– डॉ. स्वप्नील तोरणे
प्रिय स्मृती,
आज तुला हे पत्र लिहिताना मनात आनंद आहे, अभिमान आहे. आता तुझ्या खांद्यावर फक्त कर्णधाराची पट्टी नाही, एका स्वप्नाची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर एका चाहत्याच्या मनातली थोडीशी काळजीही आहे. कारण आज तुझ्या खांद्यावर केवळ भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा आलेली नाही, कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं स्वप्नही तुझ्या हाती आलं आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत तू डावाची सुरुवात करणारी ती डावखुरी फलंदाज होतीस आजपासून तुला एका संपूर्ण पिढीच्या डावाची सुरुवात करायची आहे आणि हा बदल जितका सन्मानाचा आहे, तितकाच तो आव्हानात्मकही आहे. तुला कर्णधार म्हणून पाहताना आम्हाला तुझं आजचं रूप जितकं दिसतं, तितकाच तुझा प्रदीर्घ प्रवासही आठवतो. 2013 मध्ये भारतीय संघाची जर्सी अंगावर चढवणारी एक तरुण मुलगी आणि आज, तेरा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासानंतर, त्याच जर्सीवर नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणारी एक परिपक्व क्रिकेटपटू. या प्रवासात टाळ्या होत्या, विक्रम होते, शतके होती, पण पराभवही होते. अपेक्षांचं ओझं होतं. टीकेची धार होती. कधी स्वतःच्या फॉर्मशी संघर्ष होता, तर कधी संघाच्या अपयशाची वेदनाही होती, पण कदाचित याच सगळ्या अनुभवांनी आजची स्मृती घडवली आहे. तुझ्या फलंदाजीचं कौतुक करताना लोक अनेकदा तुझ्या कव्हर ड्राइव्हचा उल्लेेख करतात. तुझ्या बॅटमधून चेंडू सीमारेषेकडे झेपावतो, तेव्हा तो फक्त चौकार नसतो; त्यात एक विलक्षण सहजता असते.
जणू क्रिकेट तुला शिकवावं लागत नाही ते तुझ्याशी स्वतःच संवाद साधतं. पण तुझ्या खेळाचं खरं सौंदर्य मला तुझ्या धावांपेक्षा तुझ्या पुन्हा उभं राहण्यात दिसतं. कारण प्रत्येक महान खेळाडूच्या कारकीर्दीत अपयशाचे काही काळे ढग असतात. काही सामने विसरावेसे वाटतात. काही निर्णय मनाला लागतात. काही डाव अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. पण इतिहास फक्त त्या अपयशांची नोंद ठेवत नाही. तो विचारतो, पडल्यानंतर तू पुन्हा किती ताकदीने उभी राहिलीस? आणि या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे
स्वतःच्या प्रवासातून आलेलं आहे. तू केवळ भारताची आघाडीची फलंदाज झाली नाहीस; काळाच्या ओघात तू भारतीय महिला क्रिकेटच्या बदलत्या चेहर्यांपैकी एक बनलीस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या महिला फलंदाजांमध्ये अग्रस्थानी पोहोचणं आणि विविध प्रकारांत विक्रमांच्या उंचीवर जाणं, ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही. त्या प्रत्येक धावेच्या मागे एक सकाळ आहे. एक सराव आहे. एक थकलेलं शरीर आहे. एक अपयशी सामना आहे. आणि दुसर्या दिवशी पुन्हा मैदानावर उतरण्याची तयारी आहे. आता मात्र प्रश्न थोडा वेगळा आहे. आतापर्यंत तू स्वतःसाठी आणि संघासाठी धावा करत होतीस. आता तुला संघाला दिशा द्यायची आहे.
हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेटच्या एका महत्त्वपूर्ण पर्वाचं नेतृत्व केलं. तिच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 मध्ये पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला-भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील तो एक सुवर्णक्षण होता. अशा पर्वानंतर कर्णधारपद स्वीकारणं म्हणजे केवळ एक पद स्वीकारणं नव्हे. तो एक वारसा स्वीकारणं आहे. तुझ्याकडे नेतृत्वाचा अनुभव आधीपासूनच आहे. भारतासाठी तू यापूर्वी सहा टी-20 आणि तीन वन-डे सामन्यांत नेतृत्व केलं आहेस.
कर्णधार होणं म्हणजे प्रत्येक निर्णय अचूक घेणं नव्हे; चुकीच्या निर्णयाची जबाबदारीही स्वतःच्या नावावर घेण्याचं धैर्य असणं होय. हीच तुझी खरी परीक्षा असेल. आपण पुन्हा जिंकू शकतो. तुझ्या नव्या पर्वासाठी मनापासून शुभेच्छा. जिंकताना आम्ही तुझ्यासोबत असूच, पण हरल्यानंतर पुन्हा उभी राहताना तुझ्या पाठीशी उभं राहणं, हीच एका चाहत्याची खरी जबाबदारी असेल.
– एक भारतीय क्रिकेटप्रेमी
An open letter to women’s cricket captain Smriti Mandhana
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…