विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
*मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा*
*-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
मुंबई,
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.
ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनाने तीन महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मराठा समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनाबाबत उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, लाखो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही. शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण-तरुणींचे आभार व्यक्त करतो. आजचा निर्णय हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढ्याचा विजय आहे. मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख, वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केले, करत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजबांधवांनी शासनावर विश्वास ठेवावा, कुठलाही दूजाभाव ठेवला जाणार नाही, असे सांगून आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्याही तो मागे लोटला जातोय. त्यामुळे या समाजाच मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचा निर्धार शासनाने केला होता. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे तीन दिवसाच्या चर्चेत मांडले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मराठा आरक्षणास संमती मिळाल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, हे मी जाहीर केले होते. त्यानुसार आजचा दिवस अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले 150 दिवस अहोरात्र मेहनत घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
*कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही*
ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. मागील पावणेदोन वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारने ठरवल्यानुसार आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजासाठी ठोस करून दाखविण्याची संधी मिळाली. हे मी माझे अहोभाग्य समजतो, असे ते म्हणाले. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी दिलेले बलिदान आमच्या सरकारने व्यर्थ जाऊ दिले नाही, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच ही इच्छा मी व्यक्त केलेली आहे. राज्य शासन पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. फक्त कायदेशीर मार्गाने त्यातल्या अडचणी दूर करायच्या होत्या. त्या अडचणी दूर करून दिलेला शब्द पूर्ण करतोय असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी अभिमानाने सांगितले.
*सर्वोच्च न्यायालयाच्या निष्कर्षांवर लक्ष्य केंद्रित करुन आरक्षणाची कार्यवाही*
मुख्यमंत्री म्हणाले, आमचे युतीचे सरकार आल्यावर मराठा आरक्षण हे शासनाचे प्राधान्य होते. यासाठीच सप्टेंबर 2022 मध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष केले. सत्तेवर आल्यानंतर लगेचच म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये अधिसंख्य पदांची निर्मिती केली. तसा कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय काढून त्याची अमलबजावणी देखील सुरू केली. 2014 ते 2022-23 या कालावधीतील रखडलेली नोकरभरती आम्ही पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदविले होते त्यावर आम्ही पूर्ण लक्ष्य केंद्रित केले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशनवर आता सुनावणी सुरु झाली आहे. त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. तेथे निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विधीज्ञांची फौज उभी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधीज्ञांचीही या कामी मदत घेतली जात आहे. कार्य दल देखील स्थापन केला असल्याचे ते म्हणाले.
*युद्धपातळीवर सर्वेक्षण*
मुख्यमंत्री म्हणाले, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मा. मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार मंडळाच्या सुमारे 50 बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला संदर्भ अटी निश्चित करुन देण्यात आल्या. तसेच राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे विस्तृत सर्वेक्षण (इम्पेरीकल डेटा) गोळा करण्याचे शिवधनुष्य उचलायचे होते. यासाठी तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले. त्यांचे मास्टर्स ट्रेनिंग झाले. 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरु झाले. हे सर्वेक्षण अचूक तर करायचे होतेच पण वेळेत पूर्ण करायचे होते. 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे नऊ दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. सुरुवातीच्या काही तांत्रिक अडचणी दूर केल्या गेल्या. हे काम निश्चितच जबाबदारीचे आणि आव्हानात्मक होते, एखाद्या समाजाला न्याय देण्याचे काम होते. 16 फेब्रुवारी रोजी मा. न्या. सुनील शुक्रे यांनी हा अहवाल शासनाला सुपूर्द केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर भर दिला जात आहे. आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने टप्प्याटप्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. आता ते टिकून राहावे म्हणून राज्य सरकार आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आजच्या निर्णयामध्ये प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्ग आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आभार मानले.
०००००