तीन राज्यांतील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची चर्चा सर्वत्र होत आहे. भाजपाला दोन ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याने चर्चा अधिक होत आहे. गुजरातमध्ये विजय अपेक्षित होता, बिहारमध्ये पराभव अनपेक्षित होता, तर मध्य प्रदेशात विजयाची आशा होती. बिहारमधील बांकीपूरमध्ये मोठी निराशा भाजपाच्या पदरी पडली, तर मध्य प्रदेशात बंडाळीने भाजपाचा घात केला. बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा मोठा पराभव जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केला. लहानसहान पक्ष फोडून त्यांना संपवायचे, कोणी विरोधकच राहणार नाही, हा भाजपाचा हिशेब असला, तरी जन सुराज या लहान पक्षाने भाजपाच्या शिडातील हवा काढून घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे भाजपाचेच आहेत. आघाडीत नितीश कुमार यांचा जनता दल (युनायटेड) हा भाजपाइतकाच शक्तिशाली पक्ष आहे. याशिवाय लोकजनशक्ती, हिंदुस्तान अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक मोर्चा असे काही पक्ष आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दणदणीत विजय मिळवला. सर्वकाही ठीकठाक असताना बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवून ‘मोदी-शाह यांनी, जागे व्हा!’ असा संदेश दिला, असे आम्ही याच सदरात 5 ऑगस्ट रोजी म्हटले होते. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाचा प्रशांत किशोर यांनी नियोजनबद्ध पराभव केला, पण मध्य
प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपाची शिस्तबद्धता चव्हाट्यावर आणली. गुजरातमधील मांजलपूर मतदारसंघात भाजपाचा विजय अपेक्षित होता; मोदी-शाह यांच्या राज्यात भाजपाचा पराभव करणे म्हणावे तितके सोपे नाही. बांकीपूर (बिहार) आणि दतिया (मध्य प्रदेश) येथे पराभूत झालेल्या भाजपाला मांजलपूरचा विजय कोरडाच आहे. सन 1995 पासून, म्हणजेच तब्बल तीन दशके, बांकीपूर मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा अभेद्य गड मानला जात होता. या ठिकाणी प्रशांत किशोर यांनी
मिळवलेला स्पष्ट विजय भाजपाला जबर चपराक लगावणारा ठरला. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघाची कथा बांकीपूरच्या तुलनेत वेगळी असली, तरी भाजपामध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. दतिया हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असला, तरी पोटनिवडणुकीत सहसा सत्ताधारी पक्षालाच फायदा होतो किंवा त्याचा विजय होतो, हा इतिहास आहे. दतियात काँग्रेसच्या घनश्याम सिंह यांनी भाजपाच्या आशुतोष तिवारी यांचा पराभव केला. माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना डावलल्यामुळे भाजपामध्ये निर्माण झालेली अंतर्गत धुसफूस आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन यांमुळे हा गड राखण्यात भाजपा अपयशी ठरली. भाजपाविरुद्ध जनतेचा रोष वाढत असल्याचे काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप, तृणमूल, शिवसेना (ठाकरे), कम्युनिस्ट इत्यादी विरोधी पक्षांनी या निकालांवरून म्हटले आहे. दुसरीकडे, भाजपाच्या दोन्ही राज्यांतील नेत्यांनी ‘आम्ही जनमताचा आदर करतो,’ असा पवित्रा घेतला. पराभव झाल्यावर जनमताचा आदर करण्याची भाषा केलीच जाते. पोटनिवडणुकांनी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे की, जनतेला गृहीत धरून चालता येत नाही. पेपरफुटी, भ्रष्टाचार, ई-20 पेट्रोल, राम मंदिर देणगी चोरी हे मुद्दे आमच्या मनात आहेत, हेच बिहार आणि मध्य प्रदेशच्या मतदारांनी दाखवून दिले. जनहिताला फारकत देणारे निर्णय मतदारांकडून स्वीकारले जाणार नाही, हेही पोटनिवडणुकांतील पराभवाने भाजपाच्या लक्षात आले असेल. बांकीपूरमध्ये भाजपाचा जो पराभव झाला, तो लोकांच्या नाराजीमुळे झाला. दतियामधील पराभवाला लोकांची नाराजी जितकी कारणीभूत आहे, तितकीच भाजपामधील बंडाळीही कारणीभूत आहे. पराभवानंतर दतिया जिल्हा भाजपा कार्यकारिणी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली. केवळ मुख्य जिल्हा कार्यकारिणीच नाही, तर दतिया जिल्ह्यातील सर्व आघाड्या (मोर्चे), विभाग आणि सर्व मंडल समित्या बरखास्त करण्यात आल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या गुप्त अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये स्थानिक भाजपा नेत्यांनीच काँग्रेस उमेदवाराला पडद्यामागून मदत केल्याचे समोर आले. माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मिश्रा राहतात त्या भागातील मतदान केंद्रांवरही काँग्रेसने आघाडी घेतली. पराभवानंतर अंतर्गत गटबाजी आणि फितुरी (बेतघात) करणार्या स्थानिक नेत्यांना थेट संदेश देण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने ही कडक कारवाई केली. शिस्तीचा केडरबेस्ड पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाची बंडाळी दतियात चव्हाट्यावर आली. सत्तेची पदे किंवा संधी मिळाली नाही, तर काँग्रेसमध्ये बंडखोरी माजते, असा सार्वत्रिक समज आहे. दतियात मात्र तेच भाजपामध्ये दिसून आले. सत्तेत असताना एखाद-दुसर्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने सत्तेचे समीकरण बिघडत नाही, मात्र पराभवातून वेगळा संदेश जातो. बांकीपूरचा संदेश लोकांच्या नाराजीचा आहे, तर दतियाचा संदेश भाजपात बंडखोरी होऊ शकते, असा आहे. पराभवांचे पोस्टमॉर्टम पक्षात होईलही, पण जो संदेश गेला आहे, तो गेला आहे त्याचा अर्थ बदलता येणार नाही. भाजपात बंडखोरी होऊ शकते, हे दतियाच्या निकालाने दाखवून दिले आहे. सत्ता असली म्हणजे विजय हमखास होतो, हा भाजपाचा भ्रम दतियाने दूर केला आहे आणि भाजपाचे कार्यकर्ते व नेते खरोखर शिस्त पाळतात या प्रतिमेलाही तडा गेला आहे. बिहारमधील बांकीपूरमधील पराभवाचा अर्थ वेगळा आहे, तर मध्य प्रदेशच्या दतिया विधानसभा मतदारसंघातील पराभवाचे कारणही वेगळे आहे. लोकांची नाराजी आणि पक्षातील बंडाळी भाजपाला चांगलीच भोवणार. दोन्ही ठिकाणी रणनीती चुकली.
Rebellion out in the open!