नाशिक

इलेक्ट्रिक बसेससाठी सव्वाशे वाहकांची आवश्यकता

महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू, शहरात पन्नास बसेस मिळणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराला पीएमपी योजनेंतर्गत दोन टप्प्यांत शंभर बसेस मिळणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील पन्नास बसेस लवकरच शहरात येणार आहेत. महापालिकेचा यांत्रिकी विभाग लवकरच कंपनीसमवेत करार करणार आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक बसेस शहरात कधीही दाखल होण्याची शक्यता असल्याने त्याकरिता वाहकांची आवश्यकता भासेल. त्यासाठी महापालिकेने सव्वाशे वाहकांकरिता निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे.
केंद्र सरकराने देशभरातील काही प्रमुख शहरांमधील हवा-प्रदूषण कमी करण्यासाठी पीएम ई-बस योजनेंंतर्गत इलेक्ट्रिक बसेस देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात पहिल्या नाशिक महापालिकेला पन्नास इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, मध्यंतरी महावितरणच्या संथगतीच्या कामाचा फटका आडगाव येथील इलेक्ट्रिक बस डेपोच्या कामाला बसला होता. मात्र, डेपोचे काम जवळपास संपुष्टात आले आहे. शहरात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार असून, नाशिककरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार नाशिकला पन्नास बसेस मिळणार आहेत. सिंहस्थापूर्वी महापालिकेच्या ताफ्यात सिटीलिंकबरोबरच इलेक्ट्रिक बसही दाखल होणार असल्याने याचा दळणवळणासाठी आणखी उपयोग होणार आहे. सध्या सिटीलिंकच्या ताफ्यात दोनशे सीएनजी व पन्नास डिझेल, अशा अडीचशे बसेस आहेत.

इलेक्ट्रिक बससाठी संबंधित कंपनीशी करार होताच बसेस शहरात दाखल होतील. या बसेससाठी स्वतंत्र वाहकांची आवश्यकता असल्याने त्यासाठी 29 जानेवारी रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
– बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग, मनपा

बस डेपोसाठी सत्तावीस कोटींचा खर्च

केंद्र शासनाने पीएमई बस योजनेंंतर्गत इलेक्ट्रिक बसेस पुरविण्यासाठी जीबीएम इको लाइफ मोबेलिटी या कंपनीसोबत करार होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या यांत्रिकी विभागातर्फे दीड वर्षापासून इलेक्ट्रिक बसेससाठी आडगाव येथे डेपो उभारण्यात आला आहे. यासाठी सत्तावीस कोटींचा खर्च आला आहे.

ई-बससाठी प्रति किलोमीटर 71 रुपये खर्च

इलेक्ट्रिक बसेससाठी प्रति किलोमीटर 71 रुपये खर्च येणार आहे.त्यांपैकी 24 रुपये अनुदान केंद्र देईल. उर्वरित 47 रुपये खर्च महापालिकेला स्वत:च्या खिशातून करावा लागेल. इलेक्ट्रिक बसेससाठी वाहक महापालिकेचे, तर चालक इलेक्ट्रिक बस कंपनीचे असतील.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago