लठ्ठपणा आणि प्रजनन आरोग्य

–  डॉ. अपर्णा गोविल भास्कर,
सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन,
सैफी, नमाहा,
अपोलो स्पेक्ट्रा आणि क्युरे स्पेशालिटी हॉस्पिटल

 

वास्तविक पाहता  आज दर पंधरापैकी एक जोडपं वंध्यत्वाचा सामना करत आहे. इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शनच्या मते, भारतात अंदाजे 27.5 दशलक्ष स्त्रिया आणि पुरुष वंध्यत्वाचा सामना करत आहेत. वंध्यत्वासह संघर्ष खूप आव्हानात्मक आणि तणावपूर्ण असू शकतो.
प्रजनन आरोग्यावर लठ्ठपणाचे दुष्परिणाम:
वंध्यत्वासारखी समस्या वेगाने वाढणारी असून त्यामागे अनेक कारणे आहेत. अलिकडच्या वर्षांत लठ्ठपणा हे त स्त्रिया आणि पुरुष दोघांमधील प्रजनन संघर्षाचे एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. प्रजनन आरोग्यावर लठ्ठपणाचा प्रभाव होतो. स्त्रियांमध्ये लठ्ठपणा मासिक पाळीच्या अनियमिततेशी संबंधित असतो जो सामान्यतः अॅनोव्ह्युलेटरी सायकलचा परिणाम असतो.
लठ्ठपणा असलेल्या स्त्रिया इन्सुलिन प्रतिरोधक असतात ज्यामुळे पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन सिंड्रोम किंवा पीसीओएसच्या विकासास प्रोत्साहन मिळते पीसीओएस ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशय मोठे होऊन त्यात अनेक लहान द्रव साठतात. ल्युटेनिझिंग हार्मोन, लेप्टिन, इन्सुलिन, इस्ट्रोन, ट्रायग्लिसराइड्स आणि अत्यंत कमी घनतेच्या लिपो-प्रोटीन्स सारख्या अनेक संप्रेरकांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे हायपो पिट्यूटरी गोनाड ट्रॅफिक अक्षावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे वंध्यत्व येते.
गर्भधारणा झाल्यानंतरही, लठ्ठपणा असलेल्या महिलांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यानच्या इतर जोखमींमध्ये उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेहाचे प्रमाण वाढणे, प्री-एक्लॅम्पसिया, संसर्ग आणि रक्त गोठणे (शिरासंबंधीचा थ्रोम्बो-एम्बोलिझम) आणि स्टील बर्थ यांचा समावेश होतो.
लठ्ठपणा हा केवळ चूकीच्या आहारामुळे होतो आणि तो स्वयंप्रेरित असतो हा एक गैरसमज आहे. लठ्ठपणा म्हणजे फक्त चुकीचे अन्न खाणे नव्हे. तर यास अनुवांशिक, विकासात्मक, आणि पर्यावरणीय घटकही कारणीभूत ठरतात. लठ्ठपणा हा मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारांप्रमाणेच आजार आहे आणि तो कोणालाही प्रभावित करू शकतो.
कमी खाणे आणि जास्त हालचाल केल्याने वजन कमी होते हा देखील एक गैरसमज असून वास्तविकत पाहता तसे नसून आहार आणि जीवनशैलीत बदल हा लठ्ठपणावरील उपचारांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तथापि, हा एकमेव उपचार नाही आणि तो लठ्ठपणाच्या सर्व टप्प्यांसाठी लागू पडू शकत नाही. जे लोक जास्त वजनाच्या श्रेणीतील आहेत त्यांनाच आहार आणि जीवनशैलीतील बदलाचा फायदा होतो. वजन आणि बॉडी मास इंडेक्स जसजसा वाढत जातो तसतसे उपचारांची तीव्रता देखील वाढते. लठ्ठपणा वरील उपचार पद्धतींमध्ये फार्माकोथेरपी, एन्डोस्कोपिक थेरपी आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया रोगाच्या टप्प्यावर अवलंबून आहेत.
लठ्ठपणाचा केवळ महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो हा एक गैरसमज असून वास्तविक पाहता लठ्ठपणाचा केवळ महिलांच्या प्रजनन दरावरच परिणाम होत नाही तर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन आणि पुरुषांमध्ये संभोगाची इच्छा कमी होऊ शकतो.
बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम करू शकते हा देखील एक चूकीचा समज असून अभ्यासांनी आता हे सिद्ध केले आहे की बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर वजन कमी केल्याने महिला आणि पुरुष दोघांच्या प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. पीसीओएस सारख्या समस्येमध्ये सुधारणा होते आणि पीरियड सायकल अधिक नियमित होते आणि सायकल अॅनोव्ह्युलेटरीपासून ओव्ह्युलेटरी बनते.
लठ्ठपणा आणि वंध्यत्व असलेल्या महिलांसाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया चमत्कारीक परिणाम करते. नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते आणि आयव्हीएफ सारख्या सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रानंतरचे परिणाम देखील वजन कमी केल्यानंतर बरेच चांगले दिसून येतात. शस्त्रक्रियेनंतर बहुतेक स्त्रिया त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भधारणा करू शकतात.
जीवनशैलीतील बदल हा या थेरपीचा मुख्य आधारस्तंभ ठरतो. रुग्णांना वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार घेणे आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. तथापि, लठ्ठपणासाठी इतर उपचार पद्धती जसे की फार्माको-थेरपी, एंडोस्कोपिक थेरपी आणि बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया लठ्ठपणाच्या स्टेज आणि तीव्रतेनुसार विचारात घेतल्या जाऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *