फेरनिविदेत चार संस्थांचा प्रतिसाद, तांत्रिक कागदपत्रांची तपासणी
नाशिक : प्रतिनिधी
वादात सापडलेल्या चारशे कोटींच्या मुकणे पाणीपुरवठा योजनेचे प्री-बीड मंगळवारी (दि.22) ओपन करण्यात आले. विशिष्ट ठेकेदारांना मुकणेचे काम मिळावे या पद्धतीने निविदेत अटी-शर्ती टाकल्याचा आरोप झाला होता. प्रारंभी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत्तील चार संस्था अपात्र केल्यानंतर पुन्हा फेरनिविदा काढली. चार संस्थांनी प्रतिसाद दिला असून, मंगळवारी प्री-बीड ओपन करून मक्तेदारांच्या ज्या शंका असतील त्याचे निरसन केले जाईल. यानंतर कागदपत्रांची तांत्रिक तपासणी करून फायनान्शिअल बीड ओपन केले जाणार आहे.
मुकणे पाणीपुरवठा योजनेसाठी 9 ते 22 सप्टेंबरदरम्यान फेरनिविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च भूसंपादन मिळून 395 कोटींपर्यंत गेला आहे. राज्य शासनाने सिंहस्थ कामासाठी मंजूर केलेल्या निधीत मुकणे पाणीपुरवठा योजनेसाठी 125 कोटी मिळणार आहेत. या योजनेतून विल्होळी येथे 274 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारून विल्होळी ते साधुग्राममध्ये गुरुत्व जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. सिंहस्थापूर्वी हे काम करण्याचे आव्हान असेल.
साधुग्राममधील साधू-महंतांसह शहरात येणार्या भाविकांना पाणी पुरवले जाणार आहे. पंचवटी व द्वारका परिसरातील पाणी पुरवठ्याचा बराच ताण कमी होणार आहे. मुकणे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 2036 पर्यर्ंतच्या लोकसंख्येला पाणी पुरवण्याचे नियोजन आहे. सिंहस्थावेळी शहरात एक कोटी भाविक येण्याचा अंदाज असल्याने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून 2036 पर्यंतच्या लोकसंख्येला पुरेल यादृष्टीने पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. शहराला दिवसाला 580 दशलक्ष घनफूट, तर वर्षभरात 6200 दशलक्ष घनफूट पाणी लागते. यात गंगापूर धरणातून 4500 दशलक्ष घनफूट, दारणातून 200, तर मुकणे धरणातून 1500 दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण नोंदविले आहे. दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, पर्वणी काळात एक कोटी, तर वर्षभरात पाच कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
गंगापूर धरण गाळाने भरले असल्यामुळे येथून अतिरिक्त पाणीपुरवठा होऊ शकत नाही. दारणा धरणातून थेट वाहिनी नसल्यामुळे पाणी आणण्यात अडचण येते. या पार्श्वभूमीवर मुकणे पाणीपुरवठा योजनेचा विस्तार करणे
महत्त्वाचे आहे.
या संस्थांचा प्रतिसाद
♦ लार्सन अँड टुब्रो लि.
♦ जेडब्ल्यूआयएल इन्फ्रा लि.
एनसीसी लि.
♦ विष्णू प्रकाश आर. पंगीला लि.