टंचाईची अफवा; अनेकांकडून कॅन भरून डिझेल खरेदी, टाकी फुल्ल भरण्याची तरुणांची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
आखातातील युद्धामुळे पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी अफवा पसरल्यामुळे काल शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची तोबा गर्दी उसळली होती.
रात्री अकरा वाजेनंतर पेट्रोलपंप बंद राहणार असल्याच्या अफवेने नाशिक शहरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. मंगळवारी रात्रीपासूनच अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांना काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर होणार असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्या संदेशांमुळे आणि इतर राज्यांतील पेट्रोल पंपांवरील गर्दीचे व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये घबराट वाढली आहे. त्यामुळे अनेकांनी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी नागरिक कॅन व बॅरल घेऊन इंधन साठवण्यासाठी पंपांवर येत असल्याचेही दिसून आले.
या अनियंत्रित मागणीमुळे काही पेट्रोल पंपांवर इंधन लवकर संपत आहे. त्यामुळे इतर पंपांवरही अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Queues formed at petrol pumps in Nashik