नाशिक

थेट कानातच लावा डीजे

खांडबहाले यांची एफएम तंत्राच्या वापराची अनोखी संकल्पना

नाशिक : प्रतिनिधी
पुण्यातील विद्याधर बापट यांच्या भूमिकेमुळे राज्यभर तापलेल्या डीजेच्या मुद्द्यावर नाशिकमधील इनोव्हेटर आणि उद्योजक डॉ. सुनील खांडबहाले यांनी एक अनोखा तोडगा सुचवला आहे. डीजे बंद करणे किंवा मोठ्या आवाजाचा त्रास सहन करणे, या दोनच पर्यायांमध्ये अडकण्याऐवजी डीजेचे संगीत एफएमम अर्थात, फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेशन ट्रान्समीटरद्वारे प्रसारित करून ते उत्सवातील सहभागींच्या कानात थेट पोहोचवता येईल, असा प्रस्ताव खांडबहाले यांनी मांडला आहे. डीजेवरील वादाच्या निमित्ताने सार्वजनिक उत्सवांतील ध्वनिप्रदूषण आणि त्यामुळे होणारी मानसिक व शारीरिक हानी यांचा मुद्दा अधिक तीव्रतेने ऐरणीवर आला आहे. त्यावर पुण्यात नागरिकांचा मोर्चाही काढण्यात आला. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली होणार्‍या मोठ्या आवाजावर नियंत्रण असावे, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. त्याचवेळी गणेशोत्सव, सार्वजनिक मिरवणुका आणि पारंपरिक उत्सव हे समाजाच्या श्रद्धा, भावना आणि सामुदायिक आनंदाशी जोडलेले असल्याने त्यांच्याकडे केवळ नियमांच्या चौकटीतून न पाहता संवेदनशीलतेने विचार करावा, अशी दुसरी बाजूही व्यक्त होत आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न केवळ ’डीजे ठेवायचा की बंद करायचा’ एवढ्यापुरता न राहता श्रद्धा आणि नागरिकांचे आरोग्य यांच्यात समतोल कसा साधायचा, हा प्रश्न बनला आहे.
खांडबहाले यांच्या संकल्पनेनुसार, संपूर्ण परिसरात डीजेच्या प्रचंड आवाज पसरविण्याऐवजी डीजेच्या मिक्सर आणि स्पीकर्समधून निघणारे संगीत स्पीकर्सऐवजी एफएम ट्रान्समीटरद्वारे प्रक्षेपित करायचे. त्यामुळे तिथे वाजविण्यात येणारे संगीत एफएम लहरींमध्ये रूपांतरित होऊन कार्यक्रमात सहभागी असलेल्या व्यक्ती रेडिओप्रमाणे त्या ठराविक फ्रिक्वेन्सीवर आपले हेडफोन, मोबाइल, इअरबड्स यांसारखी साधने जुळवून तिथे सुरू असणारे संगीत ऐकू शकतात. साहजिकच त्या परिसरातील अन्य लोकांना डीजेच्या आवाजाचा दणदणाट सहन करण्याची गरज राहणार नाही.
या पद्धतीत रस्त्यावर नाचणारा तरुण असो, पारंपरिक पोशाखातील महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा लहान मूल असो, सहभागी सर्व जण एकाच फ्रिक्वेन्सीवर एकच संगीत ऐकू शकतात. त्यामुळे संगीताचा ताल, नृत्याचा उत्साह आणि सामूहिकतेची भावना कायम राहते. फरक एवढाच की, संगीताचा आवाज सर्व दिशांना पसरविण्याऐवजी तो ज्यांना ऐकायचा आहे, त्यांच्या कानापर्यंत वैयक्तिक पातळीवर पोहोचतो. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक किंवा घराच्या गॅलरीतून मिरवणूक पाहणारे लोक मात्र संगीताच्या मोठ्या आवाजापासून दूर राहू शकतात आणि अत्यंत नियंत्रित आवाजात उत्सवाचा दृश्य आनंद घेऊ शकतात.
अर्थात, भारतातील रेडिओ फ्रिक्वेन्सी, बिनतारी संदेशवहन, उपकरणांची मान्यता, परवाना किंवा परवानामुक्त वापरासाठी लागू असलेल्या अटी आणि प्रसारण क्षमतेसंबंधी सर्व नियमांची चौकट पाहून, त्यात गरजेनुसार बदल करून सार्वजनिक वापरासाठी अशा यंत्रणेची अंमलबजावणी करता येऊ शकेल. संबंधित प्रशासन आणि तांत्रिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर आणि नियंत्रित पद्धतीने त्याची चाचणी करणे अपेक्षित आहे. हा उपाय केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित न राहता दहीहंडी, नवरात्रोत्सव, गरबा, विविध धार्मिक मिरवणुका, सांस्कृतिक उत्सव, ईद-मिलादचे कार्यक्रम, ख्रिसमस आणि नववर्षाचे सार्वजनिक कार्यक्रम, विवाहसोहळे, सामाजिक जनजागृतीच्या मिरवणुका, मैदानी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही स्थानिक परिस्थिती आणि कायदेशीर नियमांनुसार तपासता येऊ शकतो. या प्रस्तावामागे कोणतेही विशिष्ट उपकरण विकण्याचा किंवा व्यावसायिक फायदा मिळविण्याचा उद्देश नसल्याचेही खांडबहाले यांनी स्पष्ट केले आहे.

