लासलगाव ‘कृउबा’त सोयाबीन दरात वाढ

उत्पादकांत समाधान; अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट शक्य

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून जुलै महिन्यापर्यंत प्रतिक्विंटल 4,000 ते 4,200 रुपये असलेले दर आता 4,670 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात अस्थिरता दिसत होती. मात्र, सध्या समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
सोयाबीनची आवक मर्यादित असली तरी शेतकर्‍यांनी आणलेल्या मालाला योग्य भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान झळकत आहे. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, जर हीच स्थिती कायम राहिली आणि लवकरच नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतरही दर स्थिर राहिले तर त्यांना मोठा आर्थिक फायदा
होऊ शकतो.
केंद्र सरकारने नुकतीच सोयाबीनच्या हमीभावात वाढ केली आहे. त्यामुळेही दरांमध्ये सुधारणा झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे तसेच आगामी काळात सण-उत्सव असल्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी वाढू शकते, त्याचप्रमाणे काही भागात अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे भुसार मालाचे घाऊक
व्यापारी सागर थोरात यांनी
सांगितले आहे.

लासलगाव बाजार समितीत सध्या सोयाबीनसह इतर भुसार शेतमालाला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळत आहे. कांद्यासह अन्य शेतमालाचे दर स्थिर ठेवण्यासाठी व शेतकर्‍यांच्या हितासाठी लासलगाव बाजार समितीचा केंद्र व राज्य शासनाकडे नियमित पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळे लासलगाव बाजार समितीवर शेतकर्‍यांची भावना नेहमीच आहे.
-डी. के. जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे. पुढील एका महिन्यात नवीन सोयाबीनची आवक बाजारात सुरू होईल. शासनाने सोयाबीनच्या आयात -निर्यात धोरणांमध्ये हस्तक्षेप न केल्यास नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतरही दर स्थिर राहिले तर सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र, पुढील हंगामातही हे दर टिकून राहतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
– सचिन होळकर,
कृषितज्ज्ञ, लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *