बळीराजा चिंतेत; मशागतीला पूरक दमदार सरींची आस
खमताणे : प्रतिनिधी
खरीप हंगामाची पेरणी वेळेत व सुरळीत ठेवण्यासाठी पेरणीयोग्य मशागत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या मशागतीसाठी दमदार मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता असते. मात्र, यंदा जूनचा पहिला आठवडा संपला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने बागलाण तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला असून, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा लागली आहे. हंगामाचे चांगल्या उत्पादनासाठी योग्य मशागत, चांगली वापसा आणि योग्य वेळेची पेरणी आवश्यक असते. खरिपाची पेरणी वेळेत झाली तर दुबार रब्बी पीक लागवड वेळेत करता येते, अन्यथा पूर्ण वर्षाचे पीक नियोजन कोलमडते.
पावसाची दमदार हजेरी पूर्वानुभव पाहता साधारण 15 मेनंतरच पावसाला सुरुवात होऊन तापमानाचा पारा काहीसा कमी होऊन टोमॅटो, मिरची, कोबी आदी भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडीला दिलासा मिळतो, मात्र यावर्षी जूनचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. तापमानाची अजून वाढलेलेच आहे. याचा परिणाम लागवड केलेली भाजीपाला पिके जोपासण्यात शेतकर्यांना कसरत करावी लागत आहे.
पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने नांगरणी करणे आणि इतर मशागतीची कामे पुढे ढकलावी लागत आहे. परिणामी, खरीप पेरणी वेळेत होईल का? अशी चिंता शेतकर्यांना सतावू
लागली आहे.
दरम्यान, लागवड केलेल्या भाजीपाला पिकांवरील पाणीटंचाईचे संकट गडद होत आहे. विहिरी, बोअर आणि इतर जलस्रोतांवरील ताण वाढल्याने पिकांचे व्यवस्थापन करणे अवघड होत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची
शक्यता असते.
यंदा आधीच प्रभावाची चर्चा सुरू असताना मान्सूनपूर्व पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. आता मशागतीला गती मिळवण्यासाठी आणि खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडण्यासाठी दमदार पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा लागली आहे.
पेरणीपूर्व मशागतीला पूरक पावसाने अद्याप दमदार हजेरी लावली नसल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. मान्सूनपूर्व पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे बागलाण तालुक्यातील शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये.
– हरिअण्णा जाधव, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सटाणा