एसबीआय बँकेला 58 लाखांचा गंडा

बनावट बँक खाते व बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचे गृहकर्ज लाटणार्‍या टोळीची उकल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकमधील बँक क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक मोठी फसवणुकीची घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोन सेंटरची तब्बल 58 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. बिल्डरच्या नावाने बनावट बँक खाते उघडून आणि बोगस कागदपत्रे सादर करून हा डल्ला मारण्यात आला. याप्रकरणी एसबीआय होम लोन सेंटरचे चीफ मॅनेजर पुनित किंशनचंद बहल (वय 41, रा. शिखरेवाडी, नाशिक) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.

बँकेचे चीफ मॅनेजर पुनित बहल हे एका ट्रेनिंगसाठी सातपूर येथे गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर लि. या फर्मचे बिल्डर प्रतीक जाधव यांनी बँकेला कळवले की, ग्राहक पूजा कमलेश मेहता यांच्यासाठी मंजूर झालेली गृहकर्जाची रक्कम त्यांच्या अधिकृत खात्यात जमा झालेली नाही. बँकेच्या कर्मचार्‍यांनी तातडीने तपास केला असता, सदर 58 लाख 30 हजार रुपयांची रक्कम नाशिकरोड येथील देवळाली व्यापारी बँकेच्या जयभवानी रोड शाखेतील एका खात्यात जमा झाल्याचे दिसले. धक्कादायक बाब म्हणजे, हे खाते प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने असले तरी ते योगेश पंढरीनाथ तवर नावाच्या इसमाने बोगस कागदपत्रे देऊन उघडले होते. बँकेने तातडीने पावले उचलत देवळाली व्यापारी बँकेला खाते होल्ड करण्याचे पत्र दिले. मात्र, तोपर्यंत आरोपी योगेश तवर याने 10,00,000 रुपये रोख काढून घेतले होते. तसेच 5,00,000 रुपये आरटीजीएसद्वारे कोटक महिंद्रा बँकेत ट्रान्सफर करून काढून घेतले होते. बँकेच्या सतर्कतेमुळे उर्वरित 43,00,000 रुपये खात्यावरच फ्रीज करण्यात यश आले, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर बँकेच्या अधिकार्‍यांनी अंतर्गत चौकशी सुरू केली. दरम्यान, 16 जून रोजी देवळाली व्यापारी बँकेच्या कर्मचार्‍यांनी एसबीआयच्या अधिकार्‍यांना फोन करून सांगितले की, एक इसम बँक खाते का होल्ड केले? याची चौकशी करण्यासाठी बँकेत आला आहे. माहिती मिळताच एसबीआयचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तातडीने देवळाली व्यापारी बँकेबाहेर सापळा रचला आणि चौकशीसाठी आलेल्या संशयिताला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव योगेश तवर असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत अंकुश एकनाथ उगले हादेखील
उपस्थित होता.
आरोपींनी बँकेची दिशाभूल करण्यासाठी अत्यंत पद्धतशीर नियोजन केले होते. अशोक जाधव (खरे नाव योगेश जगताप) याने पूजा मेहता नावाच्या महिला ग्राहकाची फाइल बँकेत आणली. या फाइलसोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, जॉइनिंग लेटर आणि 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट जोडले होते. पडताळणीदरम्यान महिलेचा सिबिल स्कोअर अवघा 178 असतानाही अन्य एजन्सी आणि वकिलांच्या संशयास्पद क्लिअरन्स रिपोर्टच्या आधारे गृहकर्ज मंजूर करून घेण्यात आले.
तसेच आरोपींनी बिल्डरचे खोटे डिमांड लेटर, एनओसी आणि कॅन्सल चेक देऊन बँकेचा विश्वास संपादन केला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा एका संघटित टोळीचा कारनामा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी मुख्य सूत्रधार योगेश तवर, अंकुश पगारे, प्रिया बोरसे, पूजा मेहता, ऋषी सर आणि योगेश जगताप उर्फ अशोक जाधव यांनी संगनमत करून बिल्डर प्रतीक जाधव आणि स्टेट बँकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी सर्व संशयितांविरुद्ध फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि बँकेच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.

SBI Bank defrauded of ₹58 lakh

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *