नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम; वाहतुकीसाठी प्रमुख मार्गांवरील अडथळे दूर
सिन्नर : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, गणेशभक्तांना व नागरिकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
लोकनियुक्त नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. नाशिक वेस परिसरातील भाजीबाजार तसेच कायम गर्दी असलेल्या भागांतील रस्त्यालगतची अतिक्रमणे, हातगाड्या व वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य हटविण्यात आले.
नाशिक वेस ते गंगावेस, गंगावेस ते नाशिक वेस, प्रताप टॉकीज मार्ग तसेच बाजार वेस पुलाच्या परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवरील अडथळे दूर करण्यात आले. यामुळे गणेशोत्सव काळात दुचाकी व चारचाकी वाहनांसह गणेशभक्तांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
भैरवनाथ मंदिर परिसर, पुलाचा परिसर आणि नेहरू चौक या गर्दीच्या ठिकाणीही अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. गणेशोत्सवात शहरात होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने ही मोहीम राबविली.
या कारवाईवेळी अजित शेख, अजय शेजवळ तसेच अतिक्रमण अधिकारी अमित रायते यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागातील कर्मचार्यांनी कारवाई केली. गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी रस्त्यांवर अतिक्रमण करू नये आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Roads in Sinnar cleared for Ganeshotsav.