पंचवटी : प्रतिनिधी
घर घेऊन पाच वर्षे झाली. महापालिकेला दरवर्षी हजारो रुपयांची घरपट्टीही भरतो. पण, नळाला घोटभरही पाणी येत नाही. पाणी विकत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. किमान पाण्याची तरी व्यवस्था करून द्या, असे साकडे तवली फाटा परिसरातील साईनाथनगर कॉलनीतील नागरिकांनी नगरसेवक वाळू काकड यांना घातले.
पेठरोडच्या तवली फाटा परिसरात नव्याने कॉलन्या उभ्या राहत आहेत. मात्र, या परिसरात जलवाहिन्यांचे जाळे नसल्याने अनेक परिसरात पाणी येतच नाही. अमृत उद्यानात उभारण्यात येत असलेल्या जलकुंभाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. नागरिकांना टँकरचे पाणी विकत घेऊन दिवस कंठावे लागत आहेत. महापालिकेत अर्जफाटे करूनही प्रश्न सुटलेला नाही. सध्या अमृत दोन योजनेतून या परिसरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे साईनाथनगर कॉलनीतही जलवाहिनी टाकून पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील महिला व नागरिकांनी नगरसेवक वाळू काकड यांच्याकडे केली. त्यावर लवकरात लवकर येथील पाणीप्रश्न निकाली काढू, असे आश्वासन काकड यांनी दिले.
ना रस्ते, ना ड्रेनेज
या परिसरात ड्रेनेजचे जाळेही नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते झालेले नसल्याने पावसाळ्यात येणे-जाणे अशक्य होते. त्यामुळे रस्ते आणि मलवाहिन्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली. घंटागाडीही वेळेवर येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
घरे घेऊन पाच वर्षे झाली, महापालिकेची हजारो रुपयांची घरपट्टीही आम्ही भरतो. मात्र, कोणतीच पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. – गणेश कापडी, रहिवासी
या परिसरात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. लवकरात लवकर पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.
– वाळू काकड, नगरसेवक प्रभाग 6
There’s not even a sip of water, how can you survive?