डीजे बंद करणे किंवा डीजेचा मोठा आवाज सहन करणे एवढेच दोन पर्याय आपल्यासमोर का असावेत? तंत्रज्ञानाच्या मदतीने तिसरा पर्याय निर्माण करता येणार नाही का? धार्मिक श्रद्धा, उत्सवाचा आनंद आणि सामूहिक सहभाग जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच एखाद्या नागरिकाला शांत वातावरणात राहण्याचा, झोपण्याचा, अभ्यास करण्याचा आणि आरोग्य जपण्याचा अधिकारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे एका बाजूचा आनंद दुसर्‍या बाजूच्या त्रासाच्या किमतीवर मिळविण्याऐवजी दोन्ही बाजू जपणारा तंत्रज्ञानाधारित मार्ग शोधणे आवश्यक आहे. उत्सवाचा आनंद आणि नागरिकांचे आरोग्य यांना परस्परविरोधी मानणे आवश्यक नाही. श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात संघर्ष निर्माण करण्याऐवजी विज्ञानाचा उपयोग श्रद्धेला आणि उत्सवांना अधिक जबाबदार आणि समाजाभिमुख बनविण्यासाठी करता येतो.
– डॉ. सुनील खांडबहाले

सायलेंट गरब्यात ‘आरएफ’चा वापर
अलीकडच्या काही वर्षांत गरब्याचे काही आयोजक अशाच धर्तीचे तंत्रज्ञान वापरतात. त्यात डीजेच्या साउंंड सिस्टिमला यूएचएफ (णकऋ- णश्रीींर कळसह ऋीर्र्शिींशपलू) बँडवर चालणारा आरएफ ट्रान्समीटर जोडलेला असतो. हा ट्रान्समीटर संगीताचे सिग्नल्स रेडिओ लहरींच्या माध्यमातून परिसरात प्रसारित करतो. त्यात सहभागींना साध्या हेडफोन्सऐवजी खास तयार केलेले आरएफ रिसीव्हर वायरलेस हेडफोन्स दिले जातात. या तंत्रज्ञानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ट्रान्समीटरवरून (किंवा डीजेकडून) तीन वेगवेगळी गाणी प्रसारित करता येतात. सहभागी नागरिक हेडफोन्सवरील बटण दाबून आपल्या आवडीचा चॅनेल (उदा. लाल, निळा, हिरवा) नवडू शकतात. मोठ्या गर्दीत ब्ल्यूटूथ किंवा वायफाय वापरल्यास गाणे ऐकू येण्यात अडथळा (ङरस) येऊ शकतो आणि हजारो उपकरणांना एकाच वेळी जोडणे शक्य नसते. आरएफ तंत्रज्ञानात आवाजात कोणताही विलंब होत नाही आणि रेंजमध्ये असलेले कितीही लोक एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. मात्र, हे तंत्रज्ञान वापरासाठी गुंतागुतांचे आणि महागडे आहे. खांडबहाले यांनी मांडलेल्या संकल्पनेत रोजच्या वापरातली मोबाइल, हेडफोनसारखी साधने लागणार आहेत.

 

Play the DJ right in your ears.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

11 hours ago