मोटार वाहन विभागाच्या कामकाजावर परिणाम
पंचवटी : प्रतिनिधी
मोटार वाहन विभागासाठी शासनाने आकृतिबंध दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून कर्मचारी संघटनेने सहा वर्षे केलेल्या दीर्घ लढ्यास यश आले. अत्यंत नगण्य अशा पदोन्नतीच्या संधी असल्याने सदर शासन निर्णयाने कर्मचार्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले. परंतु, मागील दोन वर्षांत काही तांत्रिक बाबींचा बाऊ करून आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस टोलवाटोलवी केली जात असल्याने विविध प्रकारच्या मागण्यांसाठी मोटार वाहन विभागाच्या (आरटीओ) कर्मचार्यांनी मंगळवार(दि.21)पासून बेमुदत संप सुरू केला असून, कालचा संपाचा दुसरा दिवस असल्याने आरटीओतील कामकाजावर याचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.
आकृतिबंधाची योग्य अंमलबजावणी न करता त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात महसूल विभागस्तरावरील बदल्या मात्र करण्याचे सूत्र स्वीकारून प्रशासनाने नुकत्याच महसुली स्तरावर बदल्या केल्या आहेत. संघटनेच्या वतीने माहे डिसेंबर 2022 पासून शासन/प्रशासनास प्रत्यक्ष भेटून ठाम विरोध दर्शविला आहे. महसुली विभाग स्तरावरील बदल्यांमुळे कर्मचारी वर्गास पदोन्नती तसेच सेवाविषयक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे कर्मचारी भयभीत व संतप्त झाला असून, शासन/प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. वरील प्रमुख रास्त मागण्यांसह जिव्हाळ्याच्या इतर प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी तीव्र संघर्ष करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने कार्यकारिणी सभेत घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी दि.21 एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाऊन ते त्यांचा क्षोभ व्यक्त करणार आहेत. शासन, प्रशासनाने आकृतिबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने सत्वर अंमलबजावणी केल्यास हा संघर्ष टाळता येणे शक्य आहे. त्यामुळे रास्त व जिव्हाळ्याच्या मागण्या संवेदनशील शासन/प्रशासनाने मान्य कराव्यात, अशी मागणी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे नाशिकचे अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सचिव श्रीमती शिरीन शहा यांनी केली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) प्रवेशद्वारावर आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, कार्याध्यक्ष संतोष नाईक, सचिव श्रीमती शिरीन शहा, जितेंद्र देसाई, शिरीष सोनवणे, प्रशांत जाधव, अनुप वाघ, पंढरीनाथ आडके, कविता मोराडे, शंकर दिवटे, हर्षल माळी, रूपाली म्हस्के, कांचन उमराणकर, पंडित जाधव, वनिता पवार, आरती हरळ आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.
RTO employees begin strike for various demands