योग करा, निरोगी राहा : फडणवीसांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून, त्यापासून बचाव करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी आणि रामबाण उपाय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नियमित योगाभ्यास केल्यास जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहता येते, असे त्यांनी सांगितले.
जुहू बीच येथील फूड कोर्टजवळ आयोजित करण्यात आलेल्या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर, उषा बेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सातत्याने योग करणारी व्यक्ती कोणत्याही मानसिक परिस्थितीत आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकते. योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मन प्रसन्न आणि स्थिर राहते. त्यामुळे योगविद्येचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, भारताने संयुक्त राष्ट्रसंघात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात अत्यंत कमी कालावधीत आणि कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर झालेल्या प्रस्तावांपैकी हा एक महत्त्वाचा प्रस्ताव ठरला. आज भारताच्या पुढाकारामुळे जगभर योगाचा प्रसार झाला असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. कार्यक्रमादरम्यान शिवप्रकाश यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगशिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

Practice yoga, stay healthy: Fadnavis’s appeal

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *