रयत शिक्षण संस्थेने तळागाळातील विद्यार्थ्यांना घडविले

मधुकर भावे : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 139 व्या संयुक्त जयंतीचा सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सामाजिक रूढी, जातिभेद आणि आर्थिक अडचणींच्या भिंती तोेडून सर्व जातीधर्मांतील मुला-मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ग्रामीण व बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून आत्मसन्मान मिळवून देणारी रयत शिक्षण संस्था ही सामाजिक परिवर्तनाची गंगोत्री आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत मधुकर भावे यांनी येथे काढले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 30 सप्टेंबर) भव्य संयुक्त जयंती सोहळा झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
शहरातील मॅरेथॉन चौकातील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी खा. राजाभाऊ वाजे, मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, चंद्रकांत दळवी, भरत आंधळे, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, राजेंद्र चांदे आदी उपस्थित होते.
अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असले, तरी संस्थेने चारित्र्य, पावित्र्य व नैतिक मूल्ये जपली आहेत. रयतचे विद्यार्थी आज विविध मोठ्या संस्था आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत. हीच रयत शिक्षण संस्थेची खरी ताकद आहे, असे भावे म्हणाले.
अण्णांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका योजनेतून शिकलेले विद्यार्थी पुढे कुलगुरू, शास्त्रज्ञ, उद्योजक व लोकप्रतिनिधी झाले. संस्थेसाठी अण्णांनी पत्नीचे 35 तोळे सोने गहाण ठेवले, तर संत गाडगेबाबांनी कीर्तनातून मिळालेली रक्कम रयत संस्थेला दान केल्याचेही स्मरण करण्यात आले.
अण्णांनंतर यशवंतराव चव्हाण यांनी संस्थेचे नेतृत्व केले. मुख्यमंत्री होण्यापेक्षा रयतचा अध्यक्ष झाल्याचा आनंद अधिक असल्याचे त्यांचे उदगार नमूद करण्यात आले. आज रयतच्या 7,200 वर्गखोल्यांत स्मार्ट टीव्ही व इंटरअ‍ॅक्टिव्ह पॅनल, कृत्रिम बुद्धिमत्ता व डिजिटल अध्यापनासाठी मास्टर ट्रेनर्स, तसेच पेपरलेस ईआरपी प्रणाली कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. संस्थेचे विद्यार्थी जगभरात महाराष्ट्राचा व देशाचा नावलौकिक वाढवत असल्याचेही भावे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या विस्ताराचा व योगदानाचा आढावा घेतला. संस्थेचे राजेंद्र चांदे यांनी प्रास्ताविकात संस्थेबद्दल माहिती दिली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, आमदार रोहित पवार यांच्यासह मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rayat Shikshan Sanstha has shaped students from the grassroots level.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *