ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा
♦♦ देश हायजॅक केलाय
♦♦ मोदी-शहांवर टीका
♦♦ आठ तास ठिय्या
♦♦ पोलिस व्हॅनला घेराव
नवी दिल्ली : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ’इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी (दि.6) संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी अत्यंत आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले. पोलिसांनी अडवल्यानंतर राहुल गांधींनी रस्त्यावरच अनेक तास निर्धाराने ’ठिय्या’ दिला. दिल्ली पोलिसांनी अनेक खासदारांना ताब्यात घेऊन आंदोलनापासून रोखले.
यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केली. या मंडळींनी देश हायजॅक केला असून, हा देशद्रोह आहे, असे थेट आणि अत्यंत गंभीर आरोप गांधी यांनी केले.
राहुल गांधी पुढे संताप व्यक्त करत म्हणाले की, या लोकांनी देशासोबत जे काही केले आहे, तो एक प्रकारचा ’देशद्रोह’ आहे. मग ते मोदी असोत, अमित शहा असोत, भागवत असोत किंवा ज्ञानेश कुमार असोत, भविष्यात कोणालाही सोडले जाणार नाही, कोणीही वाचणार नाही. ’ज्ञानेश, इट्स डन ब्रो’, अशा जेन-झी स्टाइलमध्ये राहुल यांनी घोषणाबाजी केली.
तत्पूर्वी, सुमारे 300 हून अधिक विरोधी पक्षांचे खासदार निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी संसद भवनाकडून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना वाटेतच संसद मार्ग, आकाशवाणी परिसरात बॅरिकेड्स लावून अडवले. पोलिसांनी अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि विरोधी पक्षाचे खासदार तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला बसले. राहुल गांधींनी सवाल केला की, आम्ही तीनशे खासदार कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधित्व करतो, मग निवडणूक आयुक्त आम्हाला भेटायला का घाबरत आहेत? आणि पोलीस आम्हाला का धमकावत आहेत?
राहुल गांधी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढून विरोध दर्शवताना दिसले. बराच वेळ ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी काही खासदारांना ताब्यात घेतले आणि बसमधून शहराबाहेर नेले. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंडिया आघाडीचे अनेक खासदार, कार्यकर्ते मात्र आकाशवाणी भवनाजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. हे आंदोलन सात तासांहून अधिक वेळ चालले आहे. आंदोलक रात्रभर तिथेच थांबण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनामध्ये शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), सपा प्रमुख अखिलेश यादव आणि तृणमूल काँग्रेस चे खासदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ज्यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ’आप’ने मोर्चात सहभाग टाळला; मात्र नंतर स्वतंत्रपणे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे स्वतंत्रपणे काम करत नसून त्यांच्यावर मोदी-शाह यांचा दबाव आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ’इंडिया’ आघाडीची मुख्य मागणी आहे. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत आणि फॉर्म 6 मध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि मतचोरीचा गैरप्रकार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
राहुल आणि प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढणार्या ’इंडिया’ आघाडीच्या खासदारांना दिल्ली पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. संसद परिसरातून सुरू झालेला मोर्चा अडवल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी आकाशवाणी भवनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मात्र, सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना आंदोलन स्थळावरून बळाचा वापर करत हटवले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांना ताब्यात घेऊन बसमधून नेले. कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोगाला भेटू न देता रोखले जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सत्ताधारी भाजपचा पलटवार
विरोधकांच्या या आंदोलनावर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी पलटवार करत म्हटले की, विरोधी पक्षांनी हे नाटक बंद करावे आणि पंतप्रधानांकडून काहीतरी शिकावे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आरोप केला की, हे आंदोलन केवळ देशात अराजकता निर्माण करण्यासाठी आणि राहुल गांधींना पुन्हा एकदा राजकीय पटलावर ’री-लॉन्च’ करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यांनी रचलेले नाटक आहे.
Protests flare up in Delhi.