आस्वाद

नवरात्र : जागर स्वत्वाचा

– सुप्रिया सुरवाडे

नवरात्र म्हणजे स्थिरता-साहस-तप -सृजन-मातृत्व-अस्तित्व-ममत्व-शक्ती- धैर्य-स्वातंत्र्य-आदर या सर्व गुणांची एकरूपता असणार्‍या शक्तीचा जागर…
विशेष म्हणजे नवरात्रीत घटस्थापना केली जाते… घटस्थापना म्हणजे नेमकं काय? तर मातीवर धान्य पेरून त्यावर एक मातीचा घडा आपण स्थापन करतो… ही सहज आणि सर्वांना माहीत असणारी व्याख्या… पण दुसरी गोष्ट अशी की, घटस्थापना करतो म्हणजे एका शक्तीची स्थापना नऊ दिवस एकाच ठिकाणी करणे… दुसरी बाजू पाहता स्त्री म्हणजे स्वभावताच चंचल आणि त्या स्त्रीचे चंचलत्व नऊ दिवस एका ठिकाणी स्थापून, ती ऊर्जा, ती शक्ती ते चैतन्य, त्यातून मिळणारी प्रचंड ऊर्जा हे अनुभवण्याचा अवसर म्हणजे घटस्थापना… घटस्थापनेमध्ये आपण स्वतःच तत्त्व… स्वतःच्या आतमध्ये काही पेरणे गरजेचे आहे…ज्यातून शुद्धता येईल, पावित्र्यता येईल, नवचैतन्य आपल्यामध्ये जागृत होईल.. सुप्त अवस्थेमध्ये असणार्‍या शक्तींंना जागृत करण्यासाठी घटस्थापना फक्त बाह्य नाही, तर आंतरिकसुद्धा करणं गरजेचं असतं… आणि हीच खरी त्या ऊर्जेची स्थापना म्हणता येईल किंवा त्या शक्तीची खरी पूजा म्हणता येईल…
दैत्यांचा वध करण्यासाठी देवीने अवतार धारण केला…असूरांवर तिने विजय प्राप्त केला, हे सर्व कथानक आपण ग्रंथांमधून वाचत आलेलो आहोत, पण त्यातून महत्त्वाचं काय…? नवरात्रीचे सुरुवातीचे तीन दिवस म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचं तत्त्व त्या ठिकाणी कार्यरत असतं… मग सत्त्वगुण कार्यरत करण्यासाठी काय करावे लागेल तर देवीची साधना. जे काही असुर म्हणजे काम, क्रोधादी विकार आहेत त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी देवीला शरण जाऊन, देवीची प्रार्थना करणं आणि अधिकाधिक सत्त्वगुण स्वतःमध्ये कसा वाढेल यासाठी देवीला प्रार्थना करणे… ज्या प्रकारे देवीने स्वतःच्या शक्तींनी, स्वतःच्या सत्त्वगुणांनी रजगुणात्मक आणि तमगुणात्मक असणार्‍या असुरांवर विजय प्राप्त केला त्याप्रकारे आपल्यामध्ये असणार्‍या अनेक विकारांवर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह या सर्वांवर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्यातला सत्त्वगुण वाढवला पाहिजे… म्हणजेच आपण त्या असुरांवर विजय प्राप्त करतो … देवी म्हणजे प्रकृती. तिलाच माया म्हटलं जातं आणि हीच माया जीवसृष्टीला खेळवत असते… कधी भ्रमात पाडत असते आणि आपण त्याच भ्रमात सुखदुःखाच्या लाटांवर हिंदोळे घेत असतो… मात्र, ज्या दिवशी आपल्याला ही जाणीव होते की, या मायेच्या पलीकडे काहीतरी आहे किंवा त्यातून आपल्याला बाहेर जायचं आहे, तेव्हा मनुष्य देवीची शरणागती करतो आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी नवरात्र म्हणजे साधण्याची एक पर्वणीच आहे… स्वतःचा सुप्त शक्तींना जागृत करून, कुंडलिनी शक्तीपासून ती शक्ती जागृत होऊन सर्व चक्रांना भेदन करून ती जेव्हा जागृत होते आणि ही जागृत करण्याची शक्ती या नऊ नवरात्रीमध्ये असते…
देवीचे सिंहासन म्हणजे सिंह आहे. सिंह हा अतिशय आक्रमक, क्रोधी आणि प्रचंड शक्तीचं प्रतीक… सिंहावरची स्वारी म्हणजेच देवीची शक्ती, तेज, शौर्य आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आहे. नऊ दिवसांत देवीची नऊ रूपे पूजली जातात….ज्यामध्ये शैलपुत्री म्हणजे शैलातून जन्मलेली… अनुभवाच्या शिखरातून जन्मलेली शैलपुत्री… स्वतःच्या मुळांची
स्वतःच्या अस्तित्वाची ओळख देणारी… दुसरी म्हणजे ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे अनंतात संचार करणारे, कुमारी स्वरूपा असणारी, नावीन्यता असणारी आणि स्वतःच्या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रचंड तप करणारी अशी ब्रह्मचारिणी…
चंद्रघंटा चंद्र म्हणजे मनाचे प्रतीक, मन मोहणारी सौंदर्याचे मूर्तस्वरूप म्हणजे चंद्रघंटा… कूष्मांडा म्हणजे प्रचंड ऊर्जा स्वरूप असणारी, जिच्यामध्ये सृजनत्व आहे…स्कंदमाता म्हणजे मातृशक्ती, जी सर्व 64 कलांची, बुद्धीची जननी आहे, सहा शास्त्र, वेदांचे अंग हे सर्व तिच्यामध्ये आहे अशी स्कंदमाता… कात्यायनी अंतर्ज्ञानाची शक्ती, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी शक्ती.. कालरात्री म्हणजे लख्ख ऊर्जेचे प्रतीक… जी अनंत विश्वामध्ये निवास करते… महागौरी जीवनाला गती आणि अंतिम स्वातंत्र्य देणारे शक्ती… सिद्धिदात्री म्हणजेच सर्व सिद्धी बहाल करणारी परिपूर्णता देणारी शक्ती… अशी ही देवीची नऊ रूपे, अजूनही दश महाविद्या, अनेक रूपांत देवी विस्तारलेली आहे… मात्र, वास्तविक पाहता तिचा विस्तार आज आपण फक्त मंदिराइतकाच मर्यादित ठेवला आहे. देवीची खरी शक्ती म्हणजे स्त्री आहे आणि हे स्त्री-तत्त्व म्हणजे पृथ्वीवर चालतेबोलते देवीचे प्रतीक आहे. मात्र, आज त्याच देवीच्या तत्त्वाला आपण किती स्वातंत्र्य देतोय? किती तिला पूजनीय, महनीय ठेवले आहे? जी देवी आपण मंदिरात भावाने पूजन करतो तीच जिवंत स्त्री. तिला आपण किती सन्मान देतो? या गोष्टींचाही विचार होणं गरजेचं आहे. मंदिरातल्या देवीची पूजा करणे सोपं आहे. अवघड आहे. घरातल्या स्त्रीला तिच्या अधिकाराने जगू देणे. स्वतंत्रता देऊन तिचा आदर करणे, तिच्या स्वप्नांना दिशा देणे… देवीचा आत्मसन्मान म्हणजे आपण तेज म्हणतो, पण तेच जर एखाद्या स्त्रीने केले तर त्यालापण अहंकार म्हणतो… देवी स्वतःचा निर्णय घेते. राक्षसांचा वध करते, तेव्हा ..ती देवीची शक्ती असते मात्र जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या स्वप्नांसाठी लढण्यासाठी सिद्ध होते तेव्हा मात्र स्त्रीला वेगळ्या शब्दांनी हिणवलं जातं… जेव्हा देवी स्कंदमाता होते तेव्हा ती मातृत्व जोपासते, पण मातृत्व म्हणजे एका स्त्रीच पूर्ण अस्तित्व नाही, तर त्याही पलीकडे जाऊन तिथे स्वतःचे काही स्वप्न आहेत, तिचं जीवन आहे, तिची ओळखच फक्त मातृत्वामध्ये विलीन न होता, स्वतःसाठी स्त्रीला जगण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे… कालीमातेला क्रोध येतो… कालरात्रीला क्रोध येतो तेव्हा ती देवीची शक्ती असते. मात्र, ते जर एखाद्या स्त्रीला क्रोध आला तर मात्र तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो… देवीच्या हातात अस्त्र असेल तर देवीचे पूजन केलं जातं मात्र तेच अस्त्र जर एखादी स्त्रीने घेतले तर…? महाकाली तिचा रंग सावळा आहे काळा आहे, तर त्या काळा रंगाची पूजा केली जाते. मात्र, तीच मुलगी किंवा स्त्री जर गौर वर्णाची असेल तर तिला समाज कशाप्रकारे हिणवतो… म्हणजे माणसाने माणसाच्या मतीप्रमाणे सर्व तत्त्व लागू केलीत… मंदिरातली देवी आणि घरातली स्त्री यांतील देवत्वाचं विभाजन केलं…
म्हणून नवरात्र म्हणजे फक्त देवीचे उपवास, पोथीपुराण इथपर्यंत न ठेवता..स्वतःच्या साधनेच्या दृष्टीने… स्वतःच्या कृतीच्या आणि विचारांच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलणे आहे….नकारात्मक, बुरसटलेले, अंधःकार असलेले विचार टाकून देऊन सकारात्मकतेचा स्वीकार करणं म्हणजे खरी नवरात्री…तीच खरी देवीची पूजा..!

Navaratri: An Awakening of the Self

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

1 day ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

2 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

2 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

2 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

2 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

2 days ago