चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप दरीत कोसळली

सावळ्या पोवळ्या घाटातील घटना

दिंडोरी : प्रतिनिधी
पेठ-नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळ घाटाच्या रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. याला पर्यायी मार्ग म्हणून सुरू केलेल्या जुन्या ब्रिटिशकालीन सावळ्या पोवळ्या घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टोमॅटो घेऊन जाणारी पिकअप (एमएच 45 टी 3905) सुमारे 30 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, हे वाहन एका झाडाला अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून वाचले व मोठी जीवितहानी टळली. मात्र, अपघातात वाहन व टोमॅटो मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास घडला. हा पर्यायी घाट मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून, तीव्र चढ-उतार आणि धोकादायक वळणांचा आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण तर काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावरील डोंगराचे चढ-उतार कमी करणे शक्य असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच घाटात कुठेही संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक किंवा धोक्याचे इशारा फलक लावण्यात आलेले नाहीत. उंच व अवजड वाहनांना या घाटात बंदी असली, तरी कमी गर्दीचा मार्ग म्हणून पिकअप आणि इतर लहान व्यावसायिक वाहने येथून भरधाव वेगाने जातात. भाजीपाला वाहतूक करणारी ही वाहने धोकादायक वळणांवर वेगाची मर्यादा पाळत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या वाहनांच्या वेगावर प्रशासनाने तात्काळ नियंत्रण ठेवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

The pickup plunged into the valley after the driver lost control.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *