रस्त्यांची चाळण, नागरिकांचे हाल

– जगन घाणेकर 

यंदाचा पावसाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी जेव्हापासून त्याचे आगमन झाले आहे, तेव्हापासून प्रतिदिन कुठेना कुठे पूर आल्याच्या, झाडे उन्मळून पडल्याच्या घटना वाचनात येत आहेत. पावसाळा सुरू झाला की काही काळातच भ्रष्ट प्रशासनाचे आरसे अर्थात रस्त्यावरील खड्डे जागोजागी दिसू लागतात. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे प्रमाण कित्येक पटीने वाढल्याचे दिसून येते. ठाणे-नाशिक मार्गावर काही ठिकाणी तर याच मार्गाला जोडणार्‍या भिवंडी परिसरात जागोजागी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचे पाहायला
मिळत आहे.
रस्त्यांच्या या दुरवस्थेचे परिणाम तिथून ये-जा करणार्‍या नागरिकांना प्रतिदिन भोगावे लागत आहेत. भिवंडीतील खड्ड्यांमुळे एका निष्पाप महिलेचा नुकताच जीव गेला. ठाण्यातील मनोरमा नगरात राहणार्‍या सुनीता पाल या 46 वर्षीय महिला पतीसह स्कूटरवर भिवंडीतील अंजूर फाटा येथे फ्लॅट पाहण्यासाठी निघाल्या होत्या, मात्र राहणार्‍या भागात आल्यावर रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात गेली आणि घसरली. ज्यामुळे सुनीता रस्त्याच्या मधोमध पडल्या. त्याच क्षणी मागून येणार्‍या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले.
या अपघातात सुनीता पाल यांचा जागीच मृत्यू झाला तर पती अक्षयलाल घायाळ झाले. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांनी नुकताच आणखी एकाचा जीव घेतला आहे. शहापूर तालुक्यातील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात ठाणे TDRF पथकातील जवान विकास लहू गोरे (वय 31) यांचा जागीच मृत्यू झाला. बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावर निघाले असताना त्यांना काळाने गाठले. काही दिवसांपूर्वीच नाशिक परिसरात खड्ड्यांमुळे दोन जण गंभीर घायाळ झाले.
अनेक महामार्गांची आणि अंतर्गत मार्गांची आज दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्याने खड्डा नेमका किती खोल आहे, याचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकी, रिक्षा यांसारख्या हलक्या वाहनांची चाके खड्ड्यांत पडून ती वाहने रस्त्यावर कोसळून गंभीर अपघात होतात. खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर खड्डे चुकवून वाहने चालवताना ती इकडे तिकडे वळवावी लागल्यानेही अपघात घडून येतात. रस्ते खड्डेमय झाल्याने वाहतूक संथगतीने होते. परिणामी, रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागतात, ज्यामुळे नोकरदार नागरिकांना कार्यालयात वेळेवर पोहोचणे आणि घरी जाणे जिकिरीचे होते. खड्ड्यांमुळे गाडीची चाके गेल्याने काही वेळा वाहने बाजूने जाणार्‍या वाहनांना किंवा नागरिकांना धडकतात, ज्यामुळे भररस्त्यात जागोजागी वाद होताना पाहायला मिळतात. खड्ड्यांमुळे दुचाकी तसेच हलक्या वाहनांचे अतोनात नुकसान होते. ज्यांच्या दुरुस्तीचा भुर्दंड वाहनमालकांना अकारण सहन करावा लागतो.
शिवाय, या गाड्यांतून प्रवास करणार्‍या नागरिकांना चमक भरणे, मणक्यांच्या गॅप निर्माण होणे, फ्रॅक्चर होणे यांसारख्या शारीरिक इजांना तोंड द्यावे लागते ते वेगळेच. सर्व प्रकारचे कर सरकार दरबारी देऊनही दरवर्षी पडणार्‍या या खड्ड्यांमुळे नागरिकांचा रोजचा प्रवास जीवघेणा बनतो. अनेक वेळा त्रस्त झालेले नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींसमोर समस्या मांडायला जातात तेव्हा त्यांच्याकडून केवळ आश्वासन मिळते किंवा रस्त्यांवर खडी किंवा पेव्हर टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते; मात्र पुढच्याच पावसात तीही वाहून जाते.
पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे घडणारे अपघात या समस्या दरवर्षी नागरिकांच्या पथ्याला येतात, मात्र त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काही काढली जात नाही. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री दरवेळी भारतातील रस्ते इंग्लंड आणि अमेरिकेप्रमाणे गुळगुळीत करण्याची स्वप्ने दाखवतात; मात्र नागरिकांना किमान वाहने चालवण्यायोग्य रस्ते मिळावेत एवढीच अपेक्षा असते. भ्रष्ट प्रशासन, सुस्त लोकप्रतिनिधी आणि सहन करणारी जनता यामुळे या समस्येवर तोडगा काही निघत नाही. नीट परीक्षा पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. रस्त्याच्या दुरवस्थेची जबाबदार असणार्‍यांच्या विरोधात व्यापक आंदोलन उभारण्याची वेळ आता आली आहे.

Roads are being paved, citizens are suffering

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *