महाराष्ट्र

आउटलेट कशाला हवा – भाग ४

इनलेटलाच फिल्टर लावा…

 

 

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

 

नितीन देसाईंच्या घटनेच्या निमित्ताने “आउटलेट” असण्यापेक्षा “इनलेट” ला फिल्टर लावणे, या संकल्पनेवर मी लिहितो आहे. “इनलेट”ला फिल्टर लावणे म्हणजे नेमकं काय, यावर आधी मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. कारण, माझ्या मनात जी संकल्पना आहे, तीच आणि तशीच संकल्पना वाचकांच्या मनातही असावी, म्हणजे लेख अधिक प्रभावी व परिणामकारक होईल, असे मला वाटते. “इनलेट”ला फिल्टर लावणे म्हणजे, आपल्या डोक्यात, मनात, स्वभावात आणि विचारात नकारात्मकता येऊच नये, आणि जर आलीच तर ती कशी घालवू शकतो? त्या नकारात्मकतेला सकारात्मकतेत कसे परिवर्तित करायचे, याच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. जसे मागील लेखात नमूद केले की तुम्ही देवाचे अंश आहात, तुमच्यात देव आहे व देवाप्रमाणे तुम्ही चमत्कार घडवू शकता, अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा उपाय आणि प्रोब्लेम्सच्या सोल्युशन वर फोकस केले की पर्याय सापडतात, हे मी आपल्या पटवून दिलेलं आहे. प्रोब्लेम्सच्या दबावाखाली चिरडून आणि भरडून न जाता, त्यावर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून मार्ग काढण्याचा फॉर्मुलाही मी तुम्हाला सांगितला आहे. खरं, तर या दोन तत्वांचा वापर केला तर तुम्ही आयुष्यात कुठल्याही संकटावर मात करू शकता, इतकी सकारात्मकता तुमच्यात येऊ शकते. आणखी काही फॉर्मुल्यांवर चर्चा करूया…

घरात रोज दूध तापवले जाते, तरीही कधीकधी गॅसवरील दूध उतू जाते. दूध उतू गेल्यावर तुम्ही कुणाला राग, संताप, चिडचिड, किरकिर, भांडण, आरोप-प्रत्यारोप करतांना बघितलं आहे का? नाही ना? हं, दूध वाया गेल्याचं वाईट वाटलं असेल, परंतु त्याहुन अधिक काही नाही. यावर कधी विचार केला आहे का? दूध उतू गेल्यावर पटकन गॅस बंद किव्हा कमी करून, शक्य तितके दूध वाचवण्याचा प्रयत्न करतो. जीवन जगत असतांना आपण असे का नाही वागत? दूध उतू जाणे, म्हणजे चूक होणे, नुकसान होणे, वाया जाणे, एखादे अपयश येणे, मनाविरुद्ध घडणे, अनपेक्षित गोष्टी घडणे, यासारखे असते. सर्वप्रथम, हे लक्षात घेतले पाहिजे की, जे काही व्हायचे होते, ते होऊन गेलेले आहे, ते घडून गेलेले आहे, आता त्यात बदल करणे शक्य नाही. जसे उतू गेलेले दूध पुन्हा भांड्यात टाकता येत नाही, तसेच होऊन गेलेल्या गोष्टी बदलता येणार नाही. त्यामुळे त्यावर राग, संताप, चिडचिड करून काहीही उपयोग होणार नाही. जे उरले आहे, म्हणजेच, जे आत्ता आपल्या हाती आहे, त्याला जपणे आणि त्याचा सदुपयोग करून आपले काम साध्य करणे, हेच काय ते आपल्या नियंत्रणात असते. पुन्हा दूध उतू जाणार नाही, याची जशी खबरदारी घेतो, तशीच खबरदारी आपल्या पुढील कामात, शिक्षणात, नाते-संबंधात, व्यवहारात आणि आरोग्याच्या बाबतीत घ्यायची आहे. जे होऊन गेले आहे, ते मागे सोडून द्यावे, त्यावर विचार न करता, पुढे चालावे, चूक सुधारावी, चूक होऊ नये याची दक्षता घ्यावी, योग्य ते बदल करावे… ई उपाय करावे.

देवाने माणसात दोन गोष्टी ठासून ठासून भरलेल्या आहे. एक “स्मरणशक्ती” आणि दुसरी “भावना”. अधिकांश प्रॉब्लेम्स यामुळेच येतात. प्राण्यांमध्ये असे होत नाही. उदा. जंगलात एखादे हरीण चरत असतांना, अचानक त्याला वाघ दिसला तर, आपल्या जीवाला धोका आहे, असे समजून ते हरीण जीव वाचविण्यासाठी सुसाट धावते. वाघाला चकमा देऊन ते आपले प्राण वाचवते. दुसऱ्या क्षणाला ते हरीण पुन्हा गवत खायला सुरू करते. चरतांना घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत बसत नाही, की भीतीपोटी चरणे सोडत नाही. पुढे असे काही जगते की जसे काही घडलेच नाही. माणूस असा जगत नाही. एखाद्या जीवघेण्या प्रसंगाचा इतका धसका घेतो की भविष्यात त्या वाटेला कधी जातच नाही, कारण त्याची स्मरणशक्ती तेज असते व भीतीच्या भावना खोलवर रुजलेल्या असतात. एकदा अमुक एक घटना घडली म्हणून नेहमी नेहमी घडेल, असा काही नियम नाही. एकदा कधी एकसिडेंट झाला, म्हणजे रोज रोज होईल का? एकसिडेंट मुळे गाडी चालवणे बंद करायची का? सायकल शिकतांना आपण कितीतरी वेळा पडलेलो आहे, तरी सायकल चालवणे सोडले का? नाही ना? सोडली असती तर आज सायकल चालवता आली असती का? आणि जर सोडली असती तर सायकल चालवणे कधी शिकलोच नसतो. एखाद्या बिजनेस मध्ये लॉस झाला म्हणून आयुष्यात कधीच बिजनेस करायचा नाही का? असे अनेक उदाहरणे देता येतील, की एका अपयशाने माणूस खचून जातो, निराश होतो. एका कठीण प्रसंगातून बाहेर आलो की त्या मार्गाला न जाण्याची जणू शप्पतच घेतो. याउलट, एखादे काम करतांना ठराविक रिस्क असते, हे ओळखून ते काम करतोच ना? हात भाजला म्हणून भाकरी भाजणे बंद करतो का? बोट चिरले म्हणून भाज्या चिरणे बंद करतो का? सर्दी झाली म्हणून घराबाहेर जाणे जसे बंद नाही करत, तसेच छोट्या मोठ्या संकटांना घाबरून काहीच न करणे, हे माझ्या दृष्टीने चुकीचे आहे.

तुम्ही एखाद्या संकटात सापडला तर त्यातून बाहेर पडण्याचा आणखी एक मार्ग आहे. त्या संकटात तुम्हाला किव्हा तुमच्या परिस्थितीला वाईटात वाईट काय होऊ शकते? याचा विचार करा. अगदी जीवघेणी परिस्थिती जरी असली तरी, जास्तीत जास्त काय होऊ शकते, जीव जाऊ शकतो, बरोबर ना? परंतु, शिक्षणात, नोकरीत, व्यवसायात, उद्योग-धंद्यात, व्यवहारात, कोर्ट-कचेरीत, नातेसंबंधात किव्हा आरोग्याच्या बाबतीत कुठल्याही संकटात, जीव तर जाणार नाही ना? मग काळजी कशाला करायची? फार तर काय होईल, नापास होईल, नोकरी जाईल, आर्थिक नुकसान होईल, कोर्टाची केस हरेल, आरोग्य बिघडले तर ऍडमिट व्हावे लागेल, किव्हा ऑपरेशन करावे लागेल, यापलीकडे, आणखी वेगळे काय होणार आहे. जीव तर नाही जाणार. मग अशा वेळी, वाईटात वाईट परिणामांचा विचार करून, त्यासाठी मानसिक तयारी ठेवल्याने तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तसे, काही घडू नये, यासाठी प्रयत्न मात्र सुरूच ठेवायचे. नापास होऊ नये म्हणून अभ्यास करायचा, केस हारु नये म्हणून बारकाईने तयारी करायची, व्यवहारात फसगत होऊ नये म्हणून सतर्क रहावे, नोकरी जाऊ नये म्हणून प्रामाणिकपणे काम करावे, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, नात्यात दुरावा येऊ नये म्हणून प्रेमाने वागावे, इतकेच काय ते आपल्या हाती असते. बाकी नियतीवर सोडावे, आणि अनपेक्षित परिणामांची मानसिक तयारी ठेवायची.

आफ्रिकेच्या जंगलात माकडांची शिकार करण्याची एक पद्धत आहे. फुटबॉलच्या बॉल पेक्षा थोडा मोठ्या आकाराचा एक लोखंडी जाळीचा पिंजरा वापरतात. त्या गोलाकार पिंजऱ्याला एक छोटे छिद्र असते. त्या छिद्रातून पिंजऱ्यामध्ये एक केळ टाकून तो पिंजरा जंगलात सोडतात. त्या पिंजऱ्यातील केळ काढण्यासाठी माकड छिद्रातून हात घालते, परंतु केळ आडवे पकडले असल्याने ते केळ आणि हात दोन्ही बाहेर काढता येत नाही. हे त्या माकडाला समजत नसल्याने त्याचा हात अडकतो आणि त्या पिंजऱ्याच्या वजनाने त्याची पाळण्याची क्षमता कमी झाल्याने त्याची शिकार होते. आपणही आपल्या जीवनात असे काही धरून ठेवले आहे का? आपण एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल, ऐकीव माहितीबद्दल आपले स्वतःचे मत बनवलेले असते, काही ग्रह करून घेतलेले असतात. आपले विचार, आपले म्हणणे, मत, दृष्टिकोन, आणि आपण करून घेतलेला ग्रह हे आपले केळ असते. ते आपल्याला इतके प्रिय असते की आपण ते सोडायला तयार होत नाही, सोडतही नाही. याच केळामुळे आपला घात होतो, हेही आपल्या लक्षात येत नसते. धरून ठेवलेले केळ सोडले, तर आपला हात बाहेर येऊ शकतो आणि आपली सुटका होऊन आपली शिकार होणार नाही, ही एक छोटीशी गोष्ट त्या माकडाच्या लक्षात जशी येत नाही, तशीच आपल्याही लक्षता येत नाही. जे धरून ठेवलेले आहे, त्यानेच आपला घात होतो. आपली शिकार होऊ नये म्हणून केळ सोडल्याप्रमाणे एखाद्या बद्दलचे मत, ग्रह, म्हणणे सोडून दिल्याने तुमची सुटका होईल, त्रास होणार नाही.

जे अटळ आहे, तेच सत्य आहे, आणि जे सत्य आहे ते अटळच असते. सूर्य पूर्वेला उगवणार आणि पश्चिमेला मावळणार, हे सत्य आणि अटळ दोन्ही असते. ज्या गोष्टी घडल्या आहेत, किव्हा घडणार आहे, त्यावर खूप त्रागा करून काय उपयोग आहे? खूप पाऊस पडला, गारपीट झाली, नुकसान झाले, ते रोखण्यासाठी तुम्ही काय करू शकता, काहीच नाही. तुम्ही घाईत असतांना ट्रॅफिक मध्ये अडकले, तुम्ही काय करू शकता, काहीच नाही. कामवाल्या बाईने दांडी मारली, फिरायला गेल्यास ट्रेन, फ्लाईट लेट झाली, तुम्ही अचानक आजारी पडला, एखादे पेमेंट मिळाले नाही… अशा अनेक प्रसंगी चिडचिड, राग, संताप, त्रागा करून काही बदलणार आहे का? नाही ना. मग स्वतःला त्रास का करून घ्यायचा. ज्या गोष्टींचा आपल्याकडे ताबा (कंट्रोल) नाही, त्या बदलण्याचा, किव्हा त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न ही करू नये. दुसऱ्याने काय विचार करावा, काय कृती करावी, कसे वागावे, काय बोलावे, काय करावे, यावर आपला काहीही कंट्रोल नसतो, ही खूणगाठ आजच मारून ठेवा. आपण काय करावे, हेच फक्त आपल्या हाती असते. म्हणून इतरांना बदलण्याचा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा, तुमच्या मताशी सहमत असण्याचा आग्रह धरू नका, हट्ट तर मुळीच नाही. मी तर म्हणेन की अपेक्षाही करू नका. सुखी व्हाल. दुसऱ्यांना बदलण्यात वेळ आणि श्रम खर्च करण्यापेक्षा स्वतः बदला. तुमच्या बाहेरील गोष्टींचा तुमच्या मनावर, शरीरावर आणि विचारांवर त्याचा परिणाम होऊ देऊ नका. शांत रहा, सय्यमी बना, विचारपूर्वक निर्णय घ्या, परिस्थितीचे भान ठेवा, अंतर्मनाचे ऐका आणि कृती करा. असे केल्यास डोक्यातील कचरा स्वच्छ होईल आणि तुमचे आयुष्य सुखकारक होईल. (क्रमशः)

*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

1 day ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

1 day ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago