामुळे स्थानिक विणकरांच्या कलेचा मोठा गौरव झाला आहे.
विणकरांच्या कुटुंबांना मोठे बळ
हा राष्ट्रीय सन्मान येवल्याच्या अर्थव्यवस्थेला आणि हजारो विणकरांच्या कुटुंबांना मोठे बळ देणारा ठरणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून येवल्यात ’पैठणी पर्यटन केंद्र’ आणि ’पैठणी क्लस्टर’ विकसित केले जात आहे. या माध्यमातून विणकरांना आधुनिक तंत्रज्ञान, नवीन डिझाइन्सचे प्रशिक्षण आणि थेट जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असून, पर्यटकांनाही पैठणी निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या सर्वंकष प्रयत्नांमुळे पारंपरिक कलेचे जतन होण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या आणि आर्थिक स्थैर्याच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत.
National honor for Yeola Paithani; special postage stamp unveiled by the President.