30 नोव्हेंबरला लोकसभा, 2 डिसेंबरला राज्यसभेचे सत्र
नवी दिल्ली : प्रतिनिधी
संसदेचे संस्थगित न झालेले पावसाळी अधिवेशन पुन्हा सुरू होणार आहे. 30 नोव्हेंबरला लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे सत्र बोलावले गेले आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी एक्सवर लिहिले की, सरकारने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना विनंती केली आहे की, लोकसभा सोमवारी आणि राज्यसभा बुधवारी पुन्हा बोलावावी, जेणेकरून आवश्यक शासकीय कामकाज पूर्ण करता येईल. कामकाजाच्या गरजेनुसार दोन्ही सभागृहांचे कामकाज 3 डिसेंबर 2026 रोजी संपेल.
दुसरीकडे, सरकारने परिसीमन (डीलिमिटेशन) विधेयकासाठी बहुमत पूर्ण केले असून, ते विधेयक मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिजिजू यांनी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात हेही स्पष्ट केले आहे की, या बैठकांमध्ये प्रश्नोत्तराचा तास, शून्य प्रहर आणि खासगी सदस्यांचे कामकाज असणार नाही. म्हणजे हे केवळसरकारी कामकाजासाठीचे सत्र असेल.
हे अधिवेशन नेमके कोणते?
संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्ट 2026 रोजी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले होते, पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचे सत्रावसान अजून केलेले नाही. म्हणजे कागदावर ते अधिवेशन 105 दिवसांहून अधिक काळ अजूनही सुरू आहे. इतिहासात याआधी सत्रावसान न करता इतके दिवस सत्र लांबवल्याचा विक्रम 2008 मध्ये 87 दिवसांचा होता, तो आता मोडलाय.
त्यामुळेच सरकारला नवे अधिवेशन बोलावण्यासाठी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागली नाही. जुन्याच अधिवेशनाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी फक्त 2 दिवसांची नोटीस पुरेशी असते. म्हणूनच हे ‘विशेष अधिवेशन’ नसून, पावसाळी अधिवेशनाचे पुन्हा सुरू झालेले कामकाज आहे. हाच मुद्दा आता विरोधक उचलतायत. काँग्रेसचा आरोप आहे की, सरकारने पावसाळी अधिवेशनाचे सत्रावसान जाणूनबुजून केले नाही, कारण परिसीमन (डिलिमिटेशन) विधेयकासाठी बहुमत जुळवायचे होते.
अजेंडा काय असणार?
रिजिजू यांनी अधिकृत अजेंडा दिलेला नाही. पण सूत्रांनुसार आणि पंतप्रधानांच्या गुरुवारी सकाळी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, दोन गोष्टींवर लक्ष आहे. एप्रिलमध्ये 17 एप्रिलला विशेष बैठकीत हे विधेयक मांडले गेले होते, पण त्याला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे ते रखडले. या विधेयकाचा उद्देश आहे, लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून कमाल 850 पर्यंत वाढवणे; प्रत्येक राज्याच्या सध्याच्या जागांमध्ये समान 50% वाढ करणे – म्हणजे कोणत्याही राज्याचे प्रमाण कमी होणार नाही, असा सरकारचा दावा आहे. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्यानुसार, लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण 2029 च्या निवडणुकीआधी लागू करण्याचा मार्ग मोकळा करणे. शुक्रवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिमंडळ बैठक होणार आहे, त्यात या सुधारित मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
विरोधक काय करणार?
काँग्रेसने शुक्रवारी याबाबत बैठक बोलावली आहे. विरोधक मतदार यादी पुनरावृत्ती (एसआयआर), महागाई, बेरोजगारी, एमपीएससी परीक्षा, दुष्काळ यांसारखे मुद्देही उपस्थित करण्याची शक्यता आहे. पण प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहरच नसल्याने विरोधकांना ते मुद्दे मांडायला फारशी संधी मिळणार नाही, अशीही चर्चा आहे.
बहुमताचा प्रश्न
संविधान दुरुस्तीसाठी लोकसभेत 543 पैकी 361 मते लागतात. सध्या 3 जागा रिक्त असल्याने सदस्यसंख्या 540 आहे. ‘एनडीए’कडे एकट्याचे दोन-तृतीयांश बहुमत नाही. त्यामुळे सरकारला विरोधकांच्या काही भागाचा पाठिंबा लागेल. हेच कारण आहे की, सरकारने विरोधकांशी चर्चा न करता थेट तारीख जाहीर केली, असा विरोधकांचा आरोप आहे. याआधी सरकारने हिवाळी अधिवेशन न घेता असे विशेष कामकाज घेतले होते – 1975, 1979, 1984 आणि 2020 मध्ये. यावेळीही हिवाळी अधिवेशन स्वतंत्रपणे होणार नाही,
असे दिसते.
The monsoon session of Parliament will resume