
स्टॉकहोम :
मेंदूतील चेतापेशींचे (न्यूरॉन्स) कार्य प्रकाशाच्या मदतीने सुरू किंवा बंद करणार्या ’ऑप्टोजेनेटिक्स’ या क्रांतिकारक तंत्रज्ञानाच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांना 2026 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जर्मनी आणि अमेरिकेतील तीन संशोधकांना संयुक्तपणे हा पुरस्कार लाभला. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे कार्ल डायसेरोथ, जर्मनीतील हम्बोल्ट युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनचे पीटर हेगेमन आणि जर्मनीतीलच युनिव्हर्सिटी ऑफ वुर्झबर्गचे जॉर्ज नागेल हे ते तिघे संशोधक आहेत.
या शास्त्रज्ञांनी ’लाइट-गेटेड आयन चॅनेल्स’ आणि ’ऑप्टोजेनेटिक्स’ या तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांनी एका विशिष्ट एकपेशीय शेवाळामध्ये ’चॅनेलर्होडॉप्सिन’ नावाचे प्रकाश-संवेदनशील प्रोटीन शोधले, जे प्रकाशाला प्रतिसाद देऊन विद्युत लहरी निर्माण करते. कार्ल डायसेरोथ यांनी हे तंत्र पुढे नेत उंदरांच्या चेतापेशींमध्ये हे जनुक (जीन) यशस्वीपणे जोडले. जेव्हा या पेशींवर निळा प्रकाश टाकण्यात आला, तेव्हा मेंदूच्या विशिष्ट नसांना थेट नियंत्रित (सुरू किंवा बंद) करणे शक्य झाले. सोप्या भाषेत सांगायचे तर, यामुळे शास्त्रज्ञांच्या हाती मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना हाताळण्यासाठी जणू एक ’लाईट स्विच’ मिळाला
आहे.
या शोधाचे महत्त्व आणि भविष्यातील फायदे
नोबेल समितीच्या मते, या तंत्रज्ञानाने मेंदूची रहस्ये उलगडण्यासाठी संशोधनाचा एक संपूर्ण नवीन मार्ग खुला केला आहे. या तंत्रज्ञानामुळे माणसाच्या आठवणी, भावना आणि वर्तन मेंदूतील कोणत्या नसा नियंत्रित करतात, याचा अचूक अभ्यास करता येतो. याचा उपयोग अल्झायमर्स, पार्किन्सन, डिमेंशिया आणि तीव्र नैराश्य (डिप्रेशन) यांसारख्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचार शोधण्यासाठी होत आहे. या शोधाचा वापर डोळ्यांच्या आजारांवरही केला जात असून, दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये यावर संशोधन सुरू आहे.
Research on the functioning of brain neurons; Nobel Prize awarded to three scientists.