भरधाव वाहनांमुळे साकोरे फाटा ठरतोय मृत्यूचा सापळा

कांद्याच्या ट्रॅक्टरला बसची जोरदार धडक, मोठी दुर्घटना टळली

दिक्षी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील साकोरे मिग फाटा येथील पोलीस चौकीजवळ रस्ता ओलांडणार्‍या कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने सुमारे 30 ते 40 प्रवासी आणि ट्रॅक्टरचालक थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.
बाणगंगानगर येथील शेतकरी बाळू सोनवणे कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन रस्ता ओलांडत असताना, नवापूर-नाशिक मार्गावरील बसने (एमएच 06 -एस 8737) त्यांना जोरात धडक दिली.
या धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की काही क्षणांचा फरक पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
साकोरे मिग फाटा परिसरातील नागरिकांसाठी ‘मृत्यूचा फाटा’ बनत चालल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येथील गतिरोधक छोटे असल्याने जड वाहने, लक्झरी बसेस आणि ट्रकचालक त्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वाहने चालवतात.
दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव आणि बाणगंगानगर येथील शेतकरी, कामगार, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना रोज जीव मुठीत धरावा लागतो. यापूर्वी खासदारांना निवेदन देऊनही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी आता कायमस्वरूपी सर्व्हिस रोड उभारण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने उभारलेले गतिरोधक अपुरे ठरत आहेत. वाहने वेगाने जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे सर्व्हिस रोडची उभारणी गरजेची आहे.
– विनायक चौधरी, माजी सदस्य, पंचायत समिती, निफाड

दिक्षी, बाणगंगानगर परिसरातील शेतकरी, शाळकरी मुले व मजुरांना रस्ता ओलांडताना मोठा त्रास सहन करावा लागतो. अपघात टाळण्यासाठी येथे सर्व्हिस रोडची नितांत गरज आहे.
– योगेश चौधरी, सदस्य, ग्रामपंचायत, दिक्षी

ट्रॅक्टर घेऊन रस्ता ओलांडत असताना बसचा वेग इतका प्रचंड होता की, गतिरोधक असूनही चालकाला नियंत्रण ठेवता आले नाही. बसने ट्रॅक्टरला धडक दिली. सुदैवाने मी थोडक्यात बचावलो.
– बाळू सोनवणे, बाधित शेतकरी

Speeding vehicles turning Sakore Phata into a death trap.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *