अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात भक्तांनी अर्पण केलेल्या देणग्यांच्या रकमेत मोठा अपहार (चोरी) झाल्याचे उघड झाल्याच्या प्रकारावर देशभर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करणे स्वाभाविक आहे. ज्या चळवळीतून राम मंदिर उभे राहिले, त्या चळवळीचा थेट संबंध भाजपा व संघाशी आहे. राम मंदिर उभारणीसाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशव्यापी चळवळ उभी केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाविधी करून केले होते, हे लक्षात घेता चोरी झाल्याने विरोधक शांत कसे बसतील? श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य बांधकाम 25 नोव्हेंबर 2025 रोजी पूर्ण झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिखरावर धर्मध्वजारोहण करण्यात आले. दि. 22 जानेवारी 2024 रोजी मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झाले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेतली गेली पाहिजे. भाजपा व रा. स्व. संघाकडूनही या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे. ‘प्रभू श्रीराम मंदिर’ हे केवळ धार्मिक स्थळ नाही, कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे. देशभरातील रामभक्तांच्या भावना या मंदिराशी जोडलेल्या आहेत. अशा मंदिराला रामभक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांच्या रकमेचा अपहार म्हणजे विश्वासाला गेलेला तडा म्हणता येईल. दानपेटीत टाकलेली रक्कम किती आहे, हा प्रश्न महत्त्वाचा नाही; अगदी एक रुपया असला तरी तो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असतो. देणगीचा वापर मंदिराच्या सेवेसाठी, व्यवस्थापनासाठी आणि धर्मकार्यांसाठी होईल, या विश्वासातून भाविक पैसे देणगी म्हणून देतात. त्याच पैशांवर कोणी डल्ला मारला असेल तर तो गुन्हा आहेच, पण तो श्रद्धेचा अपमानही म्हणता येईल, असे याच सदरात ‘श्रद्धेला तडा’ या मथळ्याखाली 2 जुलै 2026 रोजी नमूद करण्यात आले होते. श्रीराम मंदिराचा प्रश्न केवळ भाजपा वा रा. स्व. संघाशी संबंधित नाही, तर तो शिवसेनेशीही संबंधित आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा अंगार पेटविला होता. अयोध्येत मंदिर उभारणीसाठी 1990 व 1992 मध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, संघ इत्यादी संघटनांनी आणि साधुसंतांच्या धर्मसंसदेने आयोजित केलेल्या कारसेवेत शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यावेळी शिवसेना-भाजपा युती होती. आता परिस्थिती वेगळी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुभंगली असून, एक शिवसेना एकनाथ शिंदेंकडे, तर दुसरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपाच्या विरोधात डरकाळ्या फोडत असली, तरी ती शिवसेना आता आक्रमक नाही. श्रीराम मंदिरात चोरी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांतून हिंदुत्वाचा आधार घेत रामरक्षा नावाने आंदोलन सुरू केले. हिंदूंना शिवसेनेच्या नावाखाली संघटित करण्याचा उद्धव ठाकरे यांचा हा एक प्रयत्न असला, तरी त्यांची रामरक्षा भाजपाच्याच विरोधात आहे. उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात 5 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादर येथील वटवृक्ष श्री हनुमान मंदिरात केली. रामरक्षा पठण आणि महाआरतीने या आंदोलनाची सुरुवात झाली. आम्ही देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे नक्कीच आहोत, पण मूर्ख नाही. आपल्या याच हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी राम मंदिर लुटत असेल, तर आता हिंदू त्यांना माफ करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. त्यांनी भाजपा, पंतप्रधान आणि अयोध्येतील महंतांवर सडकून टीका केली. आंदोलनात सहभागी होण्यासाठी शेकडो शिवसैनिक आणि काही साधू-महंतही आले होते. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने उभारी घेतली होती, ती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाने. राम मंदिरातील चोरीचे निमित्त साधून उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करून हिंदूंचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना परिस्थिती वेगळी होती; आता तीच परिस्थिती नाही. शिवसेनेचे सहा खासदार फुटले, काही आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा असताना उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाची भाजपाने ‘पक्षरक्षा’ या शब्दात खिल्ली उडवणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली की, शेवटी उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाची आठवण झाली. त्यांनी प्रभू श्रीरामाचा मार्ग सोडला होता, म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. मात्र, जर ते ठाकरे राममार्गाने चालले तर त्यांचे भले होईल, त्यांनी दररोज रामरक्षा म्हणावी, अशा शब्दांत फडणवीस यांनी खिल्ली उडवली. कारसेवेच्या काळात शिवसेनेत असलेले आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष चालवणारे राज ठाकरे यांनीही चोरी प्रकरणावर कडक टीका केली आहे. राम मंदिरातील कथित चोरीबद्दल बोलले की, धर्माचा अपमान होतो असे भासवले जात आहे. मंदिराबद्दल आमचीही आस्था आहे, पण तिथून तब्बल 1,400 कोटी रुपये चोरले जात असतील तर त्यावर बोलायचे नाही का, असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला. प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन जे सत्तेवर आले, त्यांनी या मोठ्या अपहारावर मौन का बाळगले आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचा एकही मंत्री या विषयावर अवाक्षरही का काढत नाही, असा सवालही त्यांनी केला. राम मंदिर ट्रस्टच्या 15 पैकी 12 ट्रस्टींची नियुक्ती केंद्र सरकार करते. हे सर्व 12 लोक संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषद (विहिंप) यांच्याशी संबंधित आहेत, मग या चोर्‍या कशा झाल्या, असा सवालही त्यांनी केला. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यापासून तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत, हिंदूच हिंदूंची मंदिरे लुटत आहेत, अशा कडक शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी इत्यादी पक्षांनीही टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनीही भूमिका मांडली आहे. या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करू पाहणार्‍या हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींच्या कारस्थानांना भाविकांनी बळी पडू नये आणि त्यांचे डाव उधळून लावावेत, असे त्यांनी म्हटले. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दत्तात्रेय होसबाळे यांच्या या विधानाचे पूर्ण समर्थन केले. मुळात चोरी प्रकरणात अटक झालेले हिंदूच आहेत. त्यामुळे चोरी प्रकरणावर टीका करणार्‍या किंवा प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना हिंदूविरोधी व राष्ट्रद्रोही म्हणणे उचित ठरत नाही. संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक चौकशी करत आहे, तसेच अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आहे. यावरून हे प्रकरण गंभीर आहे. हा प्रश्न केवळ चोरीचा नाही, तर देणगीदारांच्या श्रद्धेचा आहे. संपूर्ण प्रकरणावर टीका होणारच आणि तीव्र प्रतिक्रिया उठणारच. मंदिर व्यवस्थापन व सरकारचे अपयश झाकण्यासाठी कोणाला हिंदूविरोधी किंवा राष्ट्रविरोधी ठरवणेही उचित नाही. ज्यांना हिंदुहृदयसम्राट म्हटले जायचे आणि आजही म्हटले जाते, त्या बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन केले म्हणून तेही हिंदूविरोधी किंवा राष्ट्रविरोधी ठरतात आणि मंदिरातील चोरीवर सडकून टीका करणारे राज ठाकरे हेही भाजपा व संघाच्या लेखी हिंदूविरोधी व राष्ट्रद्रोही ठरतात. रामभक्तांनी दिलेल्या देणग्यांच्या रकमेचा अपहार झाला, हे सत्यच आहे. त्यावरून राजकारण करून कोणालाही हिंदूविरोधी किंवा राष्ट्रविरोधी ठरवणे उचित ठरत नाही.

Ramraksha

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

18 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

18 hours ago