बस इतकंच…

– प्रणाली देशमुख
दिवसभर घरीच असतेस, तुला काय कळणार नोकरी करणार्‍यांना किती टेन्शन असतं! महिन्याच्या सुरुवातीला पगार हातात येतो, कमवायची तुला काहीच अक्कल नाही; त्यामुळे तू बिनधास्त असतेस. तुला आजची काळजी नाही की उद्याची चिंता. तो बरेचदा याच भाषेत तिच्याशी बोलतो. ती बेअक्कल, बेजबाबदार! लाईट बिल जास्त आलं, तर दोष तिचाच; कारण घरातले पंखे किंवा लाईट चुकून चालू राहिले की तिचं लक्ष नसतं, असं त्यांचं म्हणणं असतं. भलेही ते कुणीही सुरू केलेले असोत, पण सगळीकडे तिचं लक्ष असायला हवं, असा त्याचा आग्रह असतो. सिलिंडर नेहमीपेक्षा लवकर संपला, तर कधीतरी उतू गेलेल्या दुधावरून गॅसचा अवाजवी वापर झाल्याचा अंदाज बांधला जातो. महिन्याचा खर्च वाढला, तर किराण्यात आणलेल्या चार जास्तीच्या वस्तूंवर खापर फोडलं जातं; मग त्या वस्तू मुळात तिने स्वतःसाठी घेतलेल्या नसतील, तरीही दोष तिलाच दिला जातो. मिक्सर बिघडलं, वॉशिंग मशीन सुरू होत नाही किंवा फ्रीज बंद पडला, तर त्याचंही खापर तिच्यावरच फुटतं; कारण ती रोज ते वापरते! सुरुवातीला हे सगळं ऐकून एकट्यात रडत बसायची ती, पण हळूहळू सवयीने या सगळ्याची सवय झाली. वाईट वाटून-वाटून आता काहीच वाटत नाही. रडणे-पडणे या पलीकडे बरीच लांब निघून गेलीय; आता तिला काहीच फरक पडत नाही. तिने सरळ मान्य करून घेतलंय की, ती काहीच करत नाही ‘निरुपयोगी अस्तित्व’ म्हणून तिने स्वतःलाच झिडकारलं आहे. तिचा स्वाभिमान डिवचला गेलाय आणि जाणिवा मेल्यावर शरीर आता फक्त एका रोबोटसारख्या कमांड्स फॉलो करतं.
घर झाडताना फर्निचरवरचे धुळीचे कण झटकले जातात, पुसले जातात; तसंच त्याचं बोलणं ती आता झटकून टाकते. सिंकमध्ये चहाचे कप खूप वेळ पडून राहिले की डाग पडतात, हे डाग वाढत गेले की कपाचा पांढरा रंग पिवळसर व्हायला लागतो; म्हणून जेव्हाच्या तेव्हा ती कप धुवून काढते. तसेच, त्याच्या शब्दांचे डाग तिच्या मनावर चिकटून राहू नयेत म्हणून, ती त्या क्षणीच मन विसळून घेते. कुकरची वाफ जशी दाटल्यावर जागा शोधत शिट्टीतून बाहेर पडते, अगदी तसाच तिचा गुदमरलेला श्वास ती गाणं गुणगुणत मोकळा करते. घड्याळाचे काटे ठरलेल्या सेकंदाला सरकतात, पण तिने त्यांनाही दहा मिनिटं पुढे सरकवलंय, जेणेकरून वेळेच्या आधी सगळं उरकता येईल. त्याच्या भरवशावर राहिलं तर उशीर होईल,
घड्याळावर विश्वास नाही तिचा, म्हणून ती स्वतःच्या वेळेनुसार पळत राहते. अस्ताव्यस्त पुस्तकं, बेडवर पडलेले कपडे, सोफ्याचे सरकलेले कव्हर, चहा पिऊन झालेला टेबलावरचा कप… हे सगळं फक्त तिच्याच डोळ्यांना दिसतं. तिचे हात दिवसभर घराचा कोपरा अन् कोपरा आवरण्यात गुंतलेले असतात. तरीही, बस इतकंच बाकी तिने दिवसभर काहीच केलं नाही, तिला कसलंही टेन्शन नाही, जबाबदारी नाही, ती ऐशोआरामात राहते….
आर्थिक गुंतवणुकीचे सॅलरी शीट, बँकेतले खाते, जमवलेली प्रॉपर्टी… हे सगळं कागदपत्रात नमूद असतं. ती मात्र एखादी इच्छा गहाण ठेवते, या आमिषापोटी की, समोरच्या व्यक्तीकडून तिला कौतुकाचं थोडं कर्ज मिळेल. भलेही त्यासाठी तिला आयुष्यभर भावनेची काटकसर करून व्याजाचे हप्ते भरावे लागतील. तिला ठाऊक आहे की हे व्याज फिटणार नाही आणि कधीतरी ती इच्छा जप्त होऊन तिचं त्यावरचं स्वामित्व संपेल. इतकी तडजोड करूनही, तिच्याकडे कोणतेही लिखित पुरावे किंवा दाखले नाहीत. तिने केलेल्या तडजोडीची, गुंतवणुकीची, घेतलेल्या कर्जाची आणि फेडलेल्या व्याजाची कुठेही नोंद नाही.
पापणीआड जपलेल्या स्वप्नाला तिने तुटताना पाहिलं. कुणालाही त्याचा आवाज ऐकू गेला नाही, पण त्या कोवळ्या स्वप्नाचा पाचोळा तिच्या अवतीभवती विखुरला होता. तरीही, तिने पुन्हा एकदा सावरत, त्या इवल्याशा स्वप्नाचे विखुरलेले तुकडे गोळा केले आणि शांतपणे उशीखाली ठेवले. सूर्य मावळला होता, तरी तिची आशा अजूनही मावळली नव्हती. पहाटे उठल्यावर तिला उशीखालून स्वप्नांचे श्वास ऐकू आले! हो, रात्री गोळा केलेल्या त्या तुकड्यांमध्ये अजूनही जीव होता. आयुष्यातल्या धकाधकीत, इतकीशी ‘आस’ही तिला आनंदी राहायला पुरेशी होती.
ती आता सारं काही मागे सोडून पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याच्या प्रवासात गुंतली आहे. तिचं हे ‘इमोशनल फिक्स डिपॉझिट’ म्हणजे काही केवळ अपेक्षांचा हिशेब नाही, तर तिने आपल्या मनाच्या कोपर्‍यात जपलेली ती एक हळवी साठवण आहे. कधी ना कधी, एखाद्या पावसाळी संध्याकाळी किंवा शांत पहाटे, या गुंतवणुकीचे भरघोस व्याज तिला नक्कीच मिळेल या एका निरागस विश्वासाने मनातली ती कातर हुरहूर आता विरून गेली आहे आणि तिथे एक शांत, स्थिर निवांतपणा आला आहे. म्हणूनच तिला आता कशाचा काहीच फरक पडत नाही. बस इतकंच …

That’s all…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *