आडगाव शिवारातील विंचूर गवळी – सैय्यद प्रिंप्री रोडवर एकाचा खून
सिडको: विशेष प्रतिनिधी
विंचूर गवळी – सैय्यद प्रिंप्री रोडवर एक वस्ती असून येथील बऱ्याच रहिवाश्यांचा जडी, बुटी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. शुक्रवार, (दि.१७) रोजी गुजरात येथून भाल्या पवार हे पत्नी समवेत आपल्या तेथील नातेवाईकांकडे कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांचे आपापसात वाद झाले. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यातूनच भाल्या पवार (वय ४५) याचा धारदार शस्त्राने संशयिताने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. सदरचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. मात्र आडगाव पोलीसांना याची माहिती मध्यरात्री खुप उशिराने मिळाली. यामुळे या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर पुढील अधिक तपास आडगाव पोलिस करीत आहेत.