– श्रीराम शिंगणे
नेहरू चौक म्हणजे नाशिकचा कणा. एक काळ असा होता की सर्वच राजकारण, समाजकारण याच भागातून चालायचे. साधारण पन्नासच्या दशकात पंडित नेहरू यांची सभा नाशिकला झाली आणि या चौकाचे नेहरू चौक नामकरण झाले.
याच नेहरू चौकात नगरसेवक रघुवीर भालेराव यांचे आदर्श धृतालय नामक दह्याचे दुकान होते. याच दुकानातून त्यांचे राजकारण चाले. तर विजय हिंदू लॉजच्या इमारतीमध्ये काकासाहेब सोलापूरकर यांचे रद्दीचे दुकान होते. त्यांचेदेखील राजकीय डावपेच याच दुकानातून होत असत. काकासाहेब सोलापूरकर हे अगदी सकाळी 9 लाच त्यांच्या दुकानांत हजेरी लावत असत. गटार तुंबली, लाईट गेली, मुलासाठी नोकरी नसेल, इतकेच काय अगदी वैयक्तिक अडचणीचीदेखील त्यांच्याकडे मांडणी होत असे. या अडचणींमधून काकासाहेब अगदी योग्य मार्ग काढत असत. थोड्याफार फरकाने प्रत्येक नगरसेवक नागरिकांना अगदी कुटुंबातील सदस्य असल्यासारखे वागवत असे. नेहरू यांनी भेट देण्याच्या अगोदर हाच परिसर मेनरोड नाका म्हणून प्रसिद्ध होता. जास्त करून याची ओळख पिंपळपार चौक म्हणूनदेखील होती. गणपती विसर्जन मिरवणूक नेहरू चौकातून जाऊन खाली गोदेत गणपती विसर्जन होत असे. तसे पाहिले तर गणपती विसर्जन, दहीहंडी, शिवजयंती सर्व मिरवणुका नेहरू चौकातूनच जायच्या. रामनवमीच्या निमित्ताने काळाराम मंदिरातून निघालेला रथ याच चौकात थांबायचा. सन 1992 च्या कारसेवेसाठी नाशिकमधून गेलेले बहुतेक कारसेवक याच नेहरू चौकात जमले होते. हाच तो चौक जो जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमला होता. याच कालावधीत या चौकाने सर्वत्र भगवे झेंडे पाहिले आणि हा भाग सर्वत्र भगवा
झालेला पाहिला.
तसे पाहिले तरी हा चौक म्हणजे कोणा एका पक्षाची मक्तेदारी नव्हती. कारण निवडणूक आली तर सर्वच पक्षांचे झेंडे, भोंगे, सभा यांनी हा चौक अगदी दुमदुमून जाई. मग हा चौक अगदी काठोकाठ माणसांनी भरून जात असे. लोकप्रिय नेत्यांच्या सभेला तर विचारूच नका. छपरांवर, गच्चीत, झाडांवर बसून सभेचा आनंद घेतला जाई. थोडक्यात त्या काळी आजच्या सारखी पैसे देऊन सभा ऐकण्यासाठी भाड्याने लोक आणावी लागत नसत. इतकेच नव्हे तर एखादी व्यक्ती कोठल्याही पक्षाची असली तरी प्रत्येक वक्त्याचे विचार ऐकण्यासाठी नेहमीच लोक हजेरी लावीत असे. आणीबाणीत 1975 मध्ये भूमिगत चळवळी सुरू झाल्या. गुप्त रीतीने पत्रकं वाटली गेली. ही पत्रके अगदी रातोरात पोहोचती होत असत. या पत्रक वाटपाचे केंद्र होते नेहरू चौक. याच चौकाच्या बाजूला अभिनव भारत मंदिर. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अनेक भूमिगत क्रांतिकारक यांचा अड्डा होता. याच अभिनव भारत गुप्त कार्यकारी संस्थेचे सक्रिय सदस्य अनंत कान्हेरे होते. पुढे त्यांनी जॅक्शनचा वध केला तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाठवलेल्या पिस्तुलातून. अभिनव भारत ही पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना जिची मुहूर्तमेढ नेहरू चौक येथे रोवली गेली. आज अभिनव भारत ही जुनी वास्तूदेखील पाडली गेली. खंत ही वाटते हा वाडा पाडताना एकही इतिहासकार वा पुराण वास्तू रक्षक धावून आला नाही. साधारण 1896-97 काळात प्लेगची साथ आली होती. या काळात तात्यासाहेब सावरकरांनी घर सोडून नाशिक येथे मुक्काम केला होता तो सुप्रसिद्ध वैद्य कै. अण्णाशास्त्री दातार यांच्या वाड्यात. हा वाडादेखील नेहरू चौकातलाच भाग.
संस्कृती वैभव संस्थेची स्थापना श्री सतीश निरंतर आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी याच चौकात केली. तर पाडवा पहाटसारखे सुंदर कार्यक्रम आयोजित करणारी संस्कृती ही सांस्कृतिक संस्था शाहू खैरे यांच्या नियोजनाखाली आयोजित भावगीत, भक्तिगीत कार्यक्रम म्हणजे दिवाळीची रसिकश्रोत्यांना मिळालेली मेजवानी ही याच चौकाची देणगी.
1970 च्या दशकांत याच चौकातील तमाम रहिवाशांनी भवाळकर यांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानातून रेडिओ तसेच फलकाच्या माध्यमातून क्रिकेट कॉमेंट्रीचा आनंददेखील लुटला. तर याच चौकातून अगदी 70 ते 90 च्या दशकापर्यंत मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा आनंद लुटला. नेहरू चौकाच्याच पुढे धुमाळ पॉइंट येथे पोलीस पॉइंट होता. या रस्त्यावर एक ट्रॅफिक पोलीस दिवसभर पांढर्या गणवेशात त्याच्या जवळील शिट्टीने कायम ट्रॅफिक कंट्रोल करताना दिसत असे. शिट्टी वाजवताना एकहाताने पॅन्ट सावरत असे. तर याच धुमाळ पॉइंटवर कै. रामदास मकाजी चिवड्याचे संचालक नेहमी चिवड्याची शिफारस करून मूठभर चिवडा चव बघायला द्यायचे. हीच त्यांची जाहिरात. तसे पाहिले तर त्यांना जाहिरात करायची नसायचीच. याच्यामागचे कारण आपण बनवलेला चिवडा हा खाल्ल्यावर लोकांच्या चेहर्यावरचे भावच त्यांना समाधान देत असत. त्याच्याच पुढे हत्ती खाना रोडवर असलेली छत्रपती शाखा. त्या शाखेचे शिक्षक नेहमी म्हणत मुलांनो उद्या शाखेत या। संघाची शाखा सकाळ, संध्याकाळ नेहमीच चालत. जास्त करून संध्याकाळी शाखा भरत असत.
आता या चौकात मोठा सिग्न आहे. धुमाळ पॉइंटवरील तो पोलिस पॉइंटदेखील राहिला नाही. पुढील भागात सिग्नल आला, सीसीटीव्हीदेखील आला. माणसांची गर्दी वाढली, मात्र माणुसकी लोप पावली.
आजदेखील धुमाळ पॉइंटवरून जाताना रामदास इशे यांची हाक तर त्या पोलिसाच्या शिट्टीचा आवाज कानात घुमतोय. याच चौकात नागपंचमीस परिसरातील बायाबापड्या त्यांची लेकरे नेहमीच पिंपळाला दोरी बांधून झोके घेत असत. याच चौकात असलेल्या कमला विजय, समाधान हॉटेल म्हणजे तात्यासाहेबांसारख्या साहित्यिकांचा विचारविनिमयाचा अड्डा. तात्यासाहेबांना मोरवाडी येथे भेटलेला अप्पा उर्फ गणपतराव बेलवरकर नटसम्राटचा नायक त्यांनी साकारला तो याच परिसरात.
एक काळ नेहरू चौक म्हणजे नाशिककरांचा हळवा कोपरा. पण आज हा हळवा कोपरा याची परवड, दुरवस्था हे शब्ददेखील कमीच इतकी दयनीय झाली आहे. आता हा चौक हतबल झालेल्या बापा सारखा मनातल्या मनात रडतोय. चौकाच्या कोपर्यावर कचराकुंडी, बाजूस लागलेल्या चायनीज गाड्या, पान, गुटख्याच्या पिचकार्या, तळकट पदार्थांचा धूर यांनी पुरता चौक गुदमरून गेला आहे. मुळात हा चौक विकासाच्या नावाखाली असा काही मूळ ढाचा बदलून बांधला आहे की एकेकाळचा हाच नेहरू चौक ही ओळखदेखील राहिलेली नाही. हा चौक म्हणजे एकेकाळी नाशिकचा आरसा, मात्र तो आरसा आता राहिला नाही. त्या आरशात नाशिकचे नागडं रूप दिसतंय. नेहरू चौक संपला नव्हता. त्याला संपवलं ते स्मार्ट सिटीने चिरफाड करून, त्याच्या इतिहासाची लक्तरे वेशीवर टांगून हेच खरे.
Nehru Chowk
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…