रेल्वेने वसूल केला 65 लाखांचा दंड

अनधिकृत फेरीवाले, रुळ ओलांडणार्‍यांवर कारवाई

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे परिसरातील शिस्त आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे 1 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा दल तसेच वाणिज्य विभागातील अधिकारी व निरीक्षकांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रेल्वे अधिनियमातील विविध तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 7,780 प्रकरणे नोंदविण्यात आली. 65.29 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव डबे व जागांमध्ये अनधिकृत प्रवेश करणार्‍या प्रवाशांविरुद्ध 1,094 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यांच्याकडून 15 लाख 31 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला. दिव्यांगांसाठी राखीव सुविधा त्यांना कोणत्याही अडथळ्याविना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई
रेल्वे परिसरात अनधिकृतपणे फेरी व्यवसाय करणार्‍यांविरुद्ध 1,687 प्रकरणे नोंदविण्यात आली. या कारवाईत 25 लाख 615 रुपये दंड वसूल करण्यात आला.

रुळ ओलांडणार्‍यांची 4,999 प्रकरणे

रेल्वेचे रुळ अनधिकृतपणे ओलांडणार्‍यांविरुद्ध सर्वाधिक 4,999 प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यांच्याकडून 24 लाख 97 हजार 530 रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वे रुळांवर होणारा अनधिकृत प्रवेश रोखणे, अपघातांना प्रतिबंध करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करून स्वतःची, तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन केले आहे.

 

Railways collected a fine of ₹65 lakh.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *