कधी कधीही घडायला नको
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात घुसून गुरुवारी पहाटे चाकूने सहा वार करण्यात आले. लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खान यांच्या जिवारवरील धोका टळला असल्याची बातमी दिलासादायक आहे. या हल्ल्यात घरातील त्याची मदतनीसही जखमी झाली. उपचार करुन तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन संशयितांचा शोध घेण्यासाठी दहा पथके तयार केली आहेत. एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आले आहे. तो सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. सैफ अली खानवर हल्ला का आणि कशासाठी झाला, यासह चौकशीतून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील. बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जिवाला सतत धोका असल्याचे आतापर्यंत दिसून आलेले आहे. हल्लेखोराने सुरक्षा आणि सीसीटीव्ही यंत्रणेला चकवा देऊन घरात पहाटे अडीच वाजता प्रवेश केला. सैफ अली खान आणि हल्लेखोर यांच्यात झालेली झटापट मदतनीसने पाहिली. कोणी तरी शिरल्याचे तिने सर्वांत आधी तिनेच पाहिले तेव्हा ती ओरडली. तेव्हा सैफ अली खान आला त्याचवेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. मदतनीसने ही घटना पाहिली असल्याने तिच्या म्हणण्याला महत्व आहे. “माझ्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर सैफ अली खान उठले. त्यांनी चोराला पाहिल्यावर त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत चोराने सैफ यांच्यावर हल्ला केला”, असे तिने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला सांगितले आहे. हल्ल्यानंतर सैफने स्वतः पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. सैफच्या मोठा मुलगा इब्राहिमने त्याला लीलावती रुग्णालयात रिक्षाने नेले. या घटनेच्या वेळी सैफ अली खानची पत्नी करीना कपूर आणि त्यांची मुले तैमूर आणि जेह घरातच होते, असेही तिने पोलिसांना सांगितले आहे. हल्ल्याच्या दोन तास आधीचे सीसीटीव्ही तपासले असता हल्लेखोर सोसायटीत प्रवेश करताना दिसत नाही. आत्पकालीन पायऱ्यांनी तो घरात शिरला, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. चोराच्या वाटा चोरालाच माहित, असे जे म्हटले जाते तेच येथे दिसून येते. सैफवर चाकूचे सहा वार करण्यात आल्याच्या या घटनेने संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच हे प्रकरण गंभीर आहे. यावरुन मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई शहर असुरक्षित असल्याची टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला जाब विचारला जात आहे. तसा तो विरोधकांचा अधिकार आहे. एक हल्ला घडला म्हणून मुंबई शहर असुरक्षित असल्याचे म्हणणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे राज्याचे गृहखातेही आहे. “मला असं वाटतं की, देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात. त्यांना गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण फक्त त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरिता योग्य होणार नाही कारण यामुळे मुंबईची प्रतिमा खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे याकरिता सरकार नक्की प्रयत्न करेल”. असे विधान फडणवीस यांनी केले आहे. मुंबईत पूर्वी गँगवॉर व्हायचे. भररस्त्यात गुंड एकमेकांना गोळ्या घालून ठार करत असायचे. दाऊद इब्राहिम, अबू सालेम, बडा राजन, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या त्यावेळी टोळ्या कार्यरत होत्या. तेव्हा मुंबईवर गुंडाचेच राज्य असल्याचे बोलले जायचे. मुंबईत १९९३ साली बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणणारा दाऊद इब्राहिम अद्यापही भारताला मिळालेला नाही. तो पाकिस्तानात असून, तो भारताच्या ताब्यात येणे अवघड आहे. मुंबईत आताच्या जमान्यात गँगवॉरच्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या नाहीत. पूर्वीपेक्षा मुंबई सुरक्षित असली, तरी ज्या काही घटना घडतात त्या पाहता मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. मुंबईतील पूर्वीची गुंडगिरी किंवा गॅंगवॉर आता उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, दिल्ली, बिहारमध्ये दिसून येत आहे. पण, अधूनमधून म्हणा की कधी कधी अशा घटना काही घटना घडतात की, मुंबई सुरक्षित आहे काय? हा प्रश्न उपस्थित होत असतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत हत्या झाली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स विश्नोई टोळीने स्वीकारल्यानंतर तेव्हा हाच प्रश्न उपस्थित होऊन गँगस्टर्रची चर्चा होऊ लागली. विश्नोईच्या रडारवर अभिनेता सलमान खान आधीपासूनच आहे. याच वर्षी १४ एप्रिलच्या रात्री बिश्नोई टोळीच्या दोन युवकांनी सलमानखानच्या घरावर गोळीबार केला होता. दोघांना गुजरातमधल्या भुज येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सलमानशी संबंध असल्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचे विश्नोई टोळीने म्हटले होते. हा संदर्भ लक्षात घेतला, तर मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या घटना लक्षात घेतल्या, तर गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांनी गुंडगिरी नेस्तनाबूत करण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेतली पाहिजे. सलमान खानवर गोळीबार झाला तेव्हा फडणवीस हेच गृहमंत्री होते आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तेव्हाही त्यांच्याकडे गृहखाते होते. कोणतीही मोठी गुन्हेगारी घटना घडली की, गृहखात्याला जबाबदार धरले जाते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण दिवसेंदिवस तापत आहे. परभणीतील आंबेडकरवादी युवकाचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला. या दोन घटना नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरच्या आहेत. त्याआधी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर झालेल्या पोलिस बळाच्या वापराने आंदोलन तापले. गेल्या दोन-अडीच वर्षातील घटना पाहिल्या, तर मुंबई आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधक बोट ठेवत आले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेऊन गुंडगिरी नेस्तनाबूत केली पाहिजे. “कधी कधी काही घटना घडतात. त्यांना गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे.”, असे फडणवीस यांनी सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर म्हटले आहे. त्यांचे विधान किंवा मत अगदी बरोबर आहे. पण, कधी कधी घडणाऱ्या अशा घटना सरकारला आव्हान देणार्या आणि विरोधकांना सरकारवर टीका करण्यास निमंत्रण देणार्या ठरतात. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची दखल मुंबई पोलिसांनी तातडीने घेऊन तपास करण्यासाठी दहा पथके तैनात केली. तपास करुन कारवाई पोलिस करतीलही पण अशा घटना पुन्हा पुन्हा घडायला नकोत किंवा कधी कधीही घडायला नको. फडणीस यांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.