संबंधित विभागाचे दुर्लक्ष; रस्त्यावर खड्डेच खड्डे; वाहनचालक त्रस्त
देवळा : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक 22 हा कळवण-वघईकडे जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. खारीफाटा येथील खासगी कृषी मार्केट व उमराणा कृषी मार्केटसाठी हजारो वाहने जात-येत असतात.
राष्ट्रीय महामार्गापासून पावजीदादा फाटा, खारीपाडा, धोबीघाट, पिंपळगाव, देवळा, वरवंडी, निवाणे, कळवण, मानूरपर्यंत 35 ते 40 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातात जीव गमवावे लागले आहेत. काही वर्षांपूर्वी खड्डा चुकवण्याच्या नादात कळवण आगाराची एसटी बस व ऑटोरिक्षा विहिरीत कोसळून अनेक निष्पाप लोकांना जीव गमावावा लागला होता.
हॉटेल देशविदेश परिसर, मेशी फाटा पिंपळगाव (वा.) खुंटेवाडीपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव, देवळा, कळवण येथील कार्यकारी अधिकारी व अभियंते देखभाल-दुरुस्तीबाबत दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. किमान खड्डे खडी, मुरूम टाकून तात्पुरता का होईना दुरुस्त करणे गरजेचे आहे. मंत्र्यांचे दौरे असले तर रातोरात रस्ते खड्डेमुक्त होतात. एकदा रस्त्यांचे डांबरीकरण वा नूतनीकरण झाले तरी संबंधित विभागाने नेहमीच लक्ष देण्याची गरज आहे.
या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अन्यथा रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांत वृक्षारोपण करून आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर
यांनी दिला.
कसमादे भागातील सर्वच लहान-मोठ्या रस्त्यांची दुरवस्था झाली. राज्य व जिल्हा मार्ग हे दिवसेंदिवस मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. रस्त्यांची ज्यांनी कामे केली आहेत, त्यांना अद्याप देयके अदा केलेली नाहीत. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र आपत्कालीन निधी उपलब्ध करून रस्ते खड्डेमुक्त करावेत.
– कुबेर जाधव, राज्य समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटनारस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे तक्रार व निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे, मात्र संबंधित अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. राज्य मार्ग 22 रस्त्यावर रोज लहान-मोठे अपघात घडतात, तरीही संबंधित रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही, याबाबत योग्य दखल न घेतल्यास आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
– संजय दहिवडकर, अध्यक्ष, ग्रामविकास समिती, दहिवड