महासभेवर प्रस्ताव सादर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या यशवंत मंडईचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 22 मधील ही मंडई 1962 मध्ये उभारण्यात आली होती. परंतु ही इमारत जीर्ण झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर महापालिका प्रशासनाने यशवंत मंडई नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रस्तावित नव्या प्रकल्पात आधुनिक सुविधांसह किरकोळ विक्रीची दुकाने, कार्यालये,
फूड कोर्ट, वाचनालय आणि समुदाय केंद्राचा समावेश असणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी नागरी सुविधा केंद्र, अंगणवाडी आणि नाशिक प्राथमिक आरोग्य केंद्र यांसारख्या जनकेंद्रित सेवाही येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच परिसरात पार्किंग, आधुनिक स्वच्छतागृहे, अग्निशमन यंत्रणा आणि डिजिटल सुविधा पुरविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या मालमत्ता मुद्रीकरण समितीच्या 11 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत या पुनर्विकास प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानुसार प्रकल्प सल्लागार नेमून हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी मनपा महासभेसमोर सादर करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेने या जागेचा पूर्णक्षमतेने वापर करून शहरासाठी आधुनिक व शाश्वत महसूल मिळवून देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पीपीपी तत्त्वावर उपयोग
यशवंत मंडईचा पीपीपी अर्थात, सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर पुनर्विकास केला जाणार आहे. या पद्धतीमुळे नाशिक महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचा दावा प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. उलट खाजगी गुंतवणुकीतून आधुनिक व्यावसायिक इमारतीची उभारणी केली जाईल, ज्यातून मनपाला सवलत शुल्क, भाडे उत्पन्न आणि जाहिरातींच्या हक्कांद्वारे दीर्घकालीन व शाश्वत महसूल मिळेल.
Transformation of Nashik Road’s Yashwant Mandai