चार लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त
इगतपुरी : प्रतिनिधी
राज्यराणी एक्स्प्रेसने प्रवास करणार्या महिलेची पर्स चोरणार्या दोन संशयितांना लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत मुख्य संशयितासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 4 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडहून मुंबईकडे जाणार्या राज्यराणी एक्स्प्रेसने नुसरत फातिमा कमरुद्दीन मुन्शी या पतीसह प्रवास करत होत्या. नाशिकरोड ते इगतपुरीदरम्यान त्यांची दोन मोबाइल, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे 5 लाख 72 हजार रुपये किमतीची पर्स चोरीला गेली. ही बाब इगतपुरी रेल्वेस्थानकात लक्षात आल्यावर त्यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात
तक्रार नोंदवली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक बाबूलाल चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली. नाशिकरोड ते इगतपुरीदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन संशयित निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेऊन मुख्य आरोपी फैजल फिरोज खान (वय 21, रा. वडाळा नाका, नाशिक) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सोन्याची पोत, चार सोन्याच्या अंगठ्या आणि आयफोन मोबाइल असा 4 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी फैजल खान याला रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित मुद्देमालही लवकरच हस्तगत केला जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार
यांनी दिली.
Thieves who stole a woman’s purse on a train apprehended.