सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली

योगेश सोमण : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भद्रकालीत व्याख्यान

नाशिक : प्रतिनिधी
सावरकरांवर बालपणी पहिला संस्कार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य विचारांचा आणि इतिहासाचा झाला. पुढे जाऊन त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांचा आदर्श घेतला. मॅझिनी यांच्या राष्ट्रभक्तीचा आणि तत्त्वज्ञानाचा सावरकरांच्या विचारसरणीवर गडद प्रभाव होता, ज्यातूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरवली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भद्रकाली येथील प्रसिद्ध गणेश मंदिराजवळ प्रसिद्ध अभिनेते आणि अभ्यासक योगेश सोमण यांनी ‘सावरकर आणि हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी सावरकरांच्या विचारांचे आणि क्रांतीपर्वाचे विविध पैलू उलगडले.
सोमन म्हणाले की, इंग्रजांचे राज्य संपूर्ण भारतात पूर्णपणे विस्तारलेले असतानाच्या अत्यंत कठीण काळात सावरकरांचा जन्म झाला. त्या काळी क्रांतिकारकांवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जहाल भाषणांचा आणि विचारांचा मोठा प्रभाव होता. इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे देशात केवळ कारकुनांची आणि गुलामांची पिढी तयार होत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी उच्च शिक्षण घेऊन आपणही मोठ्या पदावर पोहोचू शकतो, याचा आदर्श समाजासमोर घालून दिला. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, ही त्या काळातील एक मोठी वैचारिक क्रांतीच होती, असेही सोमण म्हणाले.
जुन्या नाशिकमधील मंडळांचा सत्कार या व्याख्यानाच्या निमित्ताने जुन्या नाशिक भागातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या सर्वच स्थानिक मंडळांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका मयुरी पवार यांनी केले. त्यांनी प्रभागातील सांस्कृतिक उपक्रमांची पार्श्वभूमी मांडली. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक तथा नेते अंकुश पवार, सुदाम कोंबडे, देवांग जानी, राजेश दरगोडे, सत्यम खंडाळे, श्याम गोहाड, संदेश जगताप यांच्यासह परिसरातील नागरिक, सावरकरप्रेमी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Savarkar gave a new direction to India’s freedom struggle.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